मोनोट्रिमॅटा : (अंडाजस्तनी). आदिसस्तन प्राण्यांचा हा एक गण आहे. प्रोटोथेरिया या उपवर्गात या गणाचा समावेश होतो. यातील प्राणी अंडी घालतात व त्यांचे इतर काही बाबतींत सरीसृप (सरपटणाऱ्या) वर्गातील प्राण्यांशी साम्य आहे. जसे अंड्यांशी रचना, मूत्र-जनन तंत्र (मूत्र व जनन संस्था), कंकाल (सांगाडा) तंत्र. सरीसृप प्राण्याप्रमाणे मोनोट्रिमाचे आंत्र (आतडे), मूत्राशय आणि जनन तंत्र यांचे उत्सर्जन अवस्करात (शरीराच्या मागील टोकाजवळील कोष्ठात) होते. शिश्नाचा उपयोग मीलनाच्या वेळी शुक्राणूचे वहन करण्यापुरता होतो यातून मूत्र जात नाही. तरी सस्तन प्राण्यांचे काही विशिष्ट गुणधर्म यांच्यात आढळतात व म्हणून यांचा समावेश आदिसस्तन प्राण्यात केला आहे. हे विशेष गुणधर्म म्हणजे स्तन ग्रंथी, शरीरावरचे केस, मोठा मेंदू व पूर्ण वाढलेले मध्यपटल (उदर पोकळी व छातीची पोकळी यांचे विभाजन करणारे स्नायुयुक्त पटल) हे होत.

सध्या जिवंत असलेले दोन प्रकारचे मोनोट्रीम आढळतात. त्यांपैकी एक ⇨ प्लॅटिपस आणि दुसरा ⇨काटेरी मुंगीखाऊ. ऑस्ट्रेलियात प्लाइस्टोसीन कल्पातील २० लक्ष वर्षांपूर्वीचे मोनोट्रिमांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत. या जीवाश्मांच्या शरीररचनेत व सध्या जिवंत असलेल्या मोनोट्रिमांच्या शरीररचनेत विशेष फरक नाही. त्याच्या शरीराची लांबी ३० ते ८० सेंमी. आणि वजन १ ते १० किग्रॅ एवढे असते.

सध्याच्या प्लॅटिपस हा पूर्व ऑस्ट्रेलियात उत्तर क्विन्सलँडपासून टास्मानियापर्यंत प्रदेशात आढळतो. याला बदकासारखी लांबट, रुंदट, पसरट व चामड्याचे आवरण असलेली चोच असते म्हणून याला डकबिल प्लॅटिपस या नावाने ओळखतात.

काटेरी मुंगीखाऊ याला एकिड्ना असेही म्हणतात. हे प्राणी संबंध ऑस्ट्रेलिया खंड, टास्मानिया आणि न्यू गिनी या प्रदेशांत सापडतात. हे याच वर्गातील प्लॅटिपसापेक्षा अगदी निराळे दिसतात. त्यांच्या अंगावर तीक्ष्ण टोकांचे काटे असतात व त्यांचे नाक निमुळते असते. यांच्यावर संशोधन करण्याकरिता यांना पिंजऱ्यात ठेवले जाते व या परिस्थितीत ते पुष्कळ दिवस जिवंत राहू शकतात. ऑस्ट्रेलियातील काही प्राणिसंग्रहालयांत काटेरी मुंगीखाऊ व प्लॅटिपस आढळतात. जगात इतरत्र मात्र प्राणिसंग्रहालयांत प्लॅटिपस आढळत नाहीत.

मोनोट्रिमांमुळे मानवी रोगांचा प्रसार झाल्याचे माहीत नाही. या दोन्ही प्राण्यांना सध्या ऑस्ट्रेलियन सरकारकडून संरक्षण देण्यात आले आहे.

प्लॅटिपस हा जलस्थलवासी प्राणी आहे. तो पूर्व ऑस्ट्रेलियातील २,००० मी. उंचीच्या प्रदेशात असलेल्या जलप्रवाहात आढळतो, तसाच क्वीन्सलँडच्या किनाऱ्यावरील जलप्रवाहातही आढळतो. जलप्रवाहाच्या काठावर बिळे करून तो राहतो. ही बिळे ६ मी. पासून १५ मी. पर्यंत लांब असू शकतात. यांचे प्रवेशद्वार पाण्याच्या पातळीवरच्या उंचीवर असते. कीटकांचे डिंभ (अळ्या), लहान झिंगे व इतर लहान जलचर प्राणी हे यांचे भक्ष्य होय. याच्या अंगावरील फरकरिता पूर्वी याची शिकार होत असे, पण आता या शिकारीस कायद्याने बंदी घातली आहे. याचे नैसर्गिक शत्रू ससे होत. ते याच्या बिळात शिरून याचा व याच्या पिल्लांच्या नाश करतात.

