अभ्यासेतर कार्यक्रम, शिक्षणातील: शिक्षणाच्या नव्या दृष्टीनुसार अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला साह्य करणाऱ्या समग्र अनुभवसंहतीचा समावेश होतो. त्यामुळे अभ्यासेतर समजल्या जाणाऱ्या क्रीडा, वक्‍तृत्व, नाट्य आदी कार्यक्रमांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात येतो. त्यांना आता‘अभ्यासानुवर्ती’ वा ‘गुणविकासकार्यक्रम’ असे म्हटले जाते. विद्यार्थांच्या सामाजिक व भावनात्मक विकासासाठी तसेच त्यांच्या सुप्त गुणांचा आविष्कार करण्यासाठी त्यांची गरज आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता त्यातून प्रगटते. फुरसदीसाठी योग्य छंदांची जोपासना त्यातून घडविता येते व सांस्कृतिक वारसाही त्यातून लाभतो. म्हणून शिक्षणात सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाला आता निश्चित स्थान मिळाले आहे. समाजसेवा व कार्यानुभव हीही त्याचीच अंगे आहेत.

परंपरागत अभ्यास योजनांची व्याप्ती आता पुष्कळ वाढली असली, तरी अशा अभ्यासातून सामाजिक, नैतिक, राजकीय, वैयक्तिक दृष्ट्या जरूर अशी कित्येक मूल्ये, वृत्ती व सवयी विकसित होत नाहीत. प्रत्येक शिकलेल्या नागरिकाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनात सहभागी होऊन ते समृद्ध करावे, तो स्वावलंबी व्हावा, तो सदैव तत्पर, अभिक्रमशील, नवनव्या कल्पना-रचना मांडू शकेल असा व्हावा, ही अपेक्षा निव्वळ विषयांच्या पुस्तकी अभ्यासाने साधणार नाही. प्रत्यक्ष सामाजिक, कृतिप्रधान जीवन अनुभवून या गुणांचा, वृत्तींचा, सवयींचा विकास होतो. असे अनुभव नानाविध अभ्यासेतर कार्यक्रमांतूनच मिळतात, याची आता जाणीव झाली आहे. व्यापक अर्थाने असे कार्यक्रम खरोखरी ‘अभ्यासेतर’ नव्हेत, तर ‘अभ्यासानुवर्ती’होत. ते शिक्षणयोजनेचा आवश्यक भागच होत. 

प्राचीन भारतातील शिक्षणयोजनेत गुरुगृहवास, आश्रमजीवन हा अप्रत्यक्ष शिक्षणाचाच भाग होता. पाश्चात्त्य देशांतील मध्ययुगीन मठांबद्दलही असेच म्हणता येईल. प्राचीन ग्रीसमध्ये खेळ व स्पर्धा, वक्‍तृत्व, नाट्य संगीत मंडळे, नैमित्तिक समारंभ, विशेष मान्यता वा महत्त्वदर्शक बिरुदे, बक्षिसे यांची योजना असे. प्रवासजन्य अनुभवांचे महत्त्व सर्व काळांत मान्य केले होते. इंग्‍लंडमधील विशिष्ट उच्चपदस्थ संस्थांमधून बऱ्याच अभ्यासेतर चळवळी असत. साम्राज्य जिंकण्याची व टिकविण्याची तयारी या संस्थांतील खेळांच्या मैदानावर झाली, असे म्हटले जाते. या सर्व कार्याचे आयोजन विद्यार्थी करीत. विसाव्या शतकाबरोबर या कल्पना व पाश्चात्त्य खेळ यांना भारतातही स्थान मिळू लागले.

असे असले तरी शिक्षणसंस्थांचा, मुख्यतः शिक्षणवर्गाचा, या कार्यक्रमाबदृल दृष्टिकोन वेगळा होता. बराच शिक्षकवर्ग या कार्यक्रमापासून अलिप्त राही. अशा कार्यक्रमांकडे तो साशंकतेने पाही. पुढे खऱ्या अभ्यासाआड येणाऱ्या या गोष्टी असे मानून तो विरोधही करू लागला. अशा कार्यक्रमाची ‘नवी खुळे’ म्हणून कुचेष्टा करू लागला. पण मानसशास्त्र, शिक्षणशास्र, समाजशास्त्र यांचा विकास व पहिल्या महायुद्धामुळे आलेले नवे अनुभव व विचार यांच्या प्रभावाने अभ्यासेतर कार्यक्रमाबद्दलचा हा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला व त्याला प्रस्तुत रूप प्राप्त झाले.

