मराठवाडा कृषिविद्यापीठ : महाराष्ट्र राज्यातील परभणी येथील एक कृषी विद्यापीठ. १९७२ सालच्या राज्यशासनाच्या अध्यादेशानुसार हे विद्यापीठ स्थापन झाले. कृषी आणि संलग्‍न

विज्ञाने यांच्या अध्ययनाची तरतूद या विद्यापीठात आहे. मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद, जालना व लातूर ह्या जिल्ह्यांत विद्यापीठाचे क्षेत्र विखुरले आहे. विद्यापीठाच्या कार्यकक्षेत ४ घटक महाविद्यालये व १४ संशोधन संस्था आहेत. कृषी, पशुविकारविज्ञान, गृहविज्ञान व कृषितंत्रविद्या या प्रमुख विद्याशाखा आहेत.

विद्यापीठाने सत्र परीक्षा पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागले असून पदवीपूर्व व पदव्युत्तर सत्रांच्या कालावधींत थोडासा फरक आहे.

कृषी, पशुविकारविज्ञान आणि गृहविज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यासाठी तीन वसतिगृहे आहेत. वसतिगृहातील विद्यार्थ्याना वैद्यकीय उपचारांबाबत मोफत सल्ला देण्यात येतो. विद्यापीठीय कर्मचार्‍यांना मात्र वैद्यकीय उपचारांबाबत काही सुविधा उपलब्ध आहेत.

ग्रामसेवकांसाठी एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व साहाय्यक ग्रामसेवकांसाठी सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध आहेत. विद्यापीठाने कृषिपदवीधरांसाठी ‘स्वयं रोजगार योजना’ सुरू केली आहे. स्वत: ची शेती करणे तसेच व्यावसायिक कृषिसल्लागार सेवायोयोजनेद्वारा शेतीची प्रदती साधणे, हा या योजनेचा हेतू आहे. विद्यापीठाच्या कृषितंत्रविद्या विद्याशाखेत सूक्ष्मजीवशास्त्र, बागायत, अन्नधान्ये व भाजीपाला इ. विषय मोडतात.

विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात सूक्ष्मपटाची सोय आहे. ग्रथांलयात ४०,८७४ ग्रंथ व ७९४ नियतकालिके होती (१९८१-८२). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न ६२ लक्ष रू. व खर्च ५५ लक्ष रू. होता व विद्यापीठात १,४७५ विद्यार्थी शिकत होते.

मिसार, म. व्यं.