ग्रिल्पार्ट्‌सर, फ्रांट्स : (१