संगीतशिक्षण : जगभरातल्या जवळजवळ सर्व देशांच्या संस्कृतींचा संगीत हा अविभाज्य भाग आहे. धार्मिक विधी, उत्सव व समारंभ,  नृत्य, नाटक, चित्रपट, कथनादी कार्यक्रम, विशिष्ट व्यायामप्रकार, जादूच्या खेळासारखे रंजनप्रकार असे अनेकविध सांस्कृतिक आविष्कार संगीताची जोड देऊन सादर केले जातात व ह्या संगीतसाथीने त्यांच्या आस्वादयतेत व प्रभावात भरच पडते. कमी-अधिक फरकाने सर्वच संस्कृतींमध्ये हे दिसून येते. शालेय-महाविदयालयीन शिक्षणक्रमांत संस्कृतीच्या विविध अंगो-पांगांचा अभ्यास केला जातो, त्यामुळे त्यात संगीतशिक्षणाला महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविकच ठरते. संगीत ही मुख्यत्वे ऐकून शिकण्याची, श्राव्य स्वरूपाची विदया असल्याने, त्याच्या अध्ययन-प्रकियेत निष्ठापूर्वक श्रवण-भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व येते. संगीततज्ज्ञांच्या, गुरूंच्या पत्यक्ष मार्गदर्शनाबरोबरच, विसाव्या शतकातील इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळे उपलब्ध झालेल्या तांत्रिक साधन-सुविधांचाही (उदा., रेडिओ, ध्वनिमुद्रिका, फीत मुद्रक, रेकॉर्डप्लेअर, दूरदर्शन, व्ही.सी.आर., सी.डी. वगैरे) संगीत-शिक्षणाच्या प्रकियेत मोठाच हातभार लागला आहे. आधुनिक काळात  घरोघरी व्यक्तिव्यक्तीगणिक संगीत पोहोचविण्याच्या ह्या तांत्रिक साधनांच्या क्षमतेमुळे समाजात संगीत-साक्षरता, जाण व अभिरूची वृद्धिंगत करण्याचे कार्य मोठया प्रमाणावर घडत आहे.

पाश्चात्त्य संगीतशिक्षण : प्राचीन ग्रीक संस्कृतीत संगीताच्या  शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जात होते. प्लेटोच्या रिपब्लिक ह्या संवादात आदर्श शिक्षणव्यवस्थेत  युवकाच्या  सर्वांगीण  विकासासाठी  व्यायामविदया (जिम्नॅस्टिक्स) व संगीतसाधना महत्त्वाच्या मानल्या आहेत. सर्वसाधारण शिक्षणाची वर्गवारी या दोन शाखांमध्ये केलेली होती. व्यक्तीच्या शरीराचे संवर्धन करण्यासाठी व्यायामविदया व मनाचे संवर्धन करण्यासाठी संगीतविदया महत्त्वाची मानली गेली मात्र ‘संगीत’(म्यूझिक) ही संज्ञा प्राचीन ग्रीक काळात जास्त व्यापक अर्थाने योजिली जात असे व त्यात संगीताबरोबरच वाङ्‌मय, नाटक व दृश्य कला यांचाही समावेश केला जात असे. संगीताचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या ठायी कला व निसर्ग यांतील सौंदर्य व कुरूपता यांत भेद करण्याची क्षमता असते तसेच स्वरसंवादित्व व   लयबद्घता, त्यातील सुखद अनुभूतींसह, व्यक्तीच्या आत्म्यात प्रवेशते, अशी धारणा त्याकाळी संगीतशिक्षणाबाबत होती. ग्रीकांच्या काळात संगीत-   कलेला उच्च प्रतिष्ठा होती व त्याचा सर्वदूर प्रसार होता. कमी-अधिक  प्रमाणात  पद्धतशीर व व्यवस्थित संगीतशिक्षण त्या काळात दिले जात होते, असे  दिसून  येते.

ख्रिस्ती प्रारंभकाळात यूरोपमध्ये संगीत हे चर्चच्या सेवेशी निगडित होते त्यामुळे संगीतशिक्षण हे प्रायः धार्मिक शिक्षणाचा भाग म्हणून दिले जात असे. अनेक शाळांमध्ये पारंपरिक ‘प्लेन साँग’चे (शैलीदृष्ट्या कमी आलंकारिक असलेली, पाश्चिमात्य ख्रिस्ती धर्मविधिगीते) शिक्षण दिले  जाई. त्याचे गायन हा अभ्यासकमाचा भाग होता. विदयापीठांच्या शिक्षण-कमामध्ये ‘सात उदात्त कलां’च्या (सेव्हन लिबरल आर्ट्स) अंतर्गत संगीतकलेच्या शिक्षणाचा अंतर्भाव होता. ह्यात ‘प्लेन साँग’चे अध्ययन तर होतेच शिवाय प्राचीन रोमन तत्त्वज्ञ बोईथिअस (इ. स. सु. ४८०-५२४) याने आपल्या संगीतविषयक प्रबंधात मांडलेल्या ध्वनिशास्त्रीय सिद्धांतांचा अभ्यासही समाविष्ट होता. बोईथिअसने पाच पुस्तकांत नमूद केलेले,  ग्रीकांचे संगीतसिद्धांत शिकविले जात. पदवीचे व पदव्युत्तर (मास्टर) उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांनी सात कलांमध्ये प्रावीण्य मिळवावे, हे अपेक्षित होते. त्यामुळे साधारण प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती संगीताच्या सैद्धांतिक ज्ञानात पारंगत असे. चर्चच्या आश्रयाने उदयास आलेले धर्मकेंद्रित संगीत म्हणजेच ⇨ चर्च-संगीत हे ख्रिस्ती धर्मातील स्थित्यंतरांनुसार पुढे स्वरूपतः बदलत गेले. त्यामुळे धार्मिक संगीतशिक्षणातही काही बदल घडणे स्वाभाविकच होते. [→ मॅस (मिस्सा)].

मध्ययुगीन सरंजामशाहीच्या काळात सरदारवर्गाला लौकिक (सेक्युलर) संगीताचे शिक्षण देण्याची व्यवस्था होती. युवकांना जे सरदारकी-कलांचे (आर्ट्स ऑफ शिव्हलरी) शिक्षण दिले जाई, त्यात संगीताचा समावेश होता. ह्या शिक्षणात युवकांनी स्वतः पद्यरचना करणे, गाणे व फ्ल्यूट (सुषिर वादय) वाजविणे ह्यांचा अंतर्भाव होता. प्रबोधनकाळात (चौदावे ते सोळावे शतक) मानवतावादाचा जसा  उत्कर्ष झाला, तशी जीवनात आनंद उपभोगण्याची वृत्ती बळावली परिणामी सर्वच कलांच्या अभ्यासात एक नवी दृष्टी व तारतम्य निर्माण झाले. त्यात प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या नरूज्जीवनातून प्राप्त झालेल्या मूल्यांमुळे संगीतकलेच्या आराधनेला व संगीताच्या पद्धतशीर व्यासंगाला महत्त्व येणे क्रमप्राप्तच होते.

धर्मसुधारणा आंदोलनाच्या काळात (सोळावे शतक) ल्यूथर आणि कॅल्व्हिन पंथीयांनी एकूण शिक्षणातील संगीताच्या उपयुक्ततेवर भर देऊन संगीतशिक्षणास उत्तेजनच दिले. ⇨मार्टिन ल्यूथर (१४८३-१५४६) हा स्वतः संगीतप्रेमी व संगीताचा जाणकार होता. त्याने प्रवर्तित केलेल्या धर्मसुधारणावादी नवश्रद्धा-संप्रदायात संगीत दुर्लक्षिले जाऊ नये, असा  त्याचा आग्रह होता. अशा प्रकारे प्रस्थापित झालेली संगीतशिक्षण-परंपरा  पुढे जर्मनीत दीर्घकाळ टिकून राहिली आणि त्यानंतर जवळजवळ दोन शतकांनी ⇨फीड्रिख  द ग्रेट याने (कार. १७४०-१७८६) आपल्या आधिपत्याखालील शाळांमध्ये दर आठवडयातून तीनदा गायनपाठ घेतले  जावेत, अशी शिफारस केली. तो स्वतः फ्ल्यूट-वादक होता.

यूरोपमधील संगीतशाळांनी (साँग स्कूल्स) जवळजवळ हजार वर्षे संगीतशिक्षणात महत्त्वाचा वाटा उचलला. सर्वांत पहिली संगीतशाळा  चौथ्या शतकात, चर्चमध्ये गायिल्या जाणाऱ्या प्लेन साँगचे शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आली. पुढे सतराव्या-अठराव्या शतकांत एकूण शिक्षणकमात संगीतशिक्षणाला गौण व दुय्यम स्थान प्राप्त झाले.ब्रिटिश संगीताच्या सुवर्णयुगाचा अस्त झाला व अठराव्या शतकाच्या रूक्ष व गद्यप्राय कालखंडाला प्रारंभ झाला. अठराव्या शतकात ब्रिटिश  शिक्षणक्रमातून संगीत जवळजवळ वगळण्यात आले. फक्त अपवाद म्हणून, उच्च्कुलीन खानदानी युवतींनी हौसेखातर आत्मसात करण्याचा  एक छंद वा गुण समजून संगीताची साधना करावी, असे मानले जाऊ लागले. त्यांच्यासाठी ती एक ‘ निरागस चैन ’ (इनोसंट लक्झरी) मानली गेली.


