पंजाबराव कृषि विद्यापीठ : महाराष्ट्र राज्यात अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. त्यासंबंधीचा अधिनियम १९६८ साली संमत करण्यात आला होता. प्रसिद्ध कृषितज्ञ व शिक्षणतज्ञ पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या विद्यापीठास वरील नाव देण्यात आले. कृषी आणि त्या विषयाशी संलग्न विज्ञाने व मानव्यविद्या यांच्या तरतुदी करणे आणि त्यांतील प्रगत शिक्षणाची व संशोधनाची वाढ करणे राज्यातील शेती सुधारण्यासाठी व तिच्या विकासासाठी विस्तार शिक्षण हाती घेणे आणि त्याचे मार्गदर्शन करणे विद्यापीठातील निरनिराळ्या विद्याशाखांतील विषयांच्या अध्यापनाचे एकात्मीकरण व समन्वय करणे कृषिशिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणविषयक कामांचा समन्वय करणे कमी खर्चात अधिक कार्यक्षम व एकात्मीकृत शिक्षणाची तरतूद करणे अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांसाठी प्रयोगशाळा, ग्रंथालये, संशोधन संस्था, वस्तुसंग्रहालये, मत्स्यालये यांची स्थापना करणे ही या विद्यापीठाची उद्दीष्टे आहेत.

विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून विद्यापीठाच्या कक्षेत अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील महाविद्यालये येतात. विद्यापीठात संलग्नक दोन व पाच घटक महाविद्यालये असून चाळीस संशोधन केंद्रे होती, यांशिवाय सात कृषी शाळा व दोन ग्रामसेवक अध्यापन केंद्रेही होती (१९७६-७७). कृषी, कृषी अभियांत्रिकी व पशुवैद्यकशास्त्र या विद्याशाखा विद्यापीठात असून पदवी व पदव्युत्तर अम्यासासाठी विद्यापीठाने अंतर्मूल्यांकन पद्धती स्वीकारली आहे. तीनुसार परीक्षा षण्मासिक पद्धतीने वर्षातून दोन वेळा होते.

विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या १९७६-७७ मध्ये ३,५०० होती व ग्रंथालयातील ग्रंथसंख्या सु. ६५,९६४ होती तसेच १०,००० नियतकालिके या ग्रंथालयात होती.

विद्यापीठाचा वार्षिक अर्थसंकल्प सु. ४,५०,६५,७६१ रु. होता. त्यातील महाराष्ट्र शासनाचे अनुदान सु. ४,१५,९९,९६६ व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे सु. ३४,६५,७९५ रु. अनुदान स्वरूपात मिळाले होते (१९७६-७७).

विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. विद्यापीठाचे विशेष म्हणजे विद्यापीठात शिक्षणाबरोबरच संशोधन व शिक्षणविस्ताराचे काम चालते.

संकपाळ, ज. बा.