डेव्हिड्झ, टॉमस विल्यम रीस : (१२ मे १८४३ – २८ डिसेंबर १९२२). प्रख्यात प्राच्यविद्यापंडित व बौद्ध धर्माचे अभ्यासक. जन्म इंग्लंडमध्ये कोलचेस्टर येथे. ब्राइटन येथील विद्यालयात व ब्रेस्लौ विद्यापीठात शिक्षण घेतल्यावर सनदी सेवेत त्यांची श्रीलंका येथे नेमणूक झाली. श्रीलंकेत असतानाच पाली भाषासाहित्याकडे त्यांचे लक्ष वेधले जाऊन त्यांनी त्याचे सखोल अध्ययन सुरू केले. ह्या विषयाबद्दल त्यांना इतकी आवड उत्पन्न झाली, की आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते इंग्लंडला परत गेले आणि स्वतःस त्यांनी या विषयाच्या अभ्यासास संपूर्णपणे वाहून घेतले. १८८१ मध्ये त्यांनी ‘हिबर्ट व्याख्याने’ दिली. या वेळीच त्यांनी ‘पालिटेक्स्ट सोसायटी’ ची स्थापना करण्याचा आपला मनोदय जाहीर केला आणि १८८२ मध्ये सोसायटीची स्थापनाही केली. हिबर्ट व्याख्याने दिल्यानंतर १८८२ मध्ये लंडनच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेजा’त पाली भाषासाहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९५ मध्ये ‘ओरिएंटल ट्रान्सलेशन फंड’ आणि १९०० मध्ये ‘इंडियन टेक्स्ट सीरीज’ ची त्यांच्या प्रयत्नाने स्थापना झाली. १८९४ मध्ये ते कॅरोलायना ऑगस्टा फोली (१८५७–१९४२) यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीनेही अनेक पाली ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे करून तसेच तत्त्वज्ञानपर पाली ग्रंथांचे संपादन व विवरणासह इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध करून आपल्या पतीच्या आवडत्या कार्यास चांगलाच हातभार लावला. १९०४ मध्ये डेव्हिड्झ यांची मँचेस्टर येथे तुलनात्मक धर्माचे प्राध्यापक म्हणून निवड झाली. काही काळ त्यांनी ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ चे सचिव व ग्रंथपाल म्हणूनही काम केले.

डेव्हिड्झ यांनी दीघनिकाय (१८८९–१९३१, ई. कार्पेंटर ह्यांच्या समवेत), अभिधम्मत्थ संग्रह (१८८४), दाठावंस (१८८४) ह्या ग्रंथांचे संपादन केले तसेच दीघनिकाय (१८९९-१९२१) आणि मिलिंदपन्ह (१८९० – ९४) हे ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करून प्रसिद्ध केले. हेर्मान ओल्डेनबेर्ख ह्यांच्यासमवेत त्यांनी विनयपिटकातील ‘पातिमोक्ख’, ‘महावग्ग’ व ‘चुल्लवग्ग’ यांची इंग्रजीत भाषांतरेही केली (३ खंड, १८८१, ८२ व ८५). बुद्धिझम (१८७८), द हिस्टरी अँड लिटरेचर ऑफ बुद्धिझम (१८९६) बुद्धिस्ट इंडिया (१९०३), अर्ली बुद्धिझम (१९०८) इ. महत्त्वपूर्ण स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले. आयुष्याच्या शेवटच्या काळात डॉ. विल्यम स्टेड यांच्यासमवेत त्यांनी ‘पाली-इंग्रजी कोशा’चेही काम केले.

डेव्हिड्झ पतिपत्नींनी ‘पाली टेक्स्ट सोसायटी’ च्या कार्यात आपले सर्व जीवन वेचले. त्यांनी पाली ग्रंथ रोमन लिपीत प्रसिद्ध केल्यामुळे, पाली भाषा-साहित्याच्या अभ्यासाला यूरोप-अमेरिकेत जोराची चालना मिळाली. आपल्या मौलिक कार्यामुळे डेव्हिड्झ दांपत्याचा बौद्ध जगतात मोठा लौकिक झाला.

बापट, पु. वि.