अशा रीतीने काळाच्या ओघात संगीताचे एकूण मानवी जीवनातले मूल्य व त्या अनुषंगाने संगीतशिक्षण या संदर्भात दोन परस्परविरोधी दृष्टिकोण निर्माण झाले व कधी एक प्रभावी ठरला, तर दुसरा नगण्य ठरला. काही तज्ज्ञांच्या मते व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात-व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत, प्रगल्भ व समृद्ध होण्यात-इतर कलांप्रमाणेच संगीताचाही वाटा मोठा असतो, म्हणून सर्वसाधारण शिक्षणात संगीतशिक्षणाचा अंतर्भाव व्हावा तसेच संगीताच्या उच्च शिक्षणासाठी विशेष अध्ययनकेंद्रे स्थापन व्हावीत. या दृष्टिकोणानुसार संगीताचे शिक्षण व्यक्तीच्या सर्वसाधारण बौद्धिक व  सामाजिक सिद्धतांमध्ये मोलाची भर घालते. संगीताचा अभ्यास हा व्यक्तीच्या एकूण एकाग्रतेमध्ये व अवधान-क्षमतेत लक्षणीय सुधारणा घडवून आणतो. तद्वतच व्यक्तीच्या लेखन-वाचन-सांख्यिकी क्षमतां-मध्येही त्या योगे वाढ होऊ शकते, अशीही मते मांडण्यात आली व त्यांबाबत मतभिन्नताही नोंदवली गेली. संगीतामध्ये माणसावर नैतिक परिणाम घडवून आणण्याची शक्ती असते, व्यक्तीच्या नैतिक चारित्र्यावर  संगीताचा प्रभाव पडतो, संगीताचे मूल्य हे त्याच्या नैतिक प्रभावात असते, असे प्लेटोने म्हटले आहे (प्राचीन ग्रीक काळातील संगीत हे प्रायः धर्म-विधींशी निगडित होते, ही बाब या संदर्भात  लक्षणीय ठरावी). ह्या पहिल्या दृष्टिकोणाच्या पुष्ट्यर्थ प्लेटोचे हे मत पुढे करण्यात आले. संगीतमूल्या-विषयीच्या दुसऱ्या दृष्टिकोणानुसार संगीत हे केवळ विरंगुळ्याचे, फावला वेळ आनंदात घालविण्याचे मनोरंजक साधन आहे. त्यामुळे त्याचे शिक्षण हे केवळ छंद वा गुणांची जोपासना करण्यासाठी, ऐच्छिक स्वरूपात असावे, अशी एक दुय्यम व गौण भूमिका या दृष्टिकोणातून तयार झाली. अठराव्या शतकानंतर ह्या भूमिकेचा प्रभाव ओसरत गेला आणि एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत संगीतशिक्षणाला पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त होत गेली. पुढे संगीतशिक्षणाविषयीचे विविध दृष्टिकोण व त्यांनुसार संगीतशिक्षणाच्या भिन्न भिन्न पद्धती रूढ होत गेल्या.

विविध शिक्षणतज्ज्ञांची मते : यूरोपमधील अनेक शिक्षणतज्ज्ञ व  शिक्षण-सुधारक यांनी अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत संगीतशिक्षणाच्या संदर्भात भिन्न भिन्न मते व उपपत्ती मांडून त्यांत सुधारणा घडवून आणण्यास चालना दिली. त्यांचे संक्षिप्त निर्देश व तपशील पुढीलप्रमाणे : फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ झां झाक रूसो (१७१२-१७७८) याने दीद्रोच्या विश्वकोशात संगीतावर काही लेख लिहिले. त्याने काही नवीन संगीतरचना करून संगीतप्रेमींवर प्रभाव पाडला व संगीताचा शब्दकोश (डिक्शनरी द म्यूझिक, १७६५) सिद्ध केला. तसेच स्वरलेखन (नोटेशन) पद्धतीत सुधारणा घडवून आणल्या आणि आपल्या Emile, ou de education (१७६२, एमिली ) ह्या शिक्षणशास्त्रविषयक प्रबंधात संगीतशिक्षणाची पद्धतशीर योजना मांडली. मुलांना शिकवावयाची गाणी साधी, सोपी असावीत त्यात नाट्यमयता नसावी. मुलांमध्ये आधी संगीताची गोडी निर्माण करावी व मग स्वरलिपीचे वाचन शिकवावे हा क्रम पाळावा, असे विचार त्याने  मांडले. आधुनिक इंग्लिश संगीततज्ज्ञ जॉन कर्वनच्या (१८१६-८०) ‘वस्तू आधी व चिन्हे नंतर’ ह्या उपपत्तीची आद्य बीजे ह्या विचारांत दिसतात. प्रत्येक मुलाने स्वतः संगीतरचना करावी व तशा प्रकारचे शिक्षण त्याला दिले जावे. रूसोची ही विचारसरणी त्याच्या काळाच्या कितीतरी पुढची व आजही लागू होणारी होती. आधुनिक संगीतशिक्षणात ती खऱ्या अर्थाने अंमलात आणली गेली.

स्विस शिक्षणतज्ज्ञ ⇨पेस्टालोत्सी (१७४६-१८२७) याने शालेय शिक्षणकमात राष्ट्रीय गीतांच्या मूल्याधिष्ठित वापरावर विशेष भर दिला, तसेच विदयार्थ्यांचे नैतिक चारित्र्य घडविणारा एक घटक म्हणून गीतगायनाचे शिक्षण दिले जावे, असे मत मांडले. त्याचा एकेकाळचा सहकारी जर्मन शिक्षणतज्ज्ञ ⇨ फ्रबेल (१७८२-१८५२) याने बालकाच्या  सर्वांगीण विकासाचा एक घटक म्हणून संगीतशिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन केले. मुलांमध्ये संगीताची आस्वादन-क्षमता वाढविणे, हा संगीतशिक्षणाचा प्रधान हेतू असला पाहिजे. त्याची ही विचारसरणी आधुनिक काळात अनेक शिक्षणतज्ज्ञांनी पुरस्कृत केली.

इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकात लोकाभिमुख (पॉप्युलर) शिक्षणाच्या लाटेबरोबरच संगीतशिक्षणालाही नव्याने प्रतिष्ठा लाभली. इंग्रज कवी, समीक्षक व शाळा-निरीक्षक ⇨ मॅथ्यू आर्नल्ड (१८२२-८८) याने १८६३ च्या आपल्या शैक्षणिक अहवालात असे नमूद केले, की ‘मुलांच्या मनात शिरकाव करणे व त्यांच्या जाणिवा जागृत करणे, हे वाङ्‌मयापेक्षा  संगीतानेच जास्त सुलभ होते ’. नंतरच्या काळात शालेय अभ्यासकमात संगीतशिक्षणाला प्राधान्य येत गेले व संगीताचे पद्धतशीर, क्रमबद्ध शिक्षण दिले जाऊ लागले. कालांतराने विदयापीठीय शिक्षणातही उच्च  दर्जाच्या संगीतशिक्षणाला प्राधान्य व महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.

विदयापीठीय संगीतशिक्षणाची परंपरा वास्तविक दीर्घकाळापासून पूर्वापार चालत आली आहे. केंब्रिज व ऑक्सफर्ड या विदयापीठांनी संगीतविषयक पदव्या प्रथम प्रदान करण्यास सुरूवात केली (अनुकमे १४६३ व १५००). पुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून, नंतर स्थापन झालेल्या अनेक नव्या विदयापीठांनी स्वतंत्र संगीत-विदयाशाखा स्थापन केल्या तसेच संगीताच्या परीक्षा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारल्या. ‘जी.सी.ई.’साठी (‘जनरल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन’सर्वसाधारण शिक्षण प्रमाणपत्र) ‘ओ’ (ऑर्डिनरी-सामान्य) व ‘ए’ (ॲडव्हान्स्ड-उच्च) स्तरांवरच्या परीक्षा घेतल्या जात. ‘जी. सी. ई.’च्या अभ्यासकमात प्रत्यक्ष संगीत-सादरी-करणाची क्षमता ही आवश्यक मानली जाई व त्याच्या मूल्यांकनासाठी  ‘ असोसिएटेड बोर्ड ऑफ द रॉयल स्कूल्स ऑफ म्यूझिक ’ या संस्थेची  विशिष्ट श्रेणीची प्रमाणपत्रे गाह्य मानली जात.

इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकात ‘द रॉयल अकॅडमी ऑफ म्यूझिक’, ‘रॉयल कॉलेज ऑफ म्यूझिक’ इ. संगीतसंस्थांमार्फत विदयार्थांना संगीतातील उच्च नैपुण्याबाबत प्रमाणपत्रे दिली जाऊ लागली. १९२० नंतर संगीतविषयक विविध उपकमांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊन यूरोपमधील संगीतशिक्षणाचा व्यापक व सर्वदूर विस्तार होत गेला.

