सहाध्यायी शिक्षण पद्धती : ( मॉनिटोरिअल एज्युकेशन सिस्टिम ). एक वैशिष्टपूर्ण शिक्षणपद्धती. यामध्ये शिक्षक प्रौढ विदयार्थ्यांना शिकवीत आणि हे पौढ विदयार्थी शाळेतील इतर वर्गांतील विदयार्थांना शिकवीत. भारतामध्ये प्राचीन काळात अशी वैशिष्टयपूर्ण सहाध्यायी शिक्षणपद्धती, अध्ययन-अध्यापन पद्धती अस्तित्वात होती. त्या काळात शाळा बव्हंशी एक-शिक्षकी असत. ज्या शाळांत शिकणाऱ्यांची संख्या भरपूर असे, तेथे शिक्षक हुशार विदयार्थ्यांना वा प्रौढ विदयार्थ्यांना शिकविण्याचे काम सांगत. या प्रौढ विदयार्थ्यांना नायक (मॉनिटर) म्हणतात. जो इतर विदयार्थ्यांपेक्षा अधिक कार्यक्षम व परिपक्व असतो, ज्याची वर्गातील अध्यापनासाठी तसेच व्यवस्थापनात शिक्षकांना साहाय्य व्हावे म्हणून निवड केली जाते, त्याला ‘ नायक ’ म्हणतात. ( संदर्भ : डिक्शनरी ऑफ एज्युकेशन, १९७३). अशा प्रकारे शाळेतील सर्वच विदयार्थ्यांना औपचारिक वा अनौपचारिक शिक्षण मिळत असे. यामुळे शिक्षणाच्या खर्चात कपात होत असे. कारण शाळेमध्ये फक्त एकाच शिक्षकाला पगार दयावा लागत असे. सहाध्यायी शिक्षणपद्धती प्रामुख्याने प्राथमिक शाळांतून वापरली जात असे. या पद्धतीमुळे कष्टकऱ्यांपर्यंत प्राथमिक शिक्षण जाऊन पोहोचले. बंगालमधील शिक्षणाबाबतचा १८३५-३८ या कालखंडातील अहवाल तेथील पाठशाळांतून सहाध्यायी शिक्षणपद्धती अस्तित्वात असल्याचे दर्शवितो (मूलहर्नचा अहवाल, १९५९).

जरी ही पद्धती भारतात उगम पावली असली, तरी पाश्चात्त्यांनी ती यूरोपमध्ये सुरू झाल्याचा दावा केला आहे. या पद्धतीचे भारतातील जनक कोण, याविषयीही बरेच वाद आहेत. यूरोपमध्ये मात्र ही पद्धती वेल आणि लँकास्टर यांनी एकोणिसाव्या शतकात सुरू केली, असे मानले जाते. ‘लँकास्टेरियन सिस्टिम ’ या नावानेही ती ओळखली जाते. या शतकात ती विशेषतः फ्रान्स व ग्रेट ब्रिटन येथे बऱ्याच भागांत प्रचलित होती. गुरूकुल पद्धतीत ऋषी-मुनींनी ही पद्धत सुरू केली आणि ती भारतातून ब्रिटनकडे गेली, असे मानले जाते. या पद्धतीचे महत्त्व प्रथम अँड्रयू वेल या शिक्षणतज्ज्ञाने  ओळखले. त्यावेळेस वेल हा मद्रास प्रांतातील प्रमुख धर्मोपदेशक होता. १८०१ ते १८४५ या कालखंडात इंग्लंडमध्ये या पद्धतीचा मोठया प्रमाणावर उपयोग करून प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. १८०६ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शिक्षणप्रसाराचे कार्य करणाऱ्या जोझेफ लँकास्टर या इंग्लिश शिक्षकाने अमेरिकेत या पद्धतीचा प्रथम वापर केला. या पद्धतीने तो एकावेळेस १,००० मुलांचा प्राथमिक शाळेचा वर्ग घेऊ शकत असे.

जेव्हा शिकणे हे आनंददायी असे आणि चांगले शिक्षक दुर्मिळ असत, तेव्हा ही पद्धत यशस्वी होत असे. मात्र कालांतराने शिक्षणाकडे निव्वळ शैक्षणिक दृष्टया पाहू लागल्यानंतर ही पद्धत नामशेष झाली. त्यामुळे मोठया आणि अनेक शाळांची गरज असते, हे जनतेच्या लक्षात येऊ लागले. जेथे नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले अनुभवी शिक्षक आहेत, तेथे अध्ययन आणि अध्यापन गंभीरपणे होण्याची शक्यता नाही, हेही लोकांना कळू लागले.

या पद्धतीचे अनेक फायदे होते. या पद्धतीत समूह-अध्यापनाऐवजी व्यक्तिगत अध्यापनावर भर होता. प्रत्येक विदयार्थ्याला त्याच्या बौद्धीक कुवतीप्रमाणे प्रगती करण्यास वाव होता. ज्या शाळांत विविध वयांची मुले एकत्र असत, तेथे ही पद्धत निर्विवादपणे सोयीची होती. प्रौढ मुलांचा नायक म्हणून उपयोग करण्याने शिक्षकांना थोडी उसंत तर मिळत असेच त्याबरोबरच ही मुले जे शिकली ते त्यांनी आत्मसात केले की नाही, याचीही चाचणी होत असे व या मुलांना जबाबदारीची जाणीव होत असे.

जर वर्गामध्ये मर्यादित मुले असतील व ती विविध वयांची व गुणवत्तांची असतील तर ही प्राचीन भारतीय पद्धत आजची एक आदर्श अध्यापन पद्धत म्हणून उपयोगी पडू शकेल. शिवाय ही पद्धत कमी खर्चाचीही आहे.

संदर्भ : 1. Keay, F. E. Ancient Indian Education: An Inquiry into its Origin, Development and Ideals, New Delhi, 1980.

           2. Mulhren, James, A History of Education: A Social Interpretation, New York, 1959.

           3. Naik, J. P. Nurullah, Syed, A Student’s History of Education in India, New Delhi, 1974.

बावणे,ज्योती