निक्सो, मार्टिन अँडरसन : (२६ जून १८६९–१ जून १९५४). डॅनिश कादंबरीकार. कोपनहेगन येथे एका श्रमजीवी कुटुंबात जन्म. याचे बालपण हलाखीत गेले. तरुणपणी एका चर्मकाराकडे शिकाऊ उमेदवार म्हणून त्याने काही काळ घालविला. प्रौढांसाठी चालविलेल्या एका लोकशाळेत त्याने शिक्षण घेतले. तेथे मिळालेल्या शिक्षणाने निक्सोच्या मनावर मोलाचे संस्कार केले. त्यानंतर काही वर्षे त्याने शिक्षक म्हणून नोकरी केली. त्या काळात काही कथा त्याने लिहिल्या होत्या तथापि १९०१ नंतर केवळ लेखनावर तो आपली उपजीविका करू लागला. निक्सो हा स्वत: श्रमिक वर्गातूनच आलेला असल्यामुळे श्रमिकांची दु:खे त्याने जवळून पाहिलेली होती त्यांचे प्रश्न स्वानुभवाने जाणले होते त्यामुळे स्वाभाविकपणेच तो डेन्मार्कमधील समाजवादी पक्षाकडे ओढला गेला. तथापि रशियन क्रांतीनंतर ह्या पक्षाचा त्याग करून तो साम्यवादी झाला. सोव्हिएट रशियास त्याने अनेकदा भेटी दिल्या तेथील राजवटीचा प्रचार आणि पुरस्कार केला. १९५१ पासून पूर्व जर्मनीत त्याचे वास्तव्य होते. ड्रेझ्डेन येथे तो निधन पावला.

कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने असे विविध विपुल लेखन त्याने केलेले असले, तरी त्याची जागतिक ख्याती मुख्यतः त्याच्या दोन कादंबऱ्यांवर अधिष्ठित आहे. Pelle Erobreren (४ खंड, १९०६–१०, इं. भा. पेल्ले द काँकरर, १९१३–१६) आणि Ditte Menneskebarn (५ खंड, १९१७–२१, इं. भा. डिट्टे, डॉटर ऑफ मॅन, १९२२) ह्या त्या कांदबऱ्या होत. पेल्ले द काँकररमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचा जीवनपट उभा केला आहे, तर डिट्टे, डॉटर ऑफ मॅन ही दारिद्र्य आणि हालअपेष्टा ह्यांना कणखर आशावादी वृत्तीने तोंड देणाऱ्या एका स्त्रीची कहाणी आहे. माणसाच्या मूलभूत सत्प्रवृत्तींवरील आपली श्रद्धा निक्सोने ह्या दोन कांदबऱ्यांतून प्रभावीपणे व्यक्त केलेली आहे. माणसांची पापे, स्वार्थीपणा आणि परस्परांविषयी त्यांना वाटणारा अविश्वास ही विशिष्ट्य सामाजिक-राजकीय परिस्थिचीच फलिते होत, असा निक्सोचा निष्कर्ष आहे.

त्याच्या साहित्यकृतींचे अनेक भाषांत अनुवाद झालेले आहेत. त्याने लिहिलेल्या संस्मरणिकांचे ४ खंडही (१९३२–३९) वाचनीय आहेत.

यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)