अमेरिकेमध्ये संगीततज्ज्ञ लोएल मेसन (१७९२-१८७२) याने ‘ बॉस्टन अकॅडमी ऑफ म्यूझिक ’ या संस्थेची स्थापना केली तसेच शैक्षणिक पाठ्यपुस्तके, संगीतकृतींची संकलने इ. कार्य मोठया प्रमाणावर केले. बॉस्टन येथील विदयानिकेतनमध्ये संगीत हा विषय त्याने नव्याने सुरू केला (१८३८). १८७६ मध्ये अमेरिकेत संगीतशिक्षकांची राष्ट्रीय  संघटना-‘द म्यूझिक टीचर्स नॅशनल असोसिएशन ’ स्थापन करण्यात आली. ती अद्यापही कार्यरत आहे. संगीतशिक्षणाच्या जुन्या, कालबाह्य पद्धती टाकून, आधुनिक समयोचित व प्रायोगिक पद्धती अंगीकारण्यात अमेरिका नेहमीच अगेसर राहिली आहे. अमेरिकन विदयापीठांमध्ये संगीतशिक्षणाला खास प्राधान्य असून अनेक विदयापीठांशी संलग्न अशी संगीत-विदयालये आहेत. अमेरिकेत संगीत हा अन्य कलांप्रमाणेच महत्त्वाचा सांस्कृतिक विषय मानला जातो.


विविध दृष्टिकोण व शिक्षणपद्धती : पाश्चात्त्य संगीतशिक्षणाच्या ऐतिहासिक विकासकमात वेगवेगळ्या प्रकारचे तीन तात्त्विक दृष्टिकोण व त्यांनुसार संगीतशिक्षणाच्या भिन्न पद्धती विकसित झाल्या. हे दृष्टिकोण असे : (१) विषय-केंद्रित वा पारंपरिक दृष्टिकोण, (२) विदयार्थी-केंद्रित दृष्टिकोण व (३) समाजशास्त्रीय दृष्टिकोण.

(१) विषय-केंद्रित वा पारंपरिक दृष्टिकोण : संगीत हा सौंदर्यात्मक वा कलात्मक ज्ञानाच्या प्रांतातील एक विषय असल्याने विदयार्थ्यांना पूर्वापार चालत आलेल्या सांगीतिक परंपरांची पद्धतशीर ओळख करून देणे, हे या दृष्टिकोणानुसार संगीतशिक्षणाचे अगकमाने मुख्य उद्दिष्ट  मानले जाते. ही पारंपरिक व प्रस्थापित अशी संगीतशिक्षणाबाबतची विचारसरणी असून, त्यात परंपराविरोधी वादविवादांना स्थान नसते. संगीतवादये वाजविण्याचे कौशल्य आत्मसात करणे, रूढ प्रस्थापित पद्धतीनुसार गायन शिकणे, हे या शिक्षणात अभिप्रेत असतेच पण मुख्यतः पाश्चिमात्य संगीताचा इतिहास अभ्यासणे ऑपेरा, सिंफनी, चर्च-संगीत इ. पाश्चात्त्य संगीतप्रकार, संगीतेतिहासातील प्रमुख व श्रेष्ठ पाश्चात्त्य संगीतकार व त्यांच्या प्रसिद्ध संगीतकृती यांचा अभ्यास करून विदयार्थ्यांनी त्यात पारंगतता मिळवावी, हे मुख्यतः अपेक्षित असते. संगीताच्या सैद्धांतिक ज्ञानावर या प्रणालीचा जास्त भर असतो. त्या योगे विदयार्थ्यांची सांगीतिक  साक्षरता (म्यूझिकल लिटरसी) वाढावी, संगीताची जाण व रूची  विकसित व्हावी हे उद्दिष्ट मानले जाते व त्यानुसार संगीतशिक्षणाचे अभ्यासक्रम आखले जातात.

हंगेरियन संगीतकार झॉल्तॅन कोडाइली (१८८२-१९६७) याने  हंगेरियन लोकगीतांचे संकलन केले व पारंपरिक संगीतशिक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वाचे विचार मांडले. विदयार्थ्याने गायन-वादनादी संगीतकौशल्ये  तर आत्मसात करावीतच पण त्याचबरोबर लोकसंगीत-परंपरांचाही अभ्यास करावा, असे मत त्याने मांडले. हंगेरियन लोकसंगीताच्या संशोधन-संपादनाचे जे कार्य कोडाइलीने केले, त्याचा दाखला लोकसंगीत-अध्ययनाच्या संदर्भात नेहमी दिला जातो. लोकसंगीताबरोबरच पाश्चात्त्य वादयसंगीत, स्वरमेळ यांची मूलतत्त्वे या अभ्यासक्रमात शिकविली जातात. विदयार्थ्यांचे गायन-वादन कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्यक्ष गायन-वादनाचे पाठ गिरवून घेतले जातात. विदयार्थ्यांच्या कानावर सातत्याने चांगले संगीत पडावे, स्वरलेखनपद्धतीचे वाचन व कार्य त्यांना अवगत असावे, प्रचलित वादये व त्यांचे भिन्न भिन्न प्रकार यांची वैशिष्टये व वेगळेपण ओळखण्याची क्षमता विदयार्थ्यांमध्ये यावी, तसेच महत्त्वाचे श्रेष्ठ संगीतकार व त्यांच्या प्रख्यात संगीतकृती यांचा स्थूल परिचय विदयार्थ्यांना व्हावा, अशा दृष्टींनी अभ्यासकमाची आखणी करून त्यात वरील सर्व  बाबींचा समावेश केला जातो. विदयार्थ्यांना शक्यतेनुसार वादये प्रत्यक्ष हाताळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

या पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये प्रात्यक्षिके व परीक्षा यांवर जास्त भर दिला जातो. विदयार्थ्यांच्या सैद्धांतिक संगीतज्ञानाची परीक्षा घेतली जाते, तद्वतच त्याच्या प्रत्यक्ष गायन-वादन कौशल्याचीही कडक व काटेकोर कसोट्या लावून चाचणी घेतली जाते. विदयार्थ्यांच्या गायन-वादन प्रात्यक्षिकांच्या विविध परीक्षा-पद्धती पश्चिमी देशांत सर्वत्र अमलात आणल्या जातात.

कोडाइलीप्रमाणेच जे. जे. रूसो, जॉन कर्वन यांनी पारंपरिक, प्रस्थापित संगीतशिक्षणपद्धती विकसित करण्यात तसेच स्वरलेखनपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यात मोलाचे प्रयत्न केले. त्यायोगे संगीत-साक्षरता वाढीस  लागली.

बहुजन समाजामध्ये संगीत-साक्षरता व्यापक प्रमाणात सर्वदूर प्रसृत करण्याच्या दृष्टीने आधुनिक काळात रेडिओ, ध्वनिमुद्रिका, दूरदर्शन, रेकॉर्डप्लेअर, फीत मुद्रक अशा तांत्रिक साधनांनी मोठाच हातभार लावला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेडिओ, ध्वनिमुद्रिका यांनी प्रचलित संगीतशिक्षणावर मोठा प्रभाव पाडला. घरोघरी, प्रत्येक व्यक्तीच्या कानी सुश्राव्य संगीत पडावे व त्याची सांगीतिक जाण व अभिरूची वाढावी, यासाठी या श्राव्य माध्यमांनी मोठाच हातभार लावला. श्रोत्यांचा संगीतास्वादातील सहभाग त्या योगे वाढीस लागला. त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक कांतीचा व त्यातून उपलब्ध झालेल्या तांत्रिक साधन-सुविधांचा संगीत-शिक्षणाच्या पारंपरिक (गुरू-शिष्य) पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा आहे. अशा संगीतास्वादविस्ताराच्या संदर्भात स्ट्युअर्ट  मक्फर्सन (१८६५-१९४१) व इंग्लिश संगीतशास्त्रज्ञ पर्सी स्कोल्स [१८७७१९५८ द ऑक्सफर्ड कंपॅनियन टू म्यूझिक (१९३८)या संगीतकोशाचा कर्ता] यांची कामगिरी मोलाची आहे. कार्ल सीशोअर (१८६६-१९४९) याने सांगीतिक गुणवत्ता (म्यूझिकल टॅलेंट) पारखण्याच्या पद्धतशीर कसोट्या तयार केल्या.

