फ्लिंट-२: सिलिकामय, घट्ट, कठिण व चिवट खडक. हा खडक गूढस्फटिकी आहे म्हणजे याच्यातील स्फटिक अगदी सूक्ष्म असल्याने ते नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. पूर्वी सर्व कठीण खडकांना फ्लिंट म्हणत असत. आता बहुतकरून चॉक या चुनखडकामधील सिलिकामय संधितांना (मध्यवर्ती कणाभोवती पाण्याद्वारे सिलिका साचून बनलेल्या राशींना) फ्लिंट म्हणतात व इतरांना ⇨ चर्ट म्हणतात. हा खडक समांग, मेणासारखी चमक असलेला असून त्याचे भंजन म्हणजे फुटलेल्या तुकड्याचे पृष्ठ शंखाभ असते. याचा रंग बहुधा धुरकट करडा वा काळा असून कधीकधी मंद पिवळा, तपकिरी अथवा निळा या रंगांचे प्रकारही आढळतात. हा मुख्यत्वे सिलिकेचा (९८%) बनलेला असून त्यात पाणी (१·५%), लोह, ॲल्युमिनियम, कार्बन व जैव पदार्थ ही मलद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. हा अपारदर्शक आहे मात्र याची पातळ चकती दुधी काचेप्रमाणे पारभासी व फिकट तपकिरी दिसते. हा चर्टापेक्षा कमी ठिसूळ व अधिक कठीण असून उघडा पडल्याने तो चिवट होतो. याची कठिनता ६·५-७ व वि. गु. २·६०-२·६५ असते.

चॉक, चुनखडक व डोलोमाइट या खडकांमध्ये फ्लिंट गोलसर वा अनियमित गाठी, थर व ओबडधोबड राशींच्या रूपांत आढळतो. चॉकमधील याच्या गाठी बहुधा स्पंज, एकायनोडर्म इ. प्राण्यांच्या जीवाश्मांभोवती (शिळारूप अवशेषांभोवती) तयार झालेल्या असतात. इंग्लंड, बेल्जियम, फ्रान्स, हॉलंड, पोलंड, अमेरिका, वगैरे देशांत फ्लिंट आढळतो.

फ्लिंटच्या उत्पत्तीविषयी मतभेद आहेत. सागरतळावर साचलेला गाळ गाडला गेल्यावर त्यातील कार्बोनेटी भागाची सिलिकेद्वारे प्रतिष्ठापना होऊन (कार्बोनेटाच्या जागी सिलिका येऊन) बहुतेक फ्लिंट बनत असावेत, असे त्यांच्या सूक्ष्मदर्शकीय अभ्यासावरून दिसते. मूळ खडकांतील वयनामधील (पोतामधील) बारीकसारीक बाबीही फ्लिंटमध्ये टिकून राहिलेल्या दिसतात. संबंधित चुनखडक व सिलिका समकालीन असतात. चुनखडक घट्ट घेऊन वर उचलला गेल्यावर दीर्घकाळाने त्याच्यात सिलिकेचे निक्षेपण होऊन (साचून) फ्लिंट बनत असावेत, असे दुसरे मत आहे. याबाबतीत खडकामध्ये विखुरलेली सिलिका झिरपणाऱ्या पाण्याने एकत्रित आणली जाऊन पुन्हा साचत असावी, असे दिसते.

फ्लिंट ऐतिहासिक महत्त्वाचा आहे कारण हा कठिण असून अणकुचीदार कडांनी फुटत असल्याने आदिमानव याची हत्यारे (कुऱ्हाडी, छिन्न्या, भाल्याची व बाणाची टोके इ.) वापरीत असे. याकरिता नवाश्मयुगात (इ.स.पू.सु. ९०००-८००० वर्षापूर्वीच्या काळात) फ्लिंट काढण्यात येत असे. फ्लिंटचे साठे व हत्यारे यांवरून प्राचीन काळातील व्यापारी मार्ग, तसेच अश्मयुगाचा काळ यांविषयी अनुमान करता येते. फ्लिंट चकमकीसाठीही वापरीत. अशा तऱ्हेने सतराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ‘फ्लिंट लॉक रायफली’त दारूला बत्ती देण्यासाठी फ्लिंट वापरीत. आता फ्लिंटचे औद्योगिक महत्त्व मर्यादितच असून मृत्तिका व रंगलेप उद्योगांत कच्च्या मालाचे, तसेच धातुकाचे (कच्च्या रूपातील धातूचे) चूर्ण करण्यासाठी याचे गोटे वापरतात. त्यामुळे पोलादी गोळ्यांमुळे होणारी लोहाची भेसळ टाळता येते. अपकर्षक (घासून व खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करणारा पदार्थ), रत्न म्हणून तसेच खते, प्लॅस्टिके, रबर, कीटकनाशके, रस्त्याचे डांबर इत्यादींमध्ये भरण द्रव्य म्हणून आणि बांधकाम, क्रॉंक्रीट, फ्लिंट काच वगैरेंमध्ये फ्लिंट वापरतात. बहुधा फरशी अर्थाच्या ग्रीक शब्दावरून फ्लिंट हा शब्द आला असावा.

पहा : क्वॉर्ट्‌झ चर्ट सिलिका गट.

ठाकूर, अ. ना.