महर्षि दयानंद विद्यापीठ : हरयाणा राज्यातील एक विद्यापीठ. प्रस्तुत विद्यापीठ १९ एप्रिल १९७६ रोजी रोहटकच्या आग्नेयीस असलेल्या उपनगरात स्थापन झाले. भिवनी, गरगाव, मोहिंदरगढ, रोहटक आणि सोनिपत ह्या जिल्ह्यांत विद्यापीठाचे क्षेत्र विखुरलेले आहे. विद्यापीठाचे स्वरूप संलग्न असून त्यास वरील क्षेत्रातील ६१ महाविद्यालये संलग्न आहेत.

जुलै−एप्रिल हे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून ते १४ जुलै−२० सप्टेंबर, ६ ऑक्टोबर−२० डिसेंबर व ५ जानेवारी−३० एप्रिल ह्या तीन सत्रांत विभागले आहे. विद्यापीठात १४ अध्यापन विभाग असून वृत्तपत्रविद्या विभाग वगळता अन्य विभागांत संशोधन-सुविधा उपलब्ध आहेत.

इंग्रजी, संस्कृत, हिंदी, इतिहास, समाजशास्त्र, वृत्तपत्रविद्या, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, वाणिज्य, व्यापारप्रशासन, भौतिकी, रसायनशास्त्र, गणित हे विद्यापीठाचे अध्यापन विभाग आहेत. विद्यापीठाने १९८१-८२ साली २४ गुणवत्ता शिष्यवृत्त्या, १९ साधारण शिष्यवृत्त्या, ११४ राज्यशासन शिष्यवृत्त्या तसेच ९ प्रवेश शिष्यवृत्त्या बहाल केल्या.

विद्यापीठात १९८२-८३ ह्या शैक्षणिक वर्षांत एकूण स. १,७४७ अध्यापक व सु. ४३,५२५ विद्यार्थी होते. याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न ४.२७ कोटी रुपये तर खर्च ४.१९ कोटी रुपये होता. विद्यापीठीय ग्रंथालयात १,०८,०२८ ग्रंथ व ८०० नियतकालिके होती (१९८२-८३).

मिसार, म. व्यं.