अभ्यासेतर विविध कार्यक्रम (उपक्रम) व त्यांचे मुख्य गट पूढीलप्रमाणे नमूद करता येतील : (१) खेळ-प्रमुख व दुय्यम, देशी-विदेशी, त्यांच्या स्पर्धा इ. (२) सहली व शिबिरे-स्थानिक, दूरच्या, पायी, वाहनातून इ. (३) मंडळे-वाङ्‌मय, नाट्य, संगीत, कला, चर्चा, अभ्यास, वादविवाद, वक्तृत्व इ. (४) नियतकालिके-वार्ताफलक, हस्तलिखिते : पाक्षिक, मासिक, वार्षिक, शालेय, वर्गाची इ. (५) नित्य व नेमित्तिक सभा, समारंभ-राष्ट्रीय दिन, संस्थादिन, सांस्कृतिक दिन, जयंत्या, स्मृतिदिन, संमेलने, मंडळे इ. (६) स्वयंशासन-शालेय स्वराज्य, स्वायत्तता-कारभार (शाळेतील), कायदा संवर्धन-पालन, देखरेख-मंडळे इ. (७) समाजनिरीक्षण-सेवा-मंडळे, तरुणांची इतर नानाविध मंडळे, स्काउट्स (बालवीर), गर्ल गाइड्स इ.

शिवाय वरील सर्व प्रकारांमधून स्थलकालपरिस्थित्यनुरूप आणखी कित्येक नावीन्यपूर्ण कार्यक्रम निर्माण होत आहेत. अशा योजना अंमलात आणण्याबाबत आज अमेरिका, जर्मनी, रशिया असे देश फार पुढे गेले आहेत. 

या अभ्यासेतर उपक्रमामुळे निश्चित काय साधते? -एका लहानशा उदाहरणामधून याचे उत्तर मिळेल. समजा, विद्यार्थ्यांची सहल निघावयाची आहे. प्रथम सर्व विद्यार्थी मिळून सहलीची स्थूल योजना आखतात. त्या सहलीच्या सर्व कामांचे विचारपूर्वक पोटभाग निश्चित करतात. नंतर सर्व विद्यार्थ्यांचे कामांच्या भागांइतके गट करतात. प्रत्येक गटाला एक-एक पोटभागाचा सखोल अभ्यास करून तो कार्यान्वित करण्यासाठी योजना सुचविण्यास सांगतात. नंतर पुन्हा सर्व विद्यार्थी एकत्र येऊन सुचविलेल्या सर्व योजनांत अंतिम रूप देतात. त्यानुसार सहल पूर्ण करतात. परत आल्यावर अहवालरूपाने सहलीतील अनुभव शब्दांकित करून दीर्घायुषी करतात. अशा एकूण कार्यक्रमात विद्यार्थी काय शिकतात? -सामुदायिक रीतीने एखादी योजना कशी आखावी, गटांतर्गत विचार कसा करावा, एकामेकांशी कसे वागावे, नवनव्या कल्पना कशा मांडाव्या, सुधाराव्या, कार्यान्वित कराव्या, अशा कितीकरी गोष्टी ते अनुभवतात, शिकतात. याचबरोबर सहजीवनोपयोगी, समाजपोषक वृत्ती व सवयी विकसित होतात. अभ्यासेतर कार्यक्रमांच्या नानाविध उपयुक्ततांचे हे एक लहानसे उदाहरण आहे. अशा विविध कार्यक्रमांतून आणखीही मूल्ये निर्माण होतात. सामाजिक शिस्त व कायदापालन यांची सवय, सहकार्य व सहिष्णुता आणि अनपेक्षित व नवनव्या प्रश्नांची आत्मविश्वासपूर्व उकल करण्याची सवय निर्माण होते. अशी शैक्षणिक मूल्ये निव्वळ परंपरागत ज्ञाननिष्ठ विषयांच्या अभ्यासयोजनेमधून मिळणार नाहीत. म्हणून अभ्यासेतर चळवळी अभ्यासानुवर्ती मानल्या जात आहेत. अभ्यासयोजनांची व्याप्ती वाढविली जात आहे. दोन्ही एकसंघ वा एकजीव होत आहे.