प्लॅटिपसाचे प्रजनन वर्षातून उत्तरेकडच्या प्रदेशात जुलै व ऑगस्टमध्ये आणि दक्षिणेच्या प्रदेशात ऑक्टोबरमध्ये होते. नरमादीचे मीलन पाण्यातहोते. मीलनापूर्वी बराच काल प्रणयाराधन चालते. या प्रणयाराधनाचा एक भाग म्हणून नर मादीचे शेपूट धरतो व दोघेही बराच काळ पाण्यात मंडलाकृती पोहतात. प्रजननकालात मादी लांब बिळात पाने, गवत व इतर तत्सम वस्तूंचे घरटे तयार करते. अंडी सुरक्षित राहण्याकरिता मादी चिखलाने बीळ बंद करते. फक्त डाव्या अंडकोशातून अंडी निघतात व डाव्या गर्भाशयात जातात. एका वेळी ते तीन अंडी घातली जातात. अंडी साधारणतः १६ ते १८ मिमी. लांब व १४ ते १५ मिमी. रुंद असतात. स्थानबद्ध प्राण्यात मीलनापासून अंडे देण्यापर्यंतच्या काळ सरासरी १२ ते १४ दिवस आणि अंडी उबवण्याचा काळ सरासरी १२ दिवस असतो. असे आढळले आहे. अंड्यातून बाहेर पडलेल्या भ्रुणाची लांबी सरासरी १८ मिमी. असते व तो घरट्यातून सरासरी १७ आठवड्यांनी बाहेर पडतो. या वेळी त्याची लांबी सु. ३४ सेंमी. असते व त्याच्या अंगावर केस आलेले असतात. मादीला स्तनाग्रे नसतात व त्यामुळे मादीच्या छातीवरील कातड्यावर स्तन ग्रंथीमधून येणारे दूध पिले चाटून पितात. प्लॅटिपसाची आयुमर्यादा १० ते १५ वर्ष असते.


काटेरी मुंगीखाऊ हा जंगलात, खुरटी झाडे असलेल्या मैदानात व वाळवंटात राहणारा स्थलचर प्राणी आहे. सर्व ऑस्ट्रेलिया खंडात न्यू गिनी व टास्मानियात १,१०० ते २,९०० मी. उंचीच्या प्रदेशात तो आढळतो. याचे भक्ष्य मुख्यतः मुंग्या व वाळवी हे आहे.

प्लॅटिपसापेक्षा काटेरी मुंगीखाऊवर जास्त संशोधन झाले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात या प्राण्यांचे प्रजनन जून ते सप्टेंबर या महिन्यांत होते. नरमादीच्या मीलनानंतर सरासरी १६ ते २८ दिवसांत अंडी घातली जातात. दोन्ही बाजूंचे अंडकोश अंडी देतात. प्रजननकाळात मादीच्या शरीरावर एक उदरीय कोष्ठ तयार होतो. या कोष्ठातच मादी अंडे घालीत असावी. या प्राण्यांत मादी अंडे घालताना कोणास आढळलेली नाही. साधारणपणे एका वेळी एक अंडे घातले जाते. प्लॅटिपसाच्या अंड्यापेक्षा या प्राण्याची अंडी थोडी लहान असतात. त्यांची लांबी १४ ते १७ मिमी. आणि रुंदी १३ ते १५ मिमी. असते. अंडी उबविण्याचा काळ १० दिवसांचा असतो. अंड्यातून बाहेर पडलेले पिलू साधारण १५ मिमी. लांब असते आणि त्याचे वजन सरासरी ०·३८ ग्रॅ असते. अंड्यातून बाहेर पडलेले पिलू काही काळ उदरकोष्ठातच राहते व मादीच्या कातड्यातून बाहेर येणारे दूध चाटत पिऊन आपले पोट भरते. याही प्राण्यास स्तनाग्रे नसतात. पिलू किती दिवस उदरकोष्ठात राहते आणि तेथून केव्हा बाहेर पडते यांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. ग्रिफिथ या शास्त्रज्ञांच्या माहितीवरून असे दिसते की, पिलाचे वजन ४०० ग्रॅ . झाल्यावर व त्याच्या शरीरावर काटे येऊ लागल्यावर मादी ते उदरकोष्ठातून बाहेर टाकत असावी. या वेळी पिलाच्या डोळ्यांची पूर्ण वाढ झालेली असते. बाहेर टाकल्यावर काही काळ पिलू मादीच्या उदरवरच्या कातड्याबाहेर येणारे दूध पीत असते. उदरकोष्ठातून मादी पिलास बिळात नेऊन सुखरूप ठेवते व तेथे त्याची वाढ पूर्ण होते. स्थानबद्धतेत ठेवलेल्या या प्राण्याच्या काही जातींत याची आयुर्मर्यादा ३० ते ५० वर्षे इतकी आढळली आहे.

