बिझिक : पत्त्यांचा एक खेळ. पत्त्यांची विशिष्ट प्रकारे जुळणी करून तो खेळला जातो. मुळामध्ये हा दोन खेळाडूंमध्ये खेळण्याचा प्रकार असला, तरी त्याचे जे वेगवेगळे प्रकारभेद संभवतात त्यांमध्ये तीन ते चार खेळाडूही भाग घेऊ शकतात. हा खेळ स्कँडिनेव्हियात उगम पावला असे मानले जात असले, तरी तो १८६० च्या दशकात फ्रान्समध्ये विशेषत्वाने लोकप्रिय होता. त्यास फ्रान्सबरोबरीनेच इंग्लंडमध्येही लोकप्रियता लाभली. बिझिकमध्ये खेळाडूंच्या संख्येनुसार दोन वा त्याहून अधिक जोड वापरतात मात्र सत्तीपासूनची वरची सर्व-म्हणजे बत्तीस–पाने (पिकेटपॅक) घेतात. पत्ते पिसल्यानंतर, वाटणारा खेळाडू प्रत्येकाला आठ पाने-प्रथम तीन, नंतर दोन व पुन्हा तीन-वाटतो. उरलेला गठ्ठा (स्टॉक) टेबलावर सर्व खेळाडूंमध्ये मांडला जातो. त्या गठ्ठ्यातील सर्वांत वरचे पान उलटून तो हुकूम ठरवला जातो. अथवा पहिल्या राजाराणीच्या लग्नाचे जे चिन्ह असेल, त्यावरून ठरवला जातो. खेळाडूने हातातील पानांपैकी एक पान खेळल्यानंतर राखीव गठ्ठ्यापैकी वरचे एक पान घ्यावयाचे असते. त्याने पानाची उतारी केल्यावर प्रतिस्पर्ध्याला वरचढ वा हुकुमाचे पान टाकून डाव जिंकता येतो व त्यालाच जुळणी जाहीर (डिक्लेअर) करता येते. अन्यथा उतारीच्या चिन्हाचेच हलके पान खेळावे लागते. या खेळात एक्का, दश्शी, राजा, राणी, गुलाम, नश्शी, अठ्ठी, सत्ती अशी पत्त्यांची मूल्यश्रेणी मानली जाते. प्रत्येक खेळाडूचे उद्दिष्ट हातातील पत्त्यांची वेगवेगळ्या प्रकारे जुळणी व तदनुसार बोली (डिक्लरेशन) करून गुण संपादणे, हे असते. पत्त्यांच्या जुळणीचे प्रकार व त्यांना असलेले गुण पुढीलप्रमाणे : साधे लग्न (कोणत्याही एका चिन्हाचे राजा व राणी) – २० गुण राजशाही लग्न (हुकुमाचे राजा व राणी) – ४० क्रमरचना (एक्का, राजा, राणी, गुलाम व दश्शी ही हुकुमाची पाच पाने) – २५० एकेरी बिझिक (इस्पिक राणी-चौकट गुलाम) – ४० दुहेरी बिझिक (वरील पाने त्याच डावात त्याच खेळाडूस पुन्हा आल्यास ‘डबल बिझिक’ होते) – ५०० कोणतेही चार एक्के – १०० कोणतेही चार राजे – ८० चार राण्या – ६० चार गुलाम -४० हुकुमाची सत्ती – १०. कोणत्याही एका खेळाडूने अशा रीतीने सामान्यतः १,००० किंवा १,५०० गुण संपादन करेपर्यंत डाव चालतो.

थ्री-हँड बिझिक, फोर-हँड बिझिक, रूबिकॉन, सिक्सपॅक (किंवा चिनी) बिझिक, एटपॅक बिझिक, ओपन बिझिक असे या खेळाचे सु. वीस प्रकार प्रचलित आहेत.

गोखले, श्री. पु.