हरिभद्र सूरि : (आठवे शतक). श्वेतांबर जैन लेखक. चितोडगढ येथील एका ब्राह्मण कुटुंबात जन्म. कहावलीत गंगा व शंकरभट्ट अशीत्यांच्या मातापित्यांची नावे उपलब्ध होतात. एक अथवा अनेक ब्राह्मण गुरूंपाशी व्याकरण, साहित्य, दर्शने, धर्मशास्त्र इ. प्राचीन संस्कृत विद्यांचे त्यांनी गाढ अध्ययन केले असले पाहिजे, असे त्यांच्या ग्रंथसंपत्तीच्या निरीक्षणावरून वाटते परंपराही तसे सांगते. पांडित्याच्या गर्वाच्या भरात ज्याचे बोलणे मला कळणार नाही, त्याचा मी शिष्य बनेन, असा संकल्प त्यांनी केला होता. एकदा जैन उपाश्रयातील याकिनी नावाच्या साध्वीने म्हटलेली एक कूट प्राकृत गाथा त्यांनी ऐकली. ती समजून घेण्यासाठी ते त्या साध्वीकडे गेले. त्या साध्वीने त्यांना स्वतःच्या जिनदत्तसूरी यागुरूंकडे नेले. जिनदत्तसूरींच्या सूचनेवरून प्राकृत भाषा, जैन धर्म व परंपरा यांचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी व संकल्पपूर्तीसाठी त्यांनी जैन दीक्षा घेतली. हा अभ्यास पूर्ण करून संस्कृत व प्राकृत भाषा आणि ब्राह्मण व श्रमणपरंपरा त्यांनी आत्मसात केल्या. आपल्या जीवनात क्रांती घडवून आणणाऱ्या साध्वीचे धर्मऋण फेडण्यासाठी स्वतःला याकिनी महत्तरेचे धर्मपुत्र म्हणवून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. धर्मतो याकिनीमहत्तरासूनुः या उपनामासारखे हरिभद्रसूरींचे दुसरे प्रसिद्ध उपनाम म्हणजे भवविरह. या उपनामावरून त्यांची मोक्षासंबंधीची तीव्र इच्छा व्यक्त होते.

हरिभद्रसूरींनी आपली सर्व शक्ती रात्रंदिवस ग्रंथलेखन करण्यात वेचली. त्यांचे संस्कृत व प्राकृत भाषांत लिहिलेले लहानमोठे पन्नासांवर ग्रंथ असून शिवाय सु. पंचवीस ग्रंथ त्यांच्या नावावर चालत आलेआहेत. त्यांचे ग्रंथ विविध स्वरूपांचे आहेत. आगमग्रंथांवरील टीका, आचार व उपदेशपर प्रकरणे, दर्शनविषयक, योगविषयक, कथात्मक, ज्योतिषपर व स्तुतिपर असे त्यांच्या ग्रंथांचे स्थूलपणे वर्गीकरण करता येईल. त्यांच्या विपुल ग्रंथसंभारापैकी काहींचा उल्लेख येथे अवश्य केला पाहिजे. ⇨ समराइच्चकहा (समरादित्यकथा) ही धर्मकथा म्हणजे प्राकृत वाङ्मयाचे भूषण होय. ⇨ धुत्तक्खाण हे प्राकृत भाषेतील अपूर्व असे उपहासात्मक काव्य होय. संबोधप्रकरण साधूंच्या खऱ्या आचाराचे समा-लोचनपूर्वक मार्मिक विवरण करते. अनेकान्तजयपताका (संस्कृत) वधर्म-संग्रहणी (प्राकृत) या ग्रंथांत तत्त्वज्ञानाचा ऊहापोह केलेला आहे. त्यांचे पाच ग्रंथ योगावर आहेत. उदा., योगबिन्दु , ⇨ दसवेयालिय, अणुओगदार वगैरे. आगम-ग्रंथांवर त्यांनी प्रसन्न भाषेत टीका लिहिल्या आहेत.

पूर्वकालीन व उत्तरकालीन जैन-जैनेतर आचाऱ्यांशी तुलना करता हरिभद्रसूरींची उदात्त दृष्टी, असांप्रदायिक वृत्ती, नम्रता, विरोधी संप्र-दायांच्या प्रवर्तकांबद्दल – मतभेद असतानाही – आदर आणि जैन, बौद्ध व वैदिक परंपरांमधील अंतर कमी करण्याचा डोळस प्रयत्न या गोष्टी विशेषेकरून उठून दिसतात. सारांश कथाकार, आचार-संशोधक, तत्त्वज्ञ आणि योगाभ्यासी आचार्य हरिभद्रांचे भारतीय – विशेषतः प्राकृत वाड्मयाच्या – इतिहासातील स्थान अढळ आहे.

कुलकर्णी, वा. म.