प्लॅटिपस व काटेरी मुंगीखाऊ यांच्या अशन यंत्रणेची (अन्न मिळवून ते खाण्याकरिता उपयोगात आणण्यात येणाऱ्या यंत्रणेची) व संचलनाची काही वैशिष्ट्ये आहेत. प्लॅटिपस आपल्या बिळातून पहाटे किंवा सायंकाळपूर्वी भक्ष्यार्थ बाहेर पडतो. दिवसाच्या इतर वेळी तो पाण्यातही असतो. जमिनीवर चालत असताना त्याच्या पुढील पायांवर नखापर्यंत असलेले पातळ कातडे तळव्याखाली ओढले जाते. मुस्कुट व नखे यांचा उपयोग बीळ करण्यास होतो. पायावरील नखापर्यंत असलेले पातळ कातडे पोहताना उपयोगी पडते व त्यामुळे पायाचा वल्ह्यासारखा उपयोग करता येतो. मागचे पाय व चापट शेपटी यांचाही पोहताना स्थिर राहण्याकरिता उपयोग होतो. शेपटीमुळे प्लॅटिपसाला पाण्यात सूर मारता येतो. पोहताना पुष्कळदा प्लॅटिपसाचे डोके पाण्याबाहेर असते. सर्व शरीर पाण्यात असताना डोळे व कान कातड्याच्या घडीने झाकले जातात. मुस्कुट व त्यावरील संवेदनाक्षम कातडे यांचा या प्राण्याला पाण्याच्या तळाशी डोळे व कान बंद ठेवून पोहताना फार उपयोग होतो. तळाशी पोहत असताना भक्ष्याच्या शोधार्थ चिखल चिवडणे अगर लहान दगडाशी उलथापालथ करणे यांकरिता मुस्कटाचा उपयोग केला जातो. भक्षण केलेले अन्न पाण्यात असताना जबड्यात ठेवले जाते व पाण्याबाहेर आल्यावर त्याचे रवंथ केले जाते. स्थानबद्धतेत असलेल्या प्लॅटिपसाचा आहार दांडगा असतो. दिवसातून त्याला त्याच्या वजनाच्या अर्धे इतके अन्न लागते.

काटेरी मुंगीखाऊ हा एकलकोंडा प्राणी आहे. तो नेहमी कानाकोपऱ्यात व कपारीत अगर जमिनीत खड्डा करून लपून राहतो. त्यामुळे तो क्वचितच द्दष्टीस पडतो. परिसरीय तापमानावर त्याच्या हालचाली अवलंबून असतात. काही प्रदेशांत ते दिवस-रात्र हिंडतात, तर काहींत ते रात्रीच हालचाल करतात. जरी त्यांना जमिनीत खड्डे करता येत असले, तरी ते प्लॅटिपसासारखी बिळे तयार करीत नाहीत. ⇨ जाहकासारखे ते आपल्या शरीरावरचे काटे उभारतात. चालताना त्यांचे पाय उंच व सरळ होतात त्यामुळे शरीराचा खालचा भाग जमिनीपासून उंच राहतो. ते उत्तम रीतीने धावू शकतात व झाडावर अगर उंचवट्यावर चढू शकतात. मुंग्यांच्या शोधार्थ ते कुजत पडलेले लाकडाचे ओंडके किंवा मुंग्याची वारुळे जलद तोडू शकतात. यावरून त्यांच्या शक्तीची कल्पना येईल.

