रविशंकर विद्यापीठ : मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. राज्यशासनाच्या विद्यापीठ अधिनियम १३ (१९६३) अन्वये रायपूर येथे १ मे १९६४ रोजी स्थापना. विद्यापीठाच्या कक्षेत रायपूर, दुर्ग, बस्तर, राजनांदगाव आणि बिलासपूर हे जिल्हे येतात. तथापि बिलासपूर येथे जून १९८३ पासून गुरू घासीदास विद्यापीठ स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप इतर सर्वसाधारण विद्यापीठांप्रमाणे आहे. विद्यापीठाच्या कक्षेत बिलासपूर, रायगड व सुर्गुजा हे जिल्हे येतात. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच वाहतूक व्यवस्थापन आणि बँकिंग व्यवस्थापन या अभ्यासक्रमांतर्गत विद्यापीठातर्फे अंतर्गुणांकन (१०.२५%) केले जाते.

रविशंकर विद्यापीठाचे स्वरूप संलग्न व अध्यापनात्मक असून त्यात १५ अध्यापन विभाग व ६१ संलग्न महाविद्यालये आहेत. १ जुलै-३० एप्रिल असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष आहे. कला व सामाजिक विज्ञाने, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यक, आयुर्वेद इ. विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी आहे.

विद्यापीठातर्फे २५ शिष्यवृत्या (दरमहा रु. ३५०) आणि १०% विद्यार्थ्यांना अर्धी व पूर्ण फी माफ करण्याची तरतूद केली जाते. विद्यापीठाचे रोजगार माहिती आणि विद्यार्थी कल्याण विभाग असून त्यातर्फे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रत्यत्न केला जातो. आरोग्यकेंद्र, शारीरिक शिक्षण व वसतिगृहे यांच्या सोयी विद्यापीठात उपलब्ध आहेत. वृत्तपत्रविद्या, शारीरिक शिक्षण (बी. पी. एड्.) हे प्रत्येकी तीन वर्षांचे अभ्यासक्रम भारतीय भाषाविज्ञानातील भाषाशास्त्र (ध्वनिशास्त्र), रशियन व इंग्रजी भाषेचा पदविका अभ्यासक्रम औद्योगिक, सामाजिक व श्रमिक कल्याण, कर्मचारी व्यवस्थापन, बँकिंग व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापन, ग्रंथालयशास्त्र इ. एक वर्षाचे अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध आहेत. महाविद्यालयांत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखांतील पदवी परीक्षा तसेच स्त्रियांना विधी विषयातील परीक्षा खाजगीरीत्या देण्याची विद्यापीठात सोय आहे.

विद्यापीठात ५९,७३० विद्यार्थी शिकत होते (१९८५-८६). याच वर्षी विद्यापीठाच्या ग्रंथालयात ६७,००० ग्रंथ व ५०५ नियतकालिके होती. (सूक्ष्मपट व झेरॉक्स प्रत यांची ग्रंथालयात सोय आहे). विद्यापीठाचे उत्पन्न ८७,३६,७११९ रु. आणि खर्च ८०,८८,७९६ रु. होता (१९८५-८६).

मिसार, म. व्यं.