कारनॅप, रुडॉल्फ : (१८ मे १८९१–). जर्मन तत्त्वज्ञ व तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा एक प्रभावी पुरस्कर्ता. जन्म जर्मनीत रॉन्सडॉर्फ येथे. त्यांचे शालेय शिक्षण बार्मेन येथे व उच्च शिक्षण फ्रायबुर्ख व येना विद्यापीठांत झाले. ते ⇨गोटलोप फ्रेग (१८४८–१९२५) यांचे विद्यार्थी. त्यांच्या तत्त्वचिंतनावर फ्रेग व ⇨ बर्ट्रंड रसेल (१८७२–१९७०) यांचा प्रभाव आढळतो. त्यांनी डॉक्टरेटसाठी लिहिलेला अवकाशविषयक प्रबंध १९२२ मध्ये प्रसिद्ध झाला. १९२६ मध्ये मॉरिझ श्लिकच्या (१८८२–१९३६) निमंत्रणावरुन त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठात व्याख्याता म्हणून नोकरी स्विकारली. १९२८ मध्ये त्यांचा Der logische Aufbau der Welt (इं.शी. द लॉजिकल कन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड) हा ग्रंथ तसेच १९३४ मध्ये आकारित तर्कशास्त्रावरील Logische Syntax der Sprasche (इं.भा.लॉजिकल सिंटॅक्स ऑफ लॅंग्वेज, १९३७) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १९३५ मध्ये ते अमेरिकेतील शिकॅगो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून गेले. तेथे ते १९५२ पर्यंत होते. तेथील वास्तव्यात त्यांनी ऑटो न्यूरॉथ (१८८२–१९४५) आणि चार्ल्स मॉरिस यांच्यासोबत इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ यूनिफाइड सायन्सचे संपादन केले. १९३० ते १९४० ह्या काळात त्यांनी स्वतःच सुरु केलेल्या पण बर्लिनहून प्रसिद्ध होणाऱ्या Erkenntnis ह्या संशोधनपर नियतकालिकाचे संपादन केले. १९४३ मध्ये त्यांचा फॉर्मलायझेशन ऑफ लॉजिक हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १९५४ ते १९६१ ह्या काळात ते कॅलिफोर्निया विद्यापीठात होते.

व्हिएन्ना येथे असताना ते ‘व्हिएन्ना वर्तुळा’ चे सभासद होते. त्यांनी तेथे ⇨तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा पुरस्कार केला. विज्ञान, गणित आणि तर्कशास्त्र यांतील तात्त्विक प्रमेयांची उकल करणे, हेच तत्त्ववेत्त्यांचे प्रमुख कार्य असून, ह्या तिन्ही क्षेत्रांतील ज्ञानाची जडणघडण स्पष्ट करून त्यांच्या भाषेचे त्यांनी विश्लेषण करावयास हवे, असे त्यांचे प्रतिपादन होते. सुरुवातीचा काही काळ त्यांनी तत्त्वमीमांसाविरोधी मोहिमेत घालविला. ह्या काळातच त्यांनी लिहिलेला ‘एलिमिनेशन ऑफ मेटॅफिजिक्स’ हा लेख या दृष्टीने उल्लेखनीय होय. तत्त्वमीमांसेतील सर्वच विधाने ही भाषेच्या तार्किक व्याकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण होतात, हे त्यांचे तत्त्वमीमांसेबाबतचे निदान प्रत्यक्षार्थवादातील ‘पडताळा तत्वां’ च्या पुढची एक पायरी आहे. तत्त्व मीमांसेस विरोध हा त्यांच्या चिंतनाचा स्थायीभावच होय.

गणिताच्या तत्त्वज्ञानात त्यांनी, रसेलने आपल्या प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (१९१०–१९१३) या ग्रंथात मांडलेला गणिताच्या मूलतत्त्वांबाबतचा सिध्दांत स्वीकारला आणि केवळ गणिताचीच रचना शुद्ध तर्कातून होते असे नाही, तर आपल्या सर्वच अनुभवविश्वाची रचनाही शुद्ध तर्कातून करता येते, अशी भूमिका घेतली. गणित व विश्व यांबाबत त्यांनी मांडलेली तर्करचनेची प्रमेये, अलीकडील तत्त्वज्ञानात मागे पडली आहेत. स्वतः त्यांच्याही विचारसरणीत आता परिवर्तन झाले आहे.

सुरुवातीस त्यांचे लक्ष आकारिक तर्कशास्त्र तसेच आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या भाषेचे आकारिक स्वरूप, यांवरच केंद्रित झाले होते. तथापि ॲल्फ्रेड टार्स्कीच्या (१९०२–     ) विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडून, त्यांचे लक्ष भाषेच्या ‘अर्थ’ विषयक लक्षणांकडे वळले. यातून निर्माण झालेले त्यांचे चिंतन इंट्रोडक्शन टू सेमँटिक्स (१९४२) आणि मिनिंग ऍंड नेसेसिटी  (१९४७) ह्या ग्रंथांत आलेले आहे. विशेषतः या दुसऱ्या ग्रंथांतील त्यांचे ‘इंपिरिसिझम, सेमॅंटिक्स अँड आँटॉलॉजी’ हे प्रकरण अत्यंत मननीय आहे. कोणताही विचार चपखलपणे मांडण्यात ते सिद्धहस्त आहेत. विचारात काटेकोरपणा येण्यासाठी ते नेहमी आकारिक चौकटीचा आश्रय घेतात. भाषेच्या अर्थविषयक प्रमेयांचा ऊहापोहही त्यांनी अशा चौकटींच्या साहाय्यानेच केला आहे.

त्यांचे अगदी अलीकडील संशोधन ‘संभाव्यते’ च्या संकल्पनेवर केंद्रित झालेले असून, त्याचे परिणत स्वरूप त्यांच्या १९५० मध्ये प्रसिद्ध झालेल्या लॉजिकल फाउंडेशन्स ऑफ प्रॉबेबिलिटी  ह्या ग्रंथात दिसून येते.

संदर्भ : Schilpp, P. A. Ed. The Philosophy of Rudolf Carnap, La Salle, 1963.

बोकील, श्री.व्यं.