स्विस शिक्षणतज्ज्ञ एमील झाक-दाल्कोझ (१८६५-१९५०) हा ‘यूऱ्हिद्‌मिक’ पद्धती विकसित करणारा संगीततज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. संगीत व शारीरक्रियात्मक हालचाली यांत समन्वय साधणारी ही संगीतशिक्षण-पद्धती आहे. संगीताचा विदयार्थी हा अभिव्यक्ती व सादरी-करणातील प्रवाहीपणा यांत कमी पडतो. संगीताची तांत्रिक कौशल्ये त्याने आत्मसात केली, तरी सांगीतिक संवेदनक्षमता व संगीतातील मानसिक   गुंतवणूक यांत तो कमी पडतो, असे त्याचे मत होते. शारीर हालचालींव्दारे  ही जाण वाढवता येईल, असा त्याचा कयास होता. संगीताचा आविष्कार सादर करताना त्याला योग्य व समर्पक शारीर हालचालींची जोड दिल्यास त्यात चैतन्य निर्माण होईल, शारीर हालचालींतून विदयार्थ्यांना संगीताची भावप्रतीती येईल, या सिद्धांतावर आधारित त्याने आपली ‘ यूऱ्हिद्‌मिक ’ पद्धती बसविली. रूसोने व्यापक शैक्षणिक परिप्रेक्ष्यात बालक-केंद्रित दृष्टिकोण मांडला होता, त्याला दाल्कोझने पुष्टी दिली. पेस्टालोत्सी व फ्रबेल या शिक्षणतज्ज्ञानीही आपल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची मांडणी लहान मूल केंद्रस्थानी ठेवूनच केली होती. विदयार्थी-केंद्रित संगीतशिक्षणपद्धतीची आद्य बीजे रूसो, पेस्टालोत्सी व फ्रबेल या पूर्वसूरींच्या बालक-केंद्रित शैक्षणिक तत्त्वज्ञानात आढळतात. दाल्कोझने संगीतशिक्षण-पद्धतीत ज्या मूल्यांवर भर दिला, ती मूल्ये (संगीताची भावप्रतीती, मानसिक गुंतवणूक व त्यातून अभिव्यक्ती) पारंपरिक विषयकेंद्रित विचारसरणीपासून दूर जाणारी व मुलांच्या नैसर्गिक विकासाच्या तत्त्वाला जास्त जवळ जाणारी बालक-केंद्रित होती.

विसाव्या शतकात कला व नाट्य विषयांच्या शिक्षकांनी हीच तत्त्वे प्रमाणभूत मानून शिक्षणपद्धती विकसित केल्या. आधुनिक संगीत-शिक्षणाच्या संदर्भात कार्ल ऑर्फ (१८९५-१९८२) या जर्मन संगीततज्ज्ञाने  मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. त्याने ग्यूनिल्ड कीटमनच्या समवेत Schulwerk (इं. भा. म्यूझिक फॉर चिल्ड्रेन अनु. मार्गा रेट मरी) इ. पुस्तके लिहिली, ती शालेय संगीतशिक्षणावर सर्वांगीण प्रभाव टाकणारी ठरली.  मुलांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील सांगीतिक सर्जनशीलतेस व उत्स्फूर्त कृतिशीलतेस प्रोत्साहन देणारे अनेकविध उपक्रम त्याने त्यांत मांडले. त्यांतील स्वतंत्र संगीतरचना करण्याच्या मूलभूत प्रकियांचे विश्लेषण हे शिक्षकांसाठी उपयुक्त ठरले. कार्ल ऑर्फ हा संगीतातील प्रगतिशील विचारसरणीचा आद्य प्रवर्तक मानला जातो. त्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर संगीतशिक्षणावर पडला. ध्वनी, वादये, श्राव्य प्रशिक्षण, शारीर हालचाली, तत्कालस्फूर्तता या सर्वांचा मेळ साधून केलेले संगीत-सादरीकरण हे त्याच्या विचारसरणीचे मूळ आहे. संगीतामध्ये प्रत्यक्ष व तात्काळ मानसिक गुंतवणूक हा त्याचा पाया आहे. ‘सर्वांसाठी संगीत ’ हे तत्त्व त्याने प्रमाणभूत मानले. पौर्वात्य व पाश्चात्त्य लोकसंगीत-परंपरांतून त्याने आपली शैक्षणिक संगीतसाधने विकसित केली.


त्यानंतर साधारण वीस वर्षांनी ही परिस्थिती पालटली. संगीत-शिक्षणात मुलांच्या सर्जनशीलतेला व उत्स्फूर्ततेला अधिक वाव दिला पाहिजे एवढेच नव्हे तर, समकालीन व विद्यमान संगीतकारांची तंत्रे आणि ध्वनिसंसाधने यांचाही अवलंब केला पाहिजे, अशी विचारसरणी पुढे आली. ब्रिटनमध्ये जॉन पेंटर, कॅनडामध्ये मरे शेफर, अमेरिकेत रोनाल्ड टॉमस हे आधुनिक संगीततज्ज्ञ या विचारसरणीचे प्रवर्तक होते. या विचारसरणीनुसार टॉमसने संगीतशिक्षणाचा अभ्यासक्रम (मॅनहॅटनव्हिल म्यूझिक करिक्यूलम प्रोगॅम, १९७७) तयार केला.

(२) विदयार्थी-केंद्रित दृष्टिकोण : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विदयार्थ्याची सर्जनशीलता व उत्स्फूर्त आविष्कार हा संगीतशिक्षणाचा मूलमंत्र बनला. विदयार्थ्याने स्वतःची स्वतंत्र संगीतरचना केली पाहिजे आणि त्यासाठी संगीतशिक्षकांनी त्याला प्रेरणा व प्रोत्साहन दिले पाहिजे,  हा या विचारसरणीचा पाया होता. संगीताच्या सैद्धांतिक आणि तांत्रिक ज्ञान-संपादनावर अतिरिक्त भर देण्यापेक्षा हे ज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये विदयार्थ्यांच्या सांगीतिक कृतिशीलतेस पोषक व पूरक ठरली पाहिजेत. अशा भूमिकेतून संगीतशिक्षणाच्या अभ्यासकमाची नव्याने पुनर्रचना करण्यात आली. त्यासाठी नैसर्गिक व तांत्रिक शैक्षणिक साधनसामग्रीची संपूर्ण नवी विस्तार-कक्षा (रेंज) निर्माण केली गेली. उदा., कागद फाडणे, हात घासणे, तालबद्घ टाळ्या वाजविणे, पाय आपटणे अशा कियांतून उत्पन्न होणारे नादध्वनी येथपासून ते आधुनिक तांत्रिक साधनांव्दारे (ध्वनिमुद्रित आवाज, सिंथेसायझर, संगणक इत्यादींव्दारे) निर्माण केलेले ध्वनी इत्यादी. अशा प्रकारच्या भोवतालच्या परिसरातील अनेक नादध्वनींतून विदयार्थ्यांच्या सर्जनशीलतेस व कल्पकतेस चालना मिळावी,  तसेच त्यांच्या स्वाभाविक अनुकरणप्रियतेनुसार ह्या नादध्वनींचा स्वतःच्या संगीतरचना करताना त्यांना उपयोग व्हावा, अशी दृष्टी या शिक्षणपद्धतीत ठेवली जाते.

या पद्धतीमागे साधारणतः दोन दृष्टिकोण दिसून येतात : स्वतंत्र संगीतरचनेसारखे सर्जनशील उपक्रम हे विदयार्थांचा आत्माविष्कार म्हणून राबविले जावेत, हा एक दृष्टिकोण. दुसरा दृष्टिकोण असा, की स्वतंत्र संगीतरचना केल्याने मुलांचे संगीताचे आकलन, जाणकारी वाढेल, संगीत ‘हाताळण्या ’ची क्षमता वाढेल, त्या योगे विसाव्या शतकातील संगीत व त्याहून अधिक काही त्याला शिकता येईल. या भिन्न दृष्टिकोणांचे महत्त्व अशासाठी, की त्यात जशी निरूद्देश सर्जनशील प्रयोगशीलता येते, तसेच संगीताचा रचनाकार, सादरकर्ता व जाणकार श्रोता म्हणूनही विदयार्थ्याला संगीताचा ‘प्रत्यक्ष अनुभव घेणे’ शक्य होते.

आधुनिक संगीतशिक्षणातील ह्या बदलत्या घडामोडींचा परिणाम शिक्षकाच्या भूमिकेवरही झाला. पूर्वीच्या पारंपरिक व प्रस्थापित विषय-केंद्रित शिक्षणपद्धतीमध्ये विदयार्थ्यांनी काय शिकावे, हे शिक्षक ठरवत असे. पूर्वनियोजित व ज्ञात शिक्षणक्रमानुसार तो विविध उपक्रम राबवून शिक्षणाची दिशानिश्चिती आणि संघटन करीत असे. नव्या दृष्टिकोणानुसार विदयार्थ्यानेच पुढाकार घेऊन आपल्याला संगीतरचना करण्याच्या दृष्टीने काय शिकावयाचे आहे, हे निश्चित करणे अभिप्रेत असते. म्हणजेच विदयार्थ्यांना स्वतःचा अभ्यासक्रम स्वतःच ठरविण्याची व त्यानुसार शिकण्याची मुभा असते. संगीतरचना करण्याची पूर्वतयारी म्हणून तालमी  घेणे, एका विदयार्थी-गटाने दुसऱ्या विदयार्थी-गटासमोर आपल्या संगीत-रचना सादर करणे, शिक्षकांनी ह्या संगीतरचनांबाबत प्रश्न, शंका उपस्थित करून त्याबाबत चर्चा, विचार-विनिमय, संवाद घडवून आणणे, विदयार्थ्यांना स्वतंत्र संगीतरचना करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणे, जरूर तेथे सल्ला  देणे, मार्गदर्शन करणे हे या कृतिशील शिक्षणक्रमात अभिप्रेत असते. मात्र शिक्षकाने स्वतः संगीतरचना करणे, प्रात्यक्षिके दाखविणे वा स्वतंत्र विवेचन करणे ह्या शिक्षणपद्धतीत मोडत नाही. केवळ सल्लागार, मार्गदर्शक व प्रेरणादायक शिक्षक एवढीच त्याची मर्यादित भूमिका असते.

