ब्रेल, ल्वी : (४ जानेवारी १८०९ – २८ मार्च १८५२). फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक. जन्म पॅरिसजवळील कूपर्व्हे येथे. त्याचे वडील जिनगर होते. ल्वी तीन वर्षांचा असताना डोळ्यास दुखापत होऊन त्यास अंधत्व आले. अंध असूनही स्मरणशक्तीच्या बळावर त्याने आपल्या जन्मगावी इतर मुलांबरोबरच शालेय शिक्षण घेतले. १८१९ मध्ये त्याला पॅरिस येथील राष्ट्रीय अंधशिक्षण संस्थेत दाखल करण्यात आले. तेथे ब्रेलने विज्ञान व संगीत या विषयांत विशेष प्रावीण्य संपादन केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच संस्थेत त्याने शिक्षकाची नोकरी पतकरली.

अंधांसाठी त्याने १८२४ मध्ये एक वेगळी लिपी तयार केली. ती ब्रेल लिपी या नावाने संबोधली जाते. ही लिपी आधुनिक युगात अंधांना वरदान ठरली आहे.

ब्रेल स्वतः पियानो, ऑर्गन व व्हिअलान्‌चेलो (व्हायलिनसारखे एक वाद्य) यांचा पट्टीचा वादक होता. पॅरिसमध्ये काही काळ ऑर्गनवादक म्हणूनही त्याने काम केले. निर्धनावस्थेतच फुप्फुसांचा क्षय होऊन त्याची प्रकृती ढासळली व त्यातच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर दोन वर्षांनी ब्रेल लिपीला फ्रान्समध्ये अधिकृत मान्यता मिळाली. त्याच्या मृत्युदिनाबाबत ६ जानेवारी १८५२ व २८ मार्च १८५२ अशी भिन्नता आढळते.

मिसार, म. व्यं.