नंदी—२ : श्वेतांबर जैनांचे एक चूलिकासूत्र. नंदीसूत्र ह्या नावानेही ते ओळखले जाते. श्वेतांबर जैन आगमाचे ‘अंगग्रंथ’, ‘उपांग ग्रंथ’, छेदसूत्रे’ आणि ‘मूलसूत्रे’ असे वर्गीकरण झाल्यानंतर नंदी आणि अणुओगद्दार असे दोन सूत्रग्रंथ उरले त्यामुळे ह्या ग्रंथद्वयाला कोणतेही वर्गनाम नाही. सामान्यतः मूलसूत्रांच्या पूर्वी वा नंतर वर्गबाह्य असे दोन स्वतंत्र ग्रंथ म्हणून त्यांचा उल्लेख होतो. दूष्यगणीचा शिष्य देववाचक हा नंदीसूत्राचा कर्ता होय. हा नंदीसूत्रकार देववाचक आणि जैन आगम ग्रंथस्थ करणारा देवर्द्धी हे दोघे एकच होत, असे मत आतापर्यंत प्रचलित होते. चूर्णिकाराने दूष्यगणीचा शिष्य देववाचक हा नंदीसूत्राचा कर्ता होय, असा स्पष्ट उल्लेख केला आहे आणि देवर्द्धी हा तर आचार्य शांडिल्याचा शिष्य होता. तेव्हा ते दोघे एकच नव्हते तर देववाचकाने विक्रम संवत् ५२३ पूर्वी (इ. स. ४६६ पूर्वी) ते सूत्र रचिले असे ठाम मत आता मांडले जाते आणि ते ग्राह्य आहे.

हे सूत्र गद्यपद्यात्मक आहे. त्यात ९० पद्यात्मक गाथा असून ५९ गद्य सूत्र आहेत. महावीराच्या स्तवनाने सूत्राचा आरंभ केलेला आहे. पुढे २४ तीर्थंकर, ११ गणधर ह्यांचा आदरपूर्वक निर्देश आहे. नंतर एक थेरावली किंवा स्थविरावलीही (आचार्यांची सूची) देण्यात आलेली असून तीत आर्य सुधर्म्यापासून दूष्यगणीपर्यंतच्या आचार्यांचा समावेश आहे. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनःपर्यायज्ञान आणि केवलज्ञान असे ज्ञानाचे पाच प्रकार ह्या सूत्रात सांगितले आहेत. ‘सम्यक् श्रुत’ आणि ‘मिथ्याश्रुत’ हे श्रुतज्ञानाचे दोन प्रकार असल्याचे दाखवून देऊन आयारंगादी अंग्रग्रंथांचा सम्यक् श्रुतात समावेश केलेला आहे. वेद, रामायण, महाभारत, कपिलवचन, बुद्धवचन, लोकायत, कौटिलीय अर्थशास्त्र, पुराण, भागवत, पतंजलीचे ग्रंथ, ७२ कला ह्यांची गणना मिथ्याश्रुतात करण्यात आलेली आहे. मिथ्याश्रुतात काय काय येते, हे सांगत असताना आलेल्या ‘हंभीमासुरक्ख’, ‘सगभद्दिया’ अशा काही निर्देशांचा नेमका अर्थ अद्याप समाधानकारकपणे उलगडलेला नाही.

ज्ञानाचे जैनदृष्ट्या स्वरूप आणि त्याचे भेद-प्रभेद ह्यांचे विश्लेषण करणारी सुगम कृती म्हणून नंदीसूत्रास महत्त्व आहे. श्वेतांबर जैनांच्या आगमग्रंथांची नावे व त्यांची विषयसामग्री ह्यांचाही परिचय त्यातून होत असल्यामुळे उपलब्ध आगम ग्रंथ त्यांच्या मूळ स्वरूपात कितीसे राहिले आहेत, त्यांत किती परिवर्तन झालेले आहे, किती भर पडली आहे. इ. प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्याच्या प्रयत्‍नांत अभ्यासकांना ह्या सूत्राचे मोठे साहाय्य झालेले आहे.

देववाचकविरचित नंदीसूत्राशिवाय अनुज्ञानंदी अथवा लघुनंदी आणि योगनंदी अशी दोन नंदीसूत्रे आहेत. पहिल्यातील ‘अनुज्ञा शब्दाचा अर्थ आज्ञा, अनुमती, परवानगी, मंजुरी असा आहे. सामान्यतः गुरू स्वतःच्या शिष्याला कोणत्याही बाबतीत अनुज्ञा देतो, ती अनुज्ञा. प्रस्तुत अनुज्ञानंदीच्या पाठाचा उपयोग आचार्य स्वतःच्या शिष्याला गणाचा प्रमुख होण्यास अर्थात आचार्यपद धारण करण्यास अनुज्ञा देतो तेव्हा होतो. या अनुज्ञानंदीलाच लघुनंदी असेही म्हणतात. तथापि लघुनंदी म्हणजे नंदीसूत्राचा संक्षेप नव्हे हे अनुज्ञानंदीच्या पाठावरून सहज लक्षात येते.

प्रत्येक आगम ग्रंथाच्या अध्ययनाच्या सुरुवातीला मंगल म्हणून ज्या पाठाचा उपयोग करतात त्या पाठाला योगनंदी असे नाव आहे. हा पाठ म्हणजे देववाचकविरचित नंदीसूत्राचा संक्षेप आहे. योगनंदीतील ‘योग’ शब्दाचा अर्थ तपस्या असा आहे. आगमाच्या अभ्यासाचा प्रारंभ योगविधीने करावयाचा असतो. त्याच्या प्रारंभीच ह्या पाठांचा उपयोग होत असल्याने या पाठाला योगनंदी असे अन्वर्थक नाव देण्यात आले आहे.

कुलकर्णी, वा. म.