(३) समाजशास्त्रीय दृष्टिकोण : संगीतशिक्षणाविषयीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोण हा अगदी अलीकडेच मांडण्यात आलेला आधुनिक दृष्टिकोण होय. संगीत शिकायला येणारे विदयार्थी हे सामाजिक-वांशिक भिन्नता असलेल्या वेगवेगळ्या स्तरांतून आलेले असतात. त्यांना उच्च मध्यमवर्गीय जाणिवांनी संस्कारित झालेले संगीत शिकविल्यास ते त्यांच्या अंगवळणी पडणार नाही, तसेच संगीतशिक्षकांनाही प्रचलित व प्रस्थापित  संगीत अशा विदयार्थ्यांना शिकवणे अवघड जाते. तेव्हा विदयार्थ्यांची ही सामाजिक-वांशिक भिन्नता तसेच सांस्कृतिक वैविध्य व संपन्नता विचारात घेऊन सर्व प्रकारचे मौखिक संगीत, देश-संस्कृतिपरत्वे भिन्न भिन्न लोकसंगीत-परंपरा यांचा अंतर्भाव संगीतशिक्षणात करावा व त्यानुसार संगीतशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करावी, अशी भूमिका अलीकडच्या काळात काही समाजशास्त्रज्ञांनी मांडली आहे. कोडाइलीप्रणीत हंगेरियन लोकसंगीताचे संशोधन-संकलन हा या विचारसरणीचा पाया  आहे. एकाच वेळी एकाच समाजात अनेक भिन्न भिन्न प्रकारचे संगीत एकत्र नांदत असते आणि त्या प्रत्येक प्रकाराचा खास असा व वेगळा श्रोतृवर्गही उपस्थित असतो. जर काही सामायिक संगीत-संस्कृती म्हणून असेल, तर ती रेडिओ, रेकॉर्डप्लेअर, दूरदर्शन अशा माध्यमांव्दारे संकमित होते. त्याही-पलीकडे संगीताचे अफाट, विस्तीर्ण क्षितिज पसरले आहे. तेव्हा आदिवासी जमातींचे मौखिक संगीत, लोकसंगीताच्या भिन्न भिन्न परंपरा यांतील वैविध्य व वैपुल्य संगीतशिक्षणाच्या संदर्भात विचारात घेणे गरजेचे ठरते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत या भूमिकेत तथ्य आहे, यात शंका नाही.

संगीतशिक्षणाची मूलतत्त्वे : संगीतशिक्षणाचे दृष्टिकोण वा पद्धती कोणत्याही असोत काही मूलतत्त्वे सगळीकडे सारखीच असतात. संगीताचे सादरीकरण व रसग्रहण वा आस्वादन (ॲप्रीसिएशन) ही दोन तत्त्वे कोणत्याही शिक्षणपद्धतीत पायाभूत मानली जातात. विदयार्थ्यांना संगीताची तांत्रिक कौशल्ये शिकवावयाची, ती त्यांना गायन-वादन, स्वतंत्र-संगीतरचना यांच्या सादरीकरणासाठी उपयुक्त ठरावी म्हणून तसेच संगीताचा इतिहास, थोर संगीतकारांची चरित्रे व संगीतकृती यांची माहिती आणि ज्ञान द्यावयाचे ते त्यांची संगीताची जाणकारी वाढावी म्हणून ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून संगीतशिक्षणाचे अभ्यासक्रम आखले जावेत, हे मुख्यत: अपेक्षित आहे. आता प्रत्येक मूल हे गायक-वादक होऊ शकणार नाही हे उघडच आहे. कारण त्यासाठी लागणारी उपजत सांगीतिक प्रतिभा वा असाधारण गुणवत्ता फार थोडयंच्या ठायी असते. मात्र अशा मुलांमध्ये सुप्त रूपात असलेल्या  प्रतिभेचा शोध घेऊन ती फुलविण्यासाठी आवश्यक  ते तंत्रज्ञान, प्रेरणा व प्रोत्साहन शिक्षकांनी दिले पाहिजे. तद्वतच संगीत-शिक्षकांनी सर्वसामान्य विदयार्थ्यांची संगीताची जाण व रूची विकसित करून त्यांची संगीताची आस्वादनक्षमता वाढविणे व त्या योगे एकूण समाजात संगीत-साक्षरता प्रसृत करणे, हेही अपेक्षित आहे. विदयार्थ्याचे  भावी जीवन संगीताच्या सुजाण रसास्वादाने आनंदाने उजळून जावे, संगीताच्या साथसंगतीने त्याचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत व संपन्न बनावे, ही संगीतशिक्षणाची फलश्रूती म्हणता येईल. गायक-वादक असो, संगीतकार असो, वा सुजाण रसिक श्रोता असो, संगीत हा त्याच्या प्रत्यक्ष ‘अनुभवा’चा विषय बनला पाहिजे, संगीत त्याने साक्षात अनुभवले पाहिजे. ही अनुभूतीची क्षमता त्याच्या ठायी निर्माण करणे, हे संगीतशिक्षणाचे सर्वांत आद्य व  प्रधान उद्दिष्ट होय.

इनामदार, श्री. दे.


भारतीय संगीतशिक्षण : भारतीय संगीताचा उदय नेमका केव्हा आणि कोठे झाला, याबाबतीत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. तथापि प्राचीन हिंदू  गंथांत संगीत या विषयावर विपुल लेखन व चर्चा केल्याचे आढळते. या  प्राचीन गंथांचा अभ्यास व त्यांवर संशोधन केलेल्या विद्वानांच्या मते वैदिक ऋचांचे नादयुक्त पठण हे संगीताचे सर्वांत प्राथमिक व अविकसित  रूप मानता येईल. स्वर आणि श्रूतींचा विकास पुढे या पठणातूनच झाला असावा, असे अनेक संशोधक मानतात. प्राचीन काळी या वैदिक मंत्रांचे स्वर व लययुक्त पठण तीन स्वरांच्या आधारे होत असावे व त्यांतून पुढे सात स्वरांचा विकास झाला असावा. उपलब्ध माहितीवरून असे दिसते, की वेदपारंगत ऋचांचे पठण ठराविक व अचूक स्वरात आणि लयीत करायचे, असा कटाक्ष असे. शार्ङ्गदेवाच्या संगीतरत्नाकर (सु. १२१०-४७) या मध्ययुगीन गंथात वैदिक पठणापासून स्वरविकास कसा झाला, याचे  विस्तृत विवेचन आहे. संगीतावर अशा प्रकारचे भाष्य करणारा हा एक प्रमाणगंथ मानला जातो.

वैदिक काळापासून ते मध्ययुगापर्यंतच्या कालखंडात भारतीय संगीत जवळजवळ परिपूर्ण अवस्थेत पोहोचले होते. या कालावधीत संगीताचे व्याकरणही पूर्णपणे विकसित झाले होते, असे दिसते. पुढे मुस्लिम   आक्रमणानंतर मूळ उत्तर भारतीय संगीतावर मध्यपूर्वेतील संस्कृतीचा परिणाम झाला व आज ज्याला आपण हिंदुस्थानी संगीत (उत्तर भारतीय) म्हणतो, त्याचा उद्‌गम व विकास झाला. [→  संगीत, हिंदुस्थानी].

मध्ययुगातील आक्रमणांचा परिणाम दक्षिण भारतात फारसा न झाल्याने तेथील संगीत स्वत:चे मूळ भारतीय स्वरूप टिकवून आहे. या संगीताला आज कर्नाटक संगीत असे संबोधले जाते. [→ संगीत, कर्नाटक].

चार वेदांपैकी ⇨ सामवेद या प्राचीन गंथात संगीत विषयावर विस्तृत विवेचन केले असून संगीत हे त्या काळात मूलत: भक्तीचे व परमेश्वरप्राप्तीचे साधन मानले जात होते, यात शंका नाही. संगीताची आराधना करीत असताना मन एकाग करून परमेश्वराला प्रसन्न करून घ्यावे, किंवा संगीतसाधना करणे म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा करणे, अशा त्यामागच्या भावना होत्या. संगीतातील रागांच्या नावांचा विचार केला तरीदेखील हे लक्षात येते, की परमेश्वराचे स्मरण करूनच आराधना केली जायची. तसेच कितीतरी बंदिशींमधूनही शंकराचे, कृष्णाचे वर्णन केलेले दिसून येते. शंकरा, भैरव,  दुर्गा, सरस्वती ही नावे याची उत्तम उदाहरणे होत. संगीतातील बंदिशींमधून  जे वर्णन आढळते, त्यामध्ये विविध रसोत्पत्ती निर्माण झालेली दिसून येते. त्यातील सौंदर्य हे त्या त्या रागांनुसार म्हणजेच पर्यायाने स्वरांच्या रचनेनुसार बदलत जाते. त्यामध्ये सौंदर्याच्या अनेक छटा दिसतात. म्हणजेच स्वराला शब्दांची जोड मिळते, तेव्हा तिथे सौंदर्योत्पत्ती होते. यातूनच भक्तिरस, शांतरस, करूणरस प्रतीत होतात. याचाच अर्थ असा, की संगीतसाधना करणे म्हणजे सौंदर्यनिर्मिती करून परमेश्वराशी एकरूप होणे होय. येथे तात्त्विक विचार असा, की एकचित्ताने रियाज करत मन:शांती प्राप्त करणे, म्हणजेच  ‘संगीतसाधना’ (संगीत विद्येचा अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घेणे) होय.

