अलाहाबाद विद्यापीठ : उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद येथे १८८७ साली स्थापन झालेले एक निवासी विद्यापीठ. त्या वेळेस याचे कार्य परीक्षा घेणे व पदव्या देणे यांपुरतेच मर्यादित होते. १९२२ च्या पुनर्रचना-कायद्याने त्याचे स्वरूप एकात्म व निवासी विद्यापीठात झाले. विद्यापीठाचे क्षेत्र १६ किमी. त्रिज्या-परिसराचे असून त्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींची वसतिगृहे आहेत. विद्यार्थांना पदवी व पदव्युत्तर परीक्षांना पूरक शिक्षण देण्याची सोय विद्यापीठाने केली आहे. १९५५ नंतर संपूर्ण पदवी-परीक्षेपर्यंत अभ्यास घेणारी आठ महाविद्यालये व एक कृषिविषयक शिक्षणसंस्था विद्यापीठास जोडण्यात आली आहे. विद्यापीठात मानव्यविद्या, वाणिज्य, विधी, वैद्यक, अभियांत्रिकी व इतर शास्त्रे ह्यांच्या अध्यापनाची सोय आहे. पदवी-परीक्षांसाठी इंग्रजी किंवा हिंदी माध्यम असून पदव्युत्तर परीक्षांसाठी इंग्रजी हे माध्यम आहे. विद्यापीठात १९७१-७२ साली सु. १५,७८३ विद्यार्थी होते.

 

मराठे, रा. म.