पॅरिस विद्यापीठ : फ्रान्समधील एक जुने व प्रसिद्ध विद्यापीठ. पॅरिस आणि त्याचा परिसर यांत या विद्यापीठाची केंद्रे वसलेली आहेत. इ. स्. आठव्या शतकापासून पॅरिस हे फ्रान्सचे व यूरोपचे विद्याकेंद्र म्हणून विकसित होत गेले. विद्यमान विद्यापीठाच्या पूर्वकालीन स्थित्यंतराचा इतिहास म्हणजे फ्रान्समधील व यूरोपातील उच्च शिक्षणपद्धतीचा एक प्रकारचा आलेखच आहे. १९७० च्या सुमारास या विद्यापीठाची पुनर्रचना करण्यात आली व एकूण तेरा स्वतंत्र विद्यापीठे अस्तित्वात आली. पॅरिस विद्यापीठ–१, पॅरिस विद्यापीठ–२ अशा नावांनीच ही १३ विद्यापीठे ओळखली जातात.

या तेराही विद्यापीठांतून स्वतंत्र कुलमंत्री (रेक्टर) तथा कुलपती, अध्यक्ष व मुख्य सचिव असे उच्च पदाधिकारी असतात. तेराव्या केंद्रात (पॅरिस नॉर्थ) फक्त कुलमंत्रीच आहे. प्रत्येक विद्यापीठाचे ग्रंथालय स्वतंत्र असून सर्व केंद्रातील एकूण ग्रंथसंख्या सु. ५० लक्ष आहे. प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र अध्यापनविभाग, विषयविभाग व संशोधनविभाग असून काही विद्यापीठास स्वतंत्र संस्थाही जोडलेल्या आढळतात. पहिले (पँथिऑन सॉरबॉन) व चौथे (पॅरिस सॉरबॉन) ही विद्यापीठे शासननियंत्रित असून इतर विद्यापीठांचे प्रशासन स्वतंत्र आहे. तेराही विद्यापीठांतील एकूण विद्यार्थिसंख्या सु. १,६०,००० आणि शिक्षकसंख्या सु. ६,००० आहे. (१९७६). सॉरबॉन येथील विद्यापीठपरिसर ६,५०० चौ.मी. क्षेत्रात पसरलेला आहे. हे केंद्र फार जुने आहे. प्रत्येक विद्यापीठातील काही प्रमुख अभ्यासविषय पुढीलप्रमाणे आहेत : (१) पॅरिस विद्यापीठ–१ : फ्रेंच आणि इतर आधुनिक यूरोपीय भाषा, समाजशास्त्र, सांख्यिकी. (२) पॅरिस विद्यापीठ–२: अर्थशास्त्र, विधी इ. (३) पॅरिस विद्यापीठ–३ : रंगभूमी व नाट्य, जर्मन भाषा-साहित्य, फ्रेंच भाषा-साहित्य, शारीरिक शिक्षण व खेळ इ. (४) पॅरिस विद्यापीठ –४ : धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, लॅटिन-अमेरिकन साहित्य, संगीत इ. (५) पॅरिस विद्यापीठ–५: मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, वैद्यक,सौंदर्यशास्त्र इ. (६) पॅरिस विद्यापीठ–६: गणित, संगणक विद्या, सांख्यिकी, भौतिकी, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र इ. (७) पॅरिस विद्यापीठ –७: मानववंशशास्त्र, दंतवैद्यक, प्राच्यविद्या, भाषाविज्ञान इ. (८) पॅरिस विद्यापीठ–८: स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन भाषा व साहित्ये, नगररचना, ललित कला इ. (९) पॅरिस विद्यापीठ–९ : व्यापारशास्त्र. (१०) पॅरिस विद्यापीठ–१ ०: परदेशी भाषा. (११) पॅरिस विद्यापीठ –११ : आरोग्यशास्त्र.(१२) पॅरिस विद्यापीठ–१२: तंत्रविद्या. (१३) पॅरिस विद्यापीठ–१३: संदेशवहन.

