लॅमेटामाला : (अव-ट्रॅपी थर). भारतातील खडकांच्या एका गटाचे नाव. सामान्यपणे नर्मदेच्या खोऱ्यातील⇨बाघ थरांच्या वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा किंचित नवे असलेल हे थर नदीमुखात किंवा नदीच्या खोऱ्यात गाळ साचून बनले आहेत. हे थर विस्तृतपणे पसरलेले असून जबलपूरजवळील लॅमेटा घाटात प्रथम आढळल्यामुळे त्यांना लॅमेटा माला हे नाव पडले आहे. 

गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व दख्खनच्या पुष्कळ भागांत हे खडक उघडे पडलेले आढळतात. उदा., नागपूर, भंडारा, चंद्रपूर तसेच जबलपूर, इंदूर, निमार, नरसिंगपूर, सेबनी, ग्वाल्हेर, दक्षिण रेवा, झालवार, पंचमहाल अलि-राजपूर इ. जिल्हे गोदावरी व वर्धेचे खोरे, नर्मदा खोऱ्याचा पश्चिम भाग, बांदरचे दगडी कोळसा क्षेत्र, कारा (गुजरात) अमरकंटक टेकड्या, कलादगी (कर्नाटक) व हैदराबादजवळ वगैरे. विशेषकरून⇨दक्षिण ट्रॅपच्या ईशान्य व पूर्व सीमेभोवती वा ट्रॅपच्या खाली पातळ, अरुंद व खंडित पट्ट्यांच्या रूपात हे खडक आढळतात. आडव्या विस्ताराच्या मानाने यांची जाडी कमी म्हणजे ६ ते ४५ मी. आहे. चर्टयुक्त अथवा सिलिकामय चुनखडक, मातकट वालुकाश्म, संकोण वालुकाश्म, मृत्तिका किंवा शेल हे यातील प्रमुख खडक असून ते सर्व फिकट रंगाचे व गोड्या पाण्यात निक्षेपित झालेले आहेत. चुनखडक हा यांतील वैशिष्ट्यपूर्ण खडक असून तो वालुकामय वा रेवयुक्त असतो किंवा त्याच्यात चर्ट, क्वॉर्ट्झ वा सूर्यकांतमणी (जॅस्पर) या सिलिकामय खनिजांचे खडे वा गाठी असतात. वरच्या खडकांतून झिरपून येणाऱ्या सिलिकायुक्त पाण्याद्वारे असे सिलिकाभवन नंतर झालेले असते. कधीकधी वालुकाश्मातही असे सिलिकाभवन झालेले आढळते. सामान्यतः चुनखडकाचा थर सर्वात वर असतो. काही ठिकाणी चुनखडकात अर्धवट टिकून राहिलेले थोडेसेच जीवाश्म (शिळारूप झालेले जीवांचे अवशेष) आढळतात. लॅमेटा मालेतील म्हणून ओळखले जाणारे पुष्कळ चुनखडक हे कायांतरणाने बनलेले असावेत, असे एल्.एल्.फर्मॉर यांचे मत आहे. म्हणजे वरील थरांतून झिरपत येणाऱ्या पाण्याच्या क्रियेद्वारे रेणूंची अदलाबदल होऊन लॅमेटा खडकांच्या खालील⇨आर्कीयन खडकांचे कॅल्शियम कार्बोनेटात रूपांतर होऊन हे चुनखडक बनले असावेत. अशा बदलांचे सर्व टप्पे यांत पहायला मिळतात व त्यांच्यात जीवाश्म आढळत नाहीत. 

यांतील वालुकाश्म सूक्ष्मकणी, सच्छिद्र व हिरवट असून काही ठिकाणी भरडकणी वालुकाश्म व पिंडाश्मही आढळतात. लॅमेटातील मृत्तिका लाल वा हिरव्या असून पुष्कळदा त्यांच्यात वाळू, मार्ल व कधीकधी कॅल्शियम कार्बोनेटाच्या गाठी असतात. वालुकाश्म व मृत्तिका यांच्यात मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यांची कवचे, तसेच डायनोसॉर, कासव व काही मासे या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांचे जीवाश्म व विष्ठाश्म आढळतात. यांपैकी माशांच्या अवशेषांवरून सर ऑर्थर स्मिथ वुडवर्ड यांनी या मालेचे वय डॅनियन व पूर्व इओसीन या दरम्यानचे (सु. चार ते साडेचार कोटी वर्षापूर्वीचे) काढले आहे, तर डायनोसॉरांच्या अवशेषांवरून एफ्.फोन ह्युएन यांनी या मालेतील जबलपूरलगतच्या खडकांचे वय तुरोनियन किंवा उत्तर क्रिटेशसच्या तळाच्या वयाइतके (सु. १४ कोटी वर्षापूर्वीएवढे) काढले आहे.

जबलपूर व पिसदुरा येथील लॅमेटा थरांत आढळलेल्या क्रिटेशस कालीन (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) डायनोसॉरांच्या अवशेषांमुळे या प्राण्यांच्या माहितीत भर पडून नवीन १२ प्रजाती (उदा., टिटॅनोसॉरस लॅमेटासॉरस इ.) पुढे आल्या. गुजरातमध्ये खेडा (बाळासिनोर व रहियोली भाग) व पंचमहाल जिल्ह्यांत, मध्ये प्रदेशात जबलपूरजवळ व महाराष्ट्रात पिसदुरा येथे या मालेच्या खडकांत डायनोसॉराची अंडी १९८२ साली सापडली असून हा शोध महत्त्वाचा आहे. या काळात भारतातील डायनोसॉरांची सर्वाधिक भरभराट झाली होती. मध्य प्रदशातील डायनोसॉरांचे जीवाश्म हे मादागास्कर, पेंटागोनिया व ब्राझील येथील जीवाश्मांसारखे असल्याचे ह्युएन यांचे मत असून यामुळे ⇨गोंडवन भूमी किंवा भूसेतू [⟶ खंडविप्लव] या संकल्पनेला पुष्टी मिळते. 

आर्कीयन पट्टिताश्म, उत्तर गोंडवनी संघातील खडक व बाघ थरांतील खडक या अधिक जुन्या खडकांवर लॅमेटा मालेतील खडक विसंगतपणे वसलेले आहेत आणि पुष्कळ ठिकाणी लॅमेटा थरांवर दक्षिण ट्रॅपचे लाव्हा थर सुसंगतपणे वसलेले आढळतात. झाबुआ येथे तर या लाव्हा थराच्या उष्णतेचा परिणामही लॅमेटा खडकांवर झालेला आढळतो. अशा तर्हेने काही तज्ञ लॅमेटा थर हे दक्षिण ट्रॅपचा भाग असल्याचे मानीत, तर काही जण यांचा संबंध बाघ थरांशी जोडीत आणि अन्य काही गोंडवनी संघातील महादेव गटाचा एक घटक म्हणून लॅमेटा मालेची गणना करीत. तथापि महादेव गट लॅमेटा मालेपेक्षा अधिक जुना असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे उत्तर गोंडवनी संघाचा माथा व दक्षिण ट्रॅप यांच्या दरम्यानचा बहुतेक काळ लॅमेटा थरांनी व्यापला असण्याची शक्यता गृहीत धरतात.

पहा : गोंडवनीसंघ.  

ठाकूर, अ. ना.