इंदूर विद्यापीठ : मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. ते इंदूर येथे १९६४ मध्ये स्थापन झाले. प्रथम हे एक संलग्न विद्यापीठ होते, परंतु आता ते स्वायत्त झाले आहे. त्याचे क्षेत्र इंदूर जिल्ह्यापुरते मर्यादित असून त्याचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नकारी आहे. विद्यापीठात शिक्षणशास्त्र, परकीय भाषा (रशियन भाषा), व्यवसाय व्यवस्थापन, पदार्थविज्ञान, गणित, सांख्यिकी व अर्थशास्त्र ह्या विषयांच्या कक्षा आहेत. विद्यापीठाच्या कक्षेत पाच घटक महाविद्यालये व बावीस संलग्न महाविद्यालये आहेत. त्यांतून वरील विषयांव्यतिरिक्त विधी, वाणिज्य, वैद्यक, इतर मानव्यविद्या, विज्ञाने व तंत्रविद्या इ. विषय शिकविले जातात. विद्यापीठाचा कुलगुरू हाच प्रत्यक्षात प्रशासक असून तो पूर्णवेळ काम करतो व त्यास वेतनही दिले जाते. विद्यापीठात इंग्रजी व हिंदी अशी दोन्ही माध्यमे आहेत. १९७१-७२ साली विद्यापीठात १७,६६१ विद्यार्थी शिकत होते.

घाणेकर, मु. मा.