पॅरिस विद्यापीठाला प्रदीर्घ इतिहास आहे. इ.स.७८० मध्ये सम्राट शार्लमेन याने सुरू केलेल्या कॅथीड्रलमधील शाळेत त्याचा उगम दिसून येतो. तथापि पॅरिसच्या शैक्षणिक केंद्राचा शिल्पकार ⇨पीटर ॲबेलार्ड  हा होय. त्याला ‘विद्यापीठाचा जनक’ असेही गौरवाने म्हटले जाते. अकराव्या-बाराव्या शतकांत तत्कालीन चर्चनियंत्रित शिक्षण आणि शिक्षणपद्धती यांना आव्हान देऊन ॲबेलार्डने पॅरिस व त्याच्या परिसरात स्वतंत्र अध्ययनकेंद्रे चालविली. नोत्रदाम येथील शाळा हळूहळू वाढत गेली, त्याचे श्रेय ॲबेलार्डला द्यावे लागेल. कॅथीड्रल-शाळेत विद्यार्थिसंख्या वाढल्याने तेथील धर्मप्रमुखाने स्वतंत्र वर्ग चालविण्याची काही पदवीधर अध्यापकांना अनुमती दिली. अध्ययन-अध्यापनाचे केंद्र त्यामुळे कॅथीड्रलच्या बाहेर गेले. धर्मतत्त्वज्ञानादी ज्ञानशाखांचा अभ्यास पॅरिसच्या परिसरात विशेषत्वाने होऊ लागला. तत्कालीन शिक्षकांना ‘मास्टर’ म्हणत. त्यांनी चालविलेल्या शाळा पॅरिसच्या अवतीभवती पसरत गेल्या. सामान्यतः पीटर ॲबेलार्डची अध्यापनपद्धती सर्वत्र स्वीकारण्यात आली. शिक्षणव्यवस्था नियंत्रित करणाऱ्या धर्मप्रमुखाचे दडपण कमी करण्यासाठी बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हे शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यांनी मिळून स्वतंत्र संघटना(गिल्ड्स) स्थापन केल्या. या संघटना पॅरिस विद्यापीठाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा टप्पा होय. या शिक्षक-संघटना एका महामंडळाच्या रूपाने पुन्हा संघटित झाल्या. त्यास ‘स्टुडियम’ असे म्हटले जाई. पुढे ईश्वरविद्या, विधी व वैद्यक यांसारख्या उच्च शिक्षणविषयांच्या अध्ययन-अध्यापनासाठी तीन शाखा किंवा केंद्रे निर्माण झाली. पहिले विद्यार्थी महामंडळ (उदा., बोलोन्या येथील) किंवा विद्यार्थि-शिक्षक महामंडळ (उदा., पॅरिस येथील विद्यार्थि- शिक्षक संघ), दुसरे स्टुडियम (यात देशातील विद्यार्थी असत) व तिसरे स्टुडियम जनरल (यात बहुतेक परदेशी विद्यार्थी असत) या त्या शाखा होत. तीन शाखांचा हा आकृतिबंध सर्व यूरोपभर त्या काळी रूढ होता. इ.स. १२०० मध्ये फ्रान्सच्या फिलिप ऑगस्टस राजाने (दुसरा फिलिप) विद्यापीठाला एक सनद दिली. त्या काळात मानव्यविद्या, ईश्वरविद्या, विधी व वैद्यक या चार विद्याशाखा प्रमुख होत्या. यांपैकी शेवटच्या तीन शाखा या श्रेष्ठ समजल्या जात. मात्र मानव्यविद्यांच्या शाखेत विद्यार्थिसंख्या जास्त होती. या शाखेची १२२०च्या सुमारास राष्ट्रीयतेच्या आधारे फ्रेंच, पिकार्डस, इंग्लिश व नॉर्मन अशा चार केंद्रात विभागणी करण्यात आली. प्रत्येक शाखेचा प्रमुख (प्रॉक्टर) निवडला जाई आणि चारही शाखाप्रमुख एक सर्वप्रमुख त्यांतून निर्वाचित करीत. १२४५ मध्ये एका सरकारी अधिनियमाद्वारे विद्यापीठीय शिक्षणात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने काही नियम करण्यात आले.

पॅरिस विद्यापीठाच्या इतिहासात कॅथीड्रल-केंद्राचा कुलपती(चॅन्सेलर) व शिक्षक-विद्यार्थी संघटना यांच्यातील संघर्ष हा सतत निर्माण होत राहिल्याचे दिसते. कुलपतीच्या अधिकारशाहीचा निषेध करण्यासाठी हा संप झाला होता. शिक्षक (मास्टर) या पदाचा दर्जा मिळविण्यासाठी सु. १२७९च्या सुमारास संबंधित उमेदवारांना प्रबंध सादर करावा लागे व त्यासंबंधी प्रतिवाद करणाऱ्याला यशस्वीपणे तोंड द्यावे लागे. आधुनिक विद्यापीठातील पदवीदान समारंभ, बहि:स्थ परीक्षा, प्रबंधलेखन यांसारख्या पद्धतींचा उगम  पॅरिस विद्यापीठाच्या ऐतिहासिक उत्क्रांतीतूनच झाल्याचे दिसते.  

रोबेर सॉरबॉन याने १२५३ मध्ये स्वतंत्र उपनगर स्थापून तेथे १२५७ पासून धार्मिक तत्त्वज्ञानाच्या अध्ययन-अध्यापनाची व्यवस्था केली. हे केंद्र सॉरबॉन विद्याकेंद्र म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. चौदाव्या शतकात एकूण ४० महाविद्यालये पॅरिस विद्यापीठाशी संलग्न होती. यांपैकी सॉरबॉन धार्मिक तत्त्वज्ञानाचे मुख्य केंद्र होते. सतराव्या शतकात रोमन कॅथलिक चर्चविरुद्ध होणाऱ्या धर्मसुधारणा आंदोलनाला त्यातून सतत कडवा विरोध करण्यात आला. याच केंद्रात १४७०साली पहिला विद्यापीठीय छापखाना सुरू झाला. १६२९ साली कार्दीनाल रीशल्य याने सॉरबॉन येथे स्वतंत्र विद्यापीठीय वास्तू उभ्या केल्या. तेथील प्रसिद्ध चर्च १६२५ ते १६५३ च्या दरम्यान उभारले गेले.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात फ्रान्समधील इतर विद्यापीठांप्रमाणे पॅरिस विद्यापीठही बंद पडले. १८०८ साली नेपोलियनने ‘इंपीरियल युनिव्हर्सिटी’ या नावाखाली सर्व शिक्षणव्यवस्था पॅरिस केंद्राकडे सोपविली. १८१५ नंतर तिचेच नाव ‘युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्स’ असे करण्यात आले. या विद्यापीठात अनेक अकादमी होत्या. त्यांपैकी पॅरिस अकादमीत पाच विद्याशाखांचा अंतर्भाव होता. १८२१ मध्ये सॉरबॉन येथील सर्व इमारती पॅरिस अकादमीकडे सोपविण्यात आल्या. १८८५पासूनच पूर्वीच्या प्रादेशिक विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न चालू होते. १८९६साली पॅरिस विद्यापीठ पुन्हा अस्तित्वात आले. १९ च्या उत्तरार्धात पॅरिस विद्यापीठाची पुनर्रचना करण्यात आली व विद्यमान तेरा विद्यापीठे अस्तित्वात आली.

जाधव, रा. ग.