श्री वेंकटेश्वर विदयापीठ : आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध विदयापीठ. त्याची स्थापना २ सप्टेंबर १९५४ रोजी आंध्र प्रदेशच्या विधानसभेने संमत केलेल्या अधिनियमानुसार तिरूपती या तीर्थक्षेत्री करण्यात आली. हे विदयापीठ प्रारंभी निवासी व अध्यापनात्मक होते परंतु १९५६ मध्ये त्यास संलग्नक म्हणूनही दर्जा देण्यात आला. या विदयापीठाचे क्षेत्र अनंतपूर, चित्तूर, कडप्पा (कडाप्पा), कुर्नूल आणि नेल्लेर या पाच जिह्यांपुरते मर्यादित आहे. विदयापीठात पदव्युत्तर शिक्षण देणारी तीन केंद्रे, प्राच्यविदयांचे शिक्षण देणारी तीन महाविदयालये, दोन अभियांत्रिकी महाविदयालये, तीन शिक्षक प्रशिक्षण महाविदयालये, सहा विधी महाविदयालये, चार शारीरिक शिक्षण महाविदयालये, एक संगीत महाविदयालय आणि एक योगविदया व तत्सम विषयांचे संशोधन करणारी संस्था असून सु. १२८ संलग्न महाविदयालये आहेत (२००७). शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व तेलुगू भाषा असून दोन षण्मासांचे शैक्षणिक वर्ष असते. विदयापीठात मानव्यविदया, तंत्र व विज्ञान कक्षेतील शास्त्रे, सामाजिक शास्त्रे यांव्यतिरिक्त उर्दू, फार्सी, अरबी या भाषांच्या स्वतंत्र विदयाशाखा असून संगणकविज्ञान, औषधी व्यवस्थापन व विषाणुशास्त्र हे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय १९९८ मध्ये विदयापीठाने रेशीम उदयोग, संगणकविज्ञान, परिस्थितिविज्ञान यांत स्वयंनिर्वाही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. शिवाय कपड्यांचे अभिकल्प (ड्रेस डिझायनिंग), कपड्यांची शिलाई, मत्स्यसंवर्धन व व्यवस्थापन, पर्यटन व व्यवस्थापन हेही अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. विदयापीठाचे गंथालय समृद्ध असून त्यात सु. २,७८,९७४ गंथ होते (१९९८). गंथालयात सूक्ष्मपटांची (मायक्रो फिल्म्‌स) व्यवस्था १९९५ पासून सुरू करण्यात आली. याच वर्षी विदयापीठीय महाविदयालयांतून ३,५२९ विदयार्थी शिकत होते. विदयापीठाची काही स्वतंत्र प्रकाशने असून विदयापीठाव्दारे काही नियतकालिकेही प्रसिद्ध होतात.

देशपांडे, सु. र.