प्लॅटिपस व काटेरी मुंगीखाऊ यांच्या शरीररचनेत त्यांचे सरीसृप प्राण्याशी व सस्तन प्राण्याशी असलेल्या साम्याचे वर्णन ‘काटेरी मुंगीखाऊ’ व ‘प्लॅटिपस’ या नोंदींत दिलेले आहे. प्लॅटिपसाच्या नरात दोन्ही बाजूंच्या मागच्या पायांच्या आतल्या बाजूस टाचेजवळ एक तीव्र, हालणारी, शृंगमय विषारी आर असते. प्रत्येक आरेची लांबी १५ मिमी. असते. मागच्या पायाच्या वरच्या पृष्ठीय भागात असलेल्या विषारी ग्रंथीपासून वरील आरेस जोडणारी एक नलिका असते. या विषाच्या कार्याविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. मानवाच्या जीवनास जरी या विषामुळे काही धोका पोचत नसला, तरी हे विष अंगात भिनले, तर काही काळ खूप वेदना होतात. या ग्रंथीच्या स्त्रावांचा उपयोग नरास प्रजननकाळात इतर नरांवर मात करून मादीस जिंकण्यात होत असावा, असे वाटते.

काटेरी मुंगीखाऊतही नरांत व काही माद्यांत अशी आर असते. या प्राण्यात या आरेचा व विषारी ग्रंथीचा काय उपयोग आहे यावर काहीही माहिती उपलब्ध नाही.


सरीसृप प्राण्यापेक्षा मोनोट्रिमाच्या शरीराचे तापमान रक्षण करण्याची व्यवस्था जास्त चांगली आहे. अपरास्तनी (ज्यांच्या गर्भाला वार असते अशा सस्तन) प्राण्यांत शरीराचे तापमान सर्वसाधारणपणे ३६° ते ३७° से.च्या दरम्यान असते. पुष्कळ सरीसृप प्राण्यांत शरीराचे तापमान बाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते व परिस्थितीनुसार त्यात फरक पडतो. मोनोट्रिमाचे तापमान साधारणपणे ३१° ते ३२° से. असते. प्लॅटिपस व काटेरी मुंगीखाऊ या दोन्ही प्राण्यांत शीतनिष्क्रियता (हिवाळ्यातील गुंगीची अवस्था) आढळते. प्लॅटिपसामध्ये शीतनिष्क्रियतेचा काळ सु. ६ दिवस असतो. यात मधूनमधून खंडही पडतो. काटेरी मुंगीखाऊत हाच काळ सरासरी ९ दिवसांचा असतो. कधी या काळात ३० तास ते ११ दिवस खंडही पडतो. प्लॅटिपसाच्या मुस्कटावर व शरीरावर स्वेद (घाम स्त्रवणाऱ्या) ग्रंथी असतात. काटेरी मुंगीखाऊच्या शरीरावर उदरकोष्ठावर अशा स्वेद ग्रंथी आढळल्या आहेत. प्लॅटिपसाच्या कातड्याखाली निरोधक वेष्टन असते. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर जात नाही.

मोनोट्रिमॅटा या गणातील प्राण्यांशी संबंधित असलेले जिवंत प्राणी ऑस्ट्रेलिया सोडून जगात इतरत्र कोठे सापडत नाहीत. पुष्कळ शास्त्रज्ञांच्या मते मोनोट्रिमॅटा हा प्रोटोथेरीया या सस्तन प्राण्यांच्या उपवर्गातील एक समूह आहे. याचा क्रमविकास (उत्क्रांती) सस्तनसमान सरीसृप प्राण्यांपासून झाला असावा, पण ज्या प्राण्यापासून सस्तन प्राण्यांच्या विकास झाला त्यांपेक्षा हे सस्तनसमान सरीसृप वेगळे असावेत, असे पुष्कळ शास्त्रज्ञांचे मत आहे. जिवंस मोनोट्रिमांची विभागणी दोन कुलांत केली जाते. यांपैकी ऑर्निथोऱ्हिंकिडी कुलात ऑर्निथोऱ्हिंकस ही एकच प्रजाती आहे व यातील ऑर्निथोऱ्हीकस ॲनॅटिनस या जातीत प्लॅटिपसाचा समावेश होतो. या जातीच्या भिन्नतेवर आधारलेल्या इतर काही पोट-जाती आहेत.

टॅकिग्लॉसिडी या कुलात काटेरी मुंगीखाऊचा समावेश होतो. या कुलात दोन प्रजाती आहेत. यांपैकी टॅकिग्लॉसस ॲक्युलिएटस ही एक प्रजातीतील जात, तर झॅग्लॉसस ब्रुइज्नाय ही दुसऱ्या प्रजातीतील जात होय.

या प्राण्यांवर अजूनही पुष्कळ संशोधन व्हावयास हवे म्हणजे बऱ्याच न समजलेल्या वैशिष्ट्यांचा उलगडा होईल.

पहा : काटेरी मुंगीखाऊ प्लॅटिपस.

संदर्भ : Burton, M. Systematic Dictionary of Mammals of the world, New York, 1962.

इमानदार, ना. भा.