गुरूह्नशिष्य परंपरा : भारतीय संगीताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णत: स्वर-ताल-लय यांतूनच निर्माण होते. त्याचे जतन व संक्रमण पूर्णपणे मौखिक माध्यमातूनच झाले आहे. रागाचे स्वरूप, त्याची बारीकसारीक वैशिष्ट्ये, व्याकरण तसेच ताल व लय यांचे ज्ञान गुरूने शिष्याला मुखाव्दारे व स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविणे, या पद्धतीनेच संगीताचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिला, यालाच ‘गुरू-शिष्य परंपरा’ असे म्हणतात. ही परंपरा म्हणजे भारतीय संगीताचे फक्त वैशिष्ट्य न राहता ते ज्ञानसंक्रमणाचे महत्त्वाचे व एकमेव माध्यम ठरले.

पूर्वीच्या काळी शिष्य गुरूगृही राहून गुरूची सेवा करीत असे व गुरू आपल्या मर्जीनुसार शिष्याची योग्यता, क्षमता व आराधना पाहून आपले ज्ञान त्याला देत असे. गुरूगृही राहून अशी साधना करणे व ज्ञानसंपादन करणे, ही खडतर तपश्चर्या अर्थातच शिष्यास करावी लागे.

घराण्यांच्या पारंपरिक शिक्षणपद्धतींची वैशिष्ट्ये : उत्तर हिंदुस्थानी संगीतातील रागदारी प्रस्तुत (सादर) करण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली  म्हणजे ‘घराणे’ असे स्थूलमानाने म्हटले जाते. प्राचीन काळात प्रतिभासंपन्न अभ्यासकांनी व कलाकारांनी आपल्या शैलींमध्ये निर्माण केलेल्या पद्धतीला पुढे एक सातत्यपूर्ण परंपरा लाभली व ती शैली गुरूमार्फत शिष्यांच्या पुढच्या पिढयंमध्ये प्रसारित होत गेली. साहजिकच राग-प्रस्तुतीकरणाच्या (सादरीकरणाच्या) अनेक पैलूंमध्ये एका ठरावीक आकृतिबंधाचा विकास होत गेला व हीच पुढे त्या त्या घराण्यांची वैशिष्ट्ये बनली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर संगीतशिक्षणाच्या एका ठरावीक पद्धतीतूनच घराणी निर्माण झाली. त्यामुळे एकूणच भारतीय, विशेषत: हिंदुस्थानी संगीतशिक्षण व  घराण्यांचा उदय आणि विकास ह्या दोन गोष्टी एकमेकींशी नेहमीच निगडित राहिल्या. [→  घराणी, संगीतातील].

घराण्यांच्या जडणघडणीमध्ये  स्वरप्रधानता,  लय,  तालप्रधानता, आवाजाचा लगाव, प्रस्तुतीकरणाचा ढाचा इत्यादींवर आधारित एक  निश्चित बैठक निर्माण झाली. अशा प्रकारच्या बैठकीला पूर्वी ‘बानी’ असे  म्हणत. सोळाव्या शतकापर्यंत अशा चार प्रकारच्या बानी अस्तित्वात होत्या. ‘ धृपद ’ या प्राचीन व काहीशा बंदिस्त गानप्रकारातून पुढे स्वतंत्र प्रतिभेला वाव देणारा, मुक्त व सौंदर्यपूर्ण असा ⇨ ख्याल हा प्रकार विकसित झाला [→ धृपद-धमार].

एकोणिसाव्या शतकात संपूर्ण भारत एका राजकीय व सामाजिक स्थित्यंतरातून जात होता. परकीय आक्रमणे व त्यानंतर इंग्रजी साम्राज्याचा भारतात शिरकाव इ. कारणांमुळे निर्माण झालेली परिस्थिती संगीताला अथवा कोणत्याच कलाप्रकाराला फारशी अनुकूल नव्हती. याच कालखंडात अनेक संस्थानिकांनी प्रतिभासंपन्न कलाकारांना राजाश्रय दिला. या कलाकारांनी स्वत:ची कलोपासना करीत बराच मोठा शिष्यपरिवारही निर्माण केला व संगीतशिक्षणाची परंपरा अखंडित ठेवली. त्या काळात असलेली दळणवळणाची त्रोटक साधने व परस्परांशी संपर्क करण्यात येणाऱ्या अडचणी यांमुळे या कलाकारांची शैली एकप्रकारे बंदिस्त राहिली व घराण्यांची सांगीतिक ओळख (म्यूझिकल आयडेंटिटी) निश्चित होत  गेली.


प्रारंभीच्या काळात आपली कला आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना देण्याचीच या कलाकारांची प्रवृत्ती होती. पण पुढे अनेक ‘ गंडाबंध ’ शागीर्द निर्माण होऊन ते आपल्या गुरू-शिष्य परंपरेचे प्रतिनिधित्व करू लागले. त्यातूनच ही कला जोपासली गेली व प्रतिभासंपन्न शिष्य ती  अधिकच समृद्घ करू लागले.

ज्याप्रमाणे घराण्यांच्या विकासामुळे स्वतंत्र शैलीचा विकास झाला, त्याचप्रमाणे त्याचा एक तोटा म्हणजे त्यात एक प्रकारचा बंदिस्तपणाही आला. काही कलाकारांच्या किंवा गुरूंच्याही दुराग्रहामुळे इतर घराण्यांत किंवा कलाकारांत काही चांगले किंवा अनुकरणीय आहे का, हे पाहण्याची जिज्ञासा विकसित होऊ शकली नाही. असे असले तरी, घराण्यांच्या विकासामुळे भारतीय संगीत समृद्घ बनले, असे म्हणावे लागेल. ⇨ किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे, आगा घराणे ही मुख्य घराणी व त्यांतून निर्माण झालेल्या ⇨ पतियाळा घराणे, इंदूर घराणे, जयपूर घराणे, रामपूर घराणे इत्यादींतून भारतीय संगीताची प्राचीन परंपरा पुढे अखंड चालू राहिली.

ही घराणी निर्माण व विकसित होण्यामागे भारतीय संगीतातील पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेतून निर्माण झालेली शिक्षणपद्धतीच कारणीभूत होती. या परंपरेचा परिणाम म्हणजे – (१) प्रतिकूल राजकीय/सामाजिक परिस्थितीतही भारतीय संगीत जिवंत राहू शकले. (२) गुरू-शिष्य परंपरेचे शैक्षणिक महत्त्व कायम राहिले आणि (३) राग, बंदिशी आणि विस्ताराच्या विविध शैलींचे जतन व विकास घडून आला आणि त्या योगे संगीत समृद्ध झाले. घराण्यांच्या गीतशिक्षणपद्धतींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील : ग्वाल्हेर, किराणा व आगा ही प्रामुख्याने तीन मूळ घराणी भारतीय संगीतात मानली जातात. गतिमानता, तालाच्या अंगाने बढत, लांब पल्ल्याच्या ताना ही ग्वाल्हेर गायकीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळे गुरू-शिष्य परंपरेत शिक्षण घेताना शिष्यास घराण्याच्या शैलीस अनुसरून तसा रियाज करावा लागे. किराणा शैली स्वरप्रधान असल्याने  त्यात आवाजाच्या लगावास अतिशय महत्त्व आहे. या परंपरेत अर्थातच लगावाचे विशेष रियाज करावे लागत. आगा शैलीचे गायन धृपदाला अधिक जवळचे आहे. त्यामुळे लयबद्घ बढत, नोमतोम इ. प्रकारांशी सुसंगत व त्यास पोषक रियाजाचे प्रकार या परंपरेत करावे लागत. अशा प्रकारे शास्त्रीय संगीताच्या शिक्षणपद्धतीत घराण्याच्या शैलीस आवश्यक व पोषक विशेष रियाजाचा समावेश असे. त्यामुळे अर्थातच एखादया विशिष्ट परंपरेचे किंवा घराण्याचे गाणे विकसित होण्यास मदत झाली.

संगीतशिक्षणातील स्थित्यंतरे : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेली तांत्रिक प्रगती, बदलते समाजजीवन इत्यादींचा संगीतशिक्षणावरही परिणाम झाला. यापूर्वी काही शतके गुरूकुल-पद्धतीत बंदिस्त असलेल्या पारंपरिक पद्धतीवरही साहजिकच या बदलांचा परिणाम झाला. सुलभ दळणवळण, संपर्कमाध्यमांत झालेली कांती, इलेक्ट्रॉनिक माध्यमांची उपलब्धता यांमुळे सर्वच कलाकारांना-संगीत अभ्यासकांना इतर घराण्यांचे गायन-वादन ऐकण्याची व अभ्यासण्याची संधी उपलब्ध झाली.

