भोपाळ विश्वविद्यालय: मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ. स्थापना भोपाळ येथे (१ ऑगस्ट १९७०). हुशंगाबाद मार्गावर भोपाळपासून १० किमी. अंतरावर विद्यापीठ वसले आहे. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्न असून त्याच्या कार्यकक्षेत भोपाळ, सिहोरी, विदिशा आणि रायसेन या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. १९७२ पर्यंत भोपाळ जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था विद्यापीठाशी संलग्न होत्या. १९७३ साली या विश्वविद्यालयासंबंधीचा मूळचा अधिनियम रद्द करून त्याऐवजी मध्य प्रदेश विश्वविद्यालय अधिनियम करण्यात आला.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १ जुलै ते ३० जून असून त्यात तीन सत्रे असतात. कला, सामाजिक विज्ञाने, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, विधी, वैद्यक अभियांत्रिकी, शिक्षणशास्त्र, ललितकला, व्यवस्थापन ह्या विद्यापीठाच्या विद्याशाखा असून विद्यापीठीय कक्षेत २७ संलग्न महाविद्यालये आहेत. अध्ययनाचे माध्यम इंग्रजी व हिंदी आहे.

विद्यापीठाने बी. ए. व बी. कॉम्. ह्या परीक्षांसाठी पत्रद्वारा शिक्षणाची सोय केली आहे. सायं महाविद्यालये व प्रातः महाविद्यालये यांची विद्यापीठात सोय आहे. एल्‌एल्‍.एम्. आणि एम्.टेक ह्या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने सत्र परीक्षा पद्धतीचा अंगीकार केला आहे. बी.एड्. व एम्.एड्. या अभ्यासक्रमात अंतर्गत गुणांकन केला जाते. किमान तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या भारतीय अध्यापकांसाठी विद्यापीठाने १४ महिने कालावधीच्या बी.एड् अभ्यासक्रमासाठी १९८१-८२ पासून पत्रद्वारा शिक्षणाची सोय केली आहे. यांशिवाय हुषार विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे विद्यावेतनेही देण्यात येतात. क्रीडांगणे व वसतिगृहे यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो.

विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात १९७९-८० साली २७,७५९ ग्रंथ व १३० नियतकालिके होती. याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमें ६९ लक्ष रुपये व ८५ लक्ष रु. असून विद्यापीठात एकूण ३४,३१९ विद्यार्थी व ७४१ प्राध्यपाक होते.

मिसार, म. व्यं.