श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विदयापीठ : महाराष्ट राज्यातील केवळ स्त्रीशिक्षणासाठी स्थापन झालेले एक विदयापीठ. शिक्षणाव्दारे महिलांना स्वतंत्र व स्वावलंबी बनविणे,  तसेच सुगृहिणीपदाच्या दृष्टीने त्यांना योग्य ते शिक्षण देणे, या हेतूने थोर समाजसुधारक भारतरत्न अण्णासाहेब ( धोंडो केशव ) कर्वे यांनी ते स्थापन केले. इ. स. १९१६ मध्ये या विदयापीठाची मुंबई येथे स्थापना झाली. या विदयापीठास थोर उदयोगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाख रूपयांची देणगी दिली. त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ विदयापीठाचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विदयापीठ असे नामकरण करण्यात आले. पुढे मुंबई राज्याच्या १९५१च्या विधानसभा अधिनियमानुसार या विदयापीठास शासकीय मान्यता मिळाली आणि विदयापीठाची पुनर्रचना झाल्यामुळे, सर्व घटक महाविदयालये घटकसंस्था होऊन विदयापीठाचे स्वरूप संघात्मक (फेडरल) झाले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विदयापीठाचे कुलपती असून कुलगुरूंची नियुक्ती त्यांच्या मार्फत होते. विदयापीठातील अभ्यासक्रम स्त्रीजीवनाशी संबंधित, स्त्रीवर्गाचा सर्वांगीण विकास साधणारा असावा आणि शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे, या दोन मूलभूत बाबींवर विदयापीठाने प्रारंभापासून भर दिला आहे.

या विदया पीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. विशेष म्हणजे त्याचे क्षेत्र अखिल भारतभर आहे. विदयापीठाच्या पुणे तसेच मुंबईमधील चर्चगेट व जुहू येथील परिसरात ११ महाविदयालये व ३२ विदयापीठीय विभाग आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्न व गुजरात राज्यांतील ४४ महाविदयालये विदयापीठाशी संलग्न आहेत. विदयार्थिनींची संख्या ५०,८१३ (२००२)   होती. विदयापीठात मानव्यविदया, तंत्रविदया व विज्ञान, ललित कला व सामाजिकशास्त्रे, संगणकविज्ञान, परिचारिका अभ्यासक्रम या विषयांच्या विदयाशाखा असून संशोधनाची सोय आहे. गृहविज्ञान विषयावर अधिक भर दिला जातो. विदयापीठात सर्व विषयांतील पदवी, पदव्युत्तर व पीएच्.डी. परीक्षांची तसेच पदविका व प्रमाणपत्र परीक्षांचीही सोय आहे. तंत्रविदया व व्यवस्थापन-अभ्यास या विषयांसाठी स्वतंत्र संस्था विदयापीठाने १९९७  मध्ये सुरू केल्या. चार मान्यताप्राप्त संशोधन संस्था विदयापीठाच्या कक्षेत १९९८ पासून कार्यरत आहेत. त्यांतून प्रामुख्याने गृहविज्ञान व स्त्री-अभ्यास या शाखांत संशोधन होते. पुणे व मुंबई येथील विदयापीठाच्या गंथालयांत २,५४,००० गंथ असून अनेक महत्त्वाची नियतकालिके, संशोधन-पत्रिका, अहवाल इ. उपलब्ध आहेत. महिलांना उच्च शिक्षणाची संधी देणारी ‘ एस्. एन्. डी. टी. ’ ही आदयाक्षरे हे प्रतीकात्मक बोधचिन्ह बनले आहे.

देशपांडे, सु. र.