हे कार्यक्रम आखण्याची व कार्यान्वित करण्याची संधी जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शिक्षकांनी सतत लक्ष ठेवावे, मार्गदर्शन करावे, पण पुढारी वा अधिकारी म्हणून नव्हे शक्यतो मागे राहून, जरूर पडेल तेव्हा मार्गदर्शन करांवे. व्यवस्थापकाने जरूर त्या किमान सोयी, साधने उपलब्ध करून द्यावी. या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड, आस्था निर्माण झाली, की विद्यार्थीसुद्धा आणखी साधने, सोयी, पैसा जमा करू लागतात. अभ्यासानुवर्ती चळवळींची योजना करताना, त्यासाठी सोयी, साधने उपलब्ध करताना नानाविध प्रश्न निर्माण होतात. जागा, मैदाने, छंदशाला, देखरेख, मार्गदर्शन, व्यवस्था ही सर्व जास्त प्रमाणात लागतात. ज्ञाननिष्ठ अभ्यास योजनानुकूल वेळापत्रक बदलावे लागते. पालक, समाज, स्थानिक व मध्यवर्ती राज्यसंस्था यांच्याशी वरचेवर संबंध येतो. त्यांचे सहकार्य घ्यावे लागते.

अभ्यासेतर कार्यक्रमांचा ज्ञाननिष्ठ अभ्यास योजनेशी संबंध काय असावा, त्यांचे एकमेकांशी प्रमाण काय असावे, याबद्दल निरनिराळी मते आहेत हे खरे. पण प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात या कार्यक्रमांचे महत्त्व निश्चितच फार मोठे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने किती कार्यक्रमांत भाग घ्यावा, याचे उत्तर आज दिले जात आहे. चळवळींच्या निरनिराळ्या गटांपैकी किमान संख्येने काही गटांत प्रत्येकाने भाग घेणे आवश्यक ठरविले असून शिवाय इच्छा, आवड, क्षमता यांनुसार जास्त वा कमी कार्यक्रमात विद्यार्थांना भाग घेता येतो. भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरव प्रशस्तिपत्रे व बक्षिसे देऊन, जाहीर नोंद करून व विशेष मान देऊन करतात. या कार्यक्रमांतील विद्यार्थ्यांच्या कार्याचे मापन करण्याचे प्रयत्‍नही चालू आहेत. एकंदरीत अभ्यासेतर चळवळी व ज्ञाननिष्ठ अभ्यास योजना यांमधील फरकांमुळे नानाविध नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण शिक्षक, शिक्षणसंस्था-चालक, समाज व राज्ययंत्रणा – सर्वांनाच अभ्यासानुवर्ती चळवळींचे महत्त्व जास्त जास्त पटू लागले आहे.

हा प्रवाह सर्व देशांत सारखाच प्रगत नाही. पण प्रत्येक ठिकाणी वाढता आहे. अमेरिका, जर्मनी, रशिया यांबाबत फार पुढे गेले आहेत. भारतातही याची प्रगती चालू आहे. येथील विशिष्ट परिस्थितीनुसार आजðशारीरिक शिक्षण आवश्यक केले आहे. साह्यकारी छात्रसेनेसारख्या योजना शिक्षणाच्या काही स्तरांवर आवश्यक तर काही ठिकाणी ऐच्छिक आहेत. भारत स्काउट्स, तरुणांची नानाविध मंडळे, सेवादले, गिर्यारोहणसंस्था अशांकडून अभ्यासानुवर्ती पूरक कार्य होत आहे. थोडक्यात, आज सगळीकडे अभ्यासेतर चळवळींचे स्थान, व्याप्ती, महत्त्व ही वाढती आहेत व अभ्यास योजनेइतकेच शौक्षणिक सामर्थ्य या कार्यक्रमांतही आहे, याचा प्रत्यय सर्वत्र येत आहे.

पहा : अभ्यास योजना शैक्षणिक शिबिरे व संमेलने युवक चळवळी.

संदर्भ : 1. McKown, H. C. Extra Curricular Activities, New York, 1952.

२. अकोलकर, ग. वि.पाटणकर, ना. वि, नव-शिक्षण : प्रवाह आणि प्रवृत्ति, पुणे, १९६१.

   

 देशपांडे, ग. श्री.