भारतीय संगीतशिक्षणपद्धतीत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत त्याचे महत्त्व टिकून आहे. परंतु इतिहास व जीवनशैली यांच्यातील परिवर्तनामुळे ही परंपरा मूळ स्वरूपात चालू ठेवणे अनेक दृष्टींनी अवघड झाले. याशिवाय संगीतातील नवीन प्रवाहांनीही आपल्या अभिजात संगीतावर अनेक प्रकारे  आक्रमण चालविले आहे. तरीही उपलब्ध साधनांचा योग्य प्रकारे वापर  करून  परंपरा  टिकवून  ठेवता  येणे  शक्य  झाले  आहे.

आजच्या परिस्थितीत भारतीय अभिजात संगीत अनेक सुविधांव्दारे ऐकण्याची सोय झाली आहे. उदा., ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती, रेडिओ, दूरदर्शन, व्ही. सी. आर., डी. व्ही. डी. प्लेअर इत्यादी. तसेच संगीतावर चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, कार्यानुभव इ. उपकमांचा  उपयोग  क्रमबद्घ शैक्षणिक पद्धतीच्या या काळात मोठया प्रमाणावर होऊ लागला आहे. तद्वतच संगीतावरील गंथसंपदा, वृत्तपत्रीय समीक्षा इ. लिखित स्वरूपाच्या माध्यमांतून कला विषयावर भरपूर लेखन होऊ लागल्याने आजच्या तरूण पिढीला अभ्यासाची फार मोठी संधी उपलब्ध झाली. अशावेळी नव्या शैक्षणिक पद्धतीची मांडणी व उपयोजन, तसेच उपयुक्त तंत्रसाधने व गुरू-शिष्य परंपरेतील यथोचित वैशिष्ट्ये यांचा अवलंब केल्याने आजची भारतीय संगीत-शिक्षणप्रणाली अधिक गतिमान, बुद्धिनिष्ठ व सर्वांगपरिपूर्ण होऊ शकते.

आधुनिक काळातील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संगीत-शिक्षणाची पुनर्रचना, चांगल्या कलावंतांचे मौलिक साहाय्य, योग्य साधनांचा योग्य पद्धतीने उपयोग, तसेच त्या विषयातील अभ्यासाची जिद्द व निष्ठा या सर्वांच्या सहयोगाने ही संगीतशिक्षण-परंपरा काहीशा आधुनिक पद्धतीने निश्चितपणाने टिकवता येईल व तसा प्रयत्न संगीतातील जेष्ठ जाणकारांकडून  केला  जात  आहे.

आधुनिक औपचारिक संगीतशिक्षण : एकीकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घराण्याच्या चाकोरीबद्धतेतून बाहेर पडत असतानाच दुसरीकडे संगीतशिक्षण अधिक शिस्तबद्ध व पद्धतशीर होण्याच्या दृष्टीने डोळस प्रयत्नही होऊ लागले. यामध्ये प्रा. बा. र. देवधर यांचा खास उल्लेख करावा लागेल. अर्थात तत्पूर्वी पं. ⇨ विष्णु दिगंबर पलुस्कर व पं. ⇨ विष्णु नारायण भातखंडे यांनी संगीतशिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य केले, हे विसरून चालणार नाही.

आधुनिकतेच्या आणि त्या अनुषंगाने अभिजात नवप्रवाहांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक काळात संगीतशिक्षणाच्या संदर्भात ज्या अनेक तत्त्व-प्रणालींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आणि एकूण प्रवाहाला जी नवी दिशा लाभली, त्यांमध्ये पं. पलुस्कर व पं. भातखंडे यांच्या कार्याचा फार मोठा सहभाग आहे. पं. वि. दि. पलुस्कर (१८७२-१९३१) यांना अत्यंत करड्या शिस्तीत त्यांचे गुरू बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडून तालीम मिळाली. आपणास गुरू-शिष्य परंपरेची शिस्त पाळून मिळालेले  हे शिक्षण व आपला संगीताचा व्यासंग अजूनही वाढवावा, या हेतूने त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी उत्तर हिंदुस्थानची वाट धरली. त्यांनी  लाहोरला १९०१ मध्ये ‘गांधर्व महाविदयालया’ची स्थापना केली. ही  संकल्पना जितकी आधुनिक वळणाची होती, तितकीच भारतीय संस्कृती-वरही आधारित होती. संगीतशिक्षण सर्वांना खुले करून देणे, क्रमवार शिस्तबद्ध अभ्यासक्रमावर आधारलेली शिक्षण-पद्धती व त्या पद्धतीस अनुरूप अशी क्रमिक संगीतशिक्षणाची पुस्तके तयार करण्यावर त्यांचा भर होता. संगीतकलेला सामाजिक प्रतिष्ठा व कलावंतांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी संगीताचा प्रसार करणे, संगीताचे शिक्षण आम जनतेला मुक्तहस्ते व अल्प खर्चात मिळावे, म्हणून ठिकठिकाणी संगीतविदयालये स्थापन करणे, गरीब कुटुंबातील होतकरू मुलांचे पालनपोषण करून त्यांना संगीतकलेचे शिक्षण देणे व त्यांच्यातून उत्तम कलाकार व संगीतशिक्षक तयार करणे, ही पं. पलुस्करांच्या शैक्षणिक कार्याची उद्दिष्टे व व्याप्ती होती. १९०८ साली त्यांनी मुंबईत गांधर्व महाविदयालयाची शाखा स्थापन केली. विष्णुबुवांनी आपल्या हयातीत शंभर-दीडशे विदयार्थ्यांचे पालनपोषण करून त्यांना संगीतविदया दिली. तसेच स्त्रियांनाही संगीतशिक्षण देण्याची खास व्यवस्था त्यांनी मुंबईच्या शाखेत केली. समाजात संगीताभिरूची निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या विदयालयांव्दारे केला. संगीतशिक्षणाचा पद्धतशीर अभ्यास-क्रम आखून, विदयार्थ्यांसाठी संगीतविषयक निरनिराळ्या परीक्षा निर्माण केल्या व त्यायोगे संगीतविषयक पदव्या विदयार्थ्यांना बहाल केल्या. त्याचप्रमाणे विदयालयातर्फे संगीत परिषदाही भरविल्या. त्यांनी स्वत:ची एक वेगळी अशी संगीतलेखनपद्धती निर्माण केली व या पद्धतीने सु. साठ पुस्तके लिहून प्रकाशित केली. आजच्या संगीतप्रसाराचे सर्वव्यापी स्वरूप हे त्यांच्या अनमोल कार्याचेच फळ होय. या त्यांच्या कार्यामुळे संगीतविद्येला साचेबद्ध बैठक तर मिळालीच, शिवाय नैतिक अधिष्ठानही लाभले. ही विदया केवळ गुरू-शिष्य परंपरेपुरतीच मर्यादित न राहता विदयालयकेंद्रित झाली. त्यामुळे कितीतरी विदयापीठांत संगीताचे विविध विभाग सुरू झाले.

पं. पलुस्करांप्रमाणेच पं. भातखंडे (१८६०-१९३६) यांनीदेखील  आधुनिक संगीतशिक्षणपद्धतीचा प्रसार व्हावा, म्हणून अथक परिश्रम घेतले. पं. भातखंडे यांच्या कार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि या संगीतशास्त्राचा  प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीतविदयालये स्थापन केली. भातखंडे संगीत महाविदयालयाचा (आधीचे लखनौ येथील ‘मॅरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्यूझिक’, स्थापना-१९२६) प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या संगीतविदयालयांसाठी त्यांनी सुसूत्र असा अभ्यासक्रम आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यांव्दारे संगीतप्रसार व्हावा, म्हणून त्यांनी अनेक संगीत-परिषदा-बडोदे (१९१६), दिल्ली (१९१८), वाराणसी (१९१९) व लखनौ (१९२४ व १९२५) – भरविण्यात पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय  संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीतसंग्रहा सारख्या गंथरचना केल्या. त्यांचे हिंदुस्थानी संगीतपद्धती (भाग ४) व हिंदुस्थानी संगीतपद्धती – क्रमिक पुस्तकमालिका (भाग ६) हे गंथ संगीतशिक्षणासंदर्भात आजही मौलिक व उद्बोधक मानले जातात. तसेच त्यांनी एक खास स्वरलिपिपद्धतीही  प्रस्थापित केली. त्यांच्या एकूण कार्याचा विचार करता रागांचे दहा ð थाटांत वर्गीकरण, घराणेदार बंदिशींचा संग्रह लिपिबद्ध करून ठेवण्याचे बहुमोल कार्य, हिंदुस्थानी संगीतावर क्रमिक पुस्तक-मालिका इ. बाबी संगीत-शिक्षणाच्या विकासक्रमात फार महत्त्वाच्या ठरतात. पं. पलुस्कर व पं. भातखंडे यांचे आणखी अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे, त्यांनी केलेली स्वरलिपीची निर्मिती. भारतीय संगीत लेखनस्वरूपातही जतन करून ठेवण्याची व्यवस्था यामुळेच शक्य झाली. एकंदरीत विचार करता, भारतीय संगीतशिक्षणाचा सुविहित व सुस्पष्ट असा आकृतिबंध या दोघांच्या कार्यामुळे तयार झाला आणि या विद्येला सार्वत्रिक प्रतिष्ठा लाभली. थोडक्यात ही कला सर्वसामान्य लोकांपर्यंत  पोहोचवली  गेली.


याचाच परिणाम म्हणजे, विविध ठिकाणी स्वतंत्र संगीतविदयालयांची निर्मिती होऊ लागली. शाळांमध्येदेखील हा विषय विदयार्थ्यांना आवडीनुसार शिकावयास मिळू लागला. महाविदयालयांतही त्याचा अभ्यास खोलवर होऊ लागला. विदयापीठीय स्तरावरदेखील संगीत हा विषय इतर विषयांप्रमाणेच व्यापक व सखोल प्रमाणात शिकविला जाऊ लागला. त्या त्या अभ्यास-कमांनुसार संगीतविषयक संदर्भगंथ विपुल प्रमाणात लिहिले गेले व गंथालयातून उपलब्ध होऊ लागले. शिवाय तालांचा अभ्यास, स्वरलेखन, थोर गायक-वादक-संगीतकारांची चरित्रे व त्यांचे सांगीतिक योगदान इ. विषयांवर लेखी परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या. 

कोलकात्याच्या संगीत-संशोधन अकादेमीत पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेच्या  साच्यात  राहूनही  संगीताच्या  नव्या   संशोधनासाठी स्वतंत्र दालनच खुले केले आहे.

अशा रीतीने संगीत विषयाचा विशेष, सखोल व व्यापक अभ्यास तसेच व्यासंग व संशोधन करता यावे म्हणून अनेक विदयापीठांत व तत्सम उच्च शिक्षणसंस्थांत मार्गदर्शक संदर्भगंथांची विपुल उपलब्धता, संगीततज्ज्ञ व गुरूंचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व आवश्यक संगीत-साधने यांची व्यवस्था केलेली दिसून येते. तेथे वेळोवेळी विविध विशेषज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळू शकते. विदयार्थी त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा, विचारविनिमय करू शकतात. चांगले संगीत-कलाकार निर्माण होण्यास हे वातावरण पोषक ठरते. 

भारतातील विद्यमान संगीतशिक्षण व्यवस्था : उच्च दर्जाचे विशेष संगीतशिक्षण देणाऱ्या भारतातील सध्याच्या उच्च शिक्षणसंस्था व खास स्वतंत्र संगीतविदयालये यांचे संक्षिप्त निर्देश व तपशील पुढे दिले आहेत : (१) दिल्ली विदयापीठ, दिल्ली : संगीत-विभाग, संगीत व ललित कला विदयाशाखा. संगीतातील पदव्युत्तर शिक्षणक्रम-हिंदुस्थानी व कर्नाटक कंठसंगीत आणि वादयसंगीत (सतार, वीणा, व्हायोलिन, सरोद, गिटार इ. वादयांचे शिक्षण) या विषयांतील एम्.ए. पदवीची सोय. (२) अलाहाबाद विदयापीठ, अलाहाबाद : संगीतातील पदविका तसेच संगीत विषयातील बी.ए. पदवीचे शिक्षण दिले जाते. (३) मुंबई विदयापीठ, मुंबई: संगीत केंद्र. या संगीत केंद्रात सुगम संगीत, संगीत-रसग्रहण, संगीत-पत्रकारिता या विषयांचे प्रमाणपत्र-अभ्यासक्रम, संगीतातील पदविका, संगीतातील एम्.एफ्.ए. पदवी यांच्या शिक्षणाच्या सुविधा आहेत. (४) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस्. एन्. डी. टी.) महिला विदयापीठ, मुंबई : स्त्रियांसाठी संगीत विषयातील बी.ए., एम्.ए. पदव्यांचे शिक्षण घेण्याची सोय. (५) मद्रास विदयापीठ, चेन्नई : संगीत विषयातील बी.ए., एम्.ए. पदव्यांचे शिक्षण दिले जाते. (६) कोलकाता विदयापीठ, कोलकाता : बी. म्यूझ. (बीएम्यूएस्) पदवी. (७) रवींद्र भारती विदयापीठ, कोलकाता : संगीतातील बी.ए., एम्.ए. पदव्या. ललित कला विदया-शाखांतर्गत वादयसंगीत व कंठसंगीत शिकविले जाते. (८) आसाम विदयापीठ, सिलचर: संगीतातील बी.ए. पदवीचे शिक्षण. (९) भातखंडे संगीत विदयापीठ, लखनौ. (१०) ‘ पी. एस्. जी. कॉलेज ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स ’, कोईमतूर (तमिळनाडू) : येथे संगीताचे, गायन-वादन प्रयोगीय कलांचे उच्च शिक्षण दिले जाते. (११) जम्मू विदयापीठ, जम्मू: संगीत विदयाशाखांतर्गत कंठसंगीत व वादयसंगीत यांत बी. म्यूझ. पदवीचे शिक्षण दिले जाते. (१२) बंगलोर विदयापीठ, बंगलोर: ज्ञानभारती केंद्रात एम्.ए. (संगीत) कंठसंगीत व वादयसंगीत या दोन्ही प्रकारांत पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा. (१३) पंजाब विदयापीठ, चंडीगढ: बी.ए. (संगीत) पदवीसाठी शिक्षण दिले जाते. (१४) बनारस हिंदू विश्वविदयालय (विदयापीठ), वाराणसी : तीन वर्षांचा बी. म्यूझ. या (कंठवादय-संगीत) पदवीसाठीचा अभ्यासक्रम, तसेच हिंदुस्थानी व कर्नाटक कंठसंगीत शिकविले जाते.  तद्वतच दोन वर्षांचा एम्.म्यूझ्. हा पदव्युत्तर शिक्षणक्रम-कंठ/वादय संगीत- हिंदुस्थानी यांत उपलब्ध तसेच संगीतशास्त्रात पदव्युत्तर शिक्षणाची  (मास्टर ऑफ म्यूझिकॉलॉजी) सुविधाही आहे. (१५) गांधर्व महा-विदयालय, नवी दिल्ली: एम्.ए. (संगीत) शिक्षणाची सोय. (१६) विनोबा भावे विदयापीठ, बिहार : येथेही संगीताचे उच्च शिक्षण दिले जाते. (१७) विक्रम विदयापीठ, उज्जैन (म. प्र.) : एम्.ए. (संगीत) शिक्षणाची सुविधा. (१८) म्हैसूर विदयापीठ, म्हैसूर: बी. एफए./एम्. म्यूझ्. पदव्यांचे शिक्षण. (१९) कला अकादमी संचालित ‘गोवा कॉलेज ऑफम्यूझिक, पणजी. (२०) अवदेश प्रताप सिंग विदयापीठ, रेवा (म. प.) : बी.ए. (संगीत). (२१) पोट्टु श्रीरामुलू तेलुगू विदयापीठ, नामपल्ली,  हैदराबाद : बी.ए./ एम्.ए. (कर्नाटक संगीत). (२२) अमरावती विदयापीठ, अमरावती: बी.ए. (संगीत). (२३) शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर: महाराष्ट्र ललित कला विभाग कंठ/वादय-संगीतातील पदविका, नृत्यविषयक पदविका, एम्.ए. (संगीत). (२४) जय नारायण व्यास विदयापीठ, जोधपूर : एम्.ए. (राजस्थानी कंठसंगीत). (२५) केरळ विदयापीठ, तिरूअनंतपुरम्: बी.ए. (ललित कला), एम्.ए. (संगीत). (२६) कुरूक्षेत्र विश्वविदयालय, कुरूक्षेत्र (हरयाणा) : पदव्युत्तर परीक्षांपर्यंत (कंठसंगीत व वादयसंगीत). (२७) पुणे विदयापीठ, पुणे: ललित कला विभाग (संगीत), पदवी व पदव्युत्तर शिक्षण. वरीलप्रमाणे विविध ठिकाणी आज भारतीय संगीतशिक्षण शास्त्रशुद्ध पद्धतीने, क्रमिक व ठराविक अभ्यासक्रमानुसार शिकविले जाते. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताच्या विविध स्पर्धांसाठीदेखील येथील विदयार्थी पाठविले जातात. अशा रीतीने संगीतसभेतील जलसे वा ⇨ मैफली यांच्या सादरीकरणाचा जो अत्यंत महत्त्वाचा भाग भारतीय शास्त्रीय संगीतात आहे, त्याची प्रात्यक्षिकेही विविध स्वरूपांत घडवून आणली जातात. उपरनिर्दिष्ट विदयापीठीय संगीतशिक्षणामुळे तसेच स्वतंत्र खाजगी संगीत विदयालयांमुळे भारतीय संगीतशिक्षण जनमानसात संकमित होण्यास व त्या योगे एकूणच समाजातील संगीतातील जाण व अभिरूची वृद्धिंगत होण्यास मोठाच हातभार लागत आहे.

पहा : संगीत संगीत, कर्नाटक संगीत, पाश्चात्त्य संगीत, हिंदुस्थानी.

संदर्भ : 1. Swanwick, Keith, A Basis for Music Education, Windsor, 1979..

            २. खाडिलकर, वसंत महादेव, श्री गंधर्ववेद : संगीत ज्ञानकोष, पुणे, १९८२.

कुलकर्णी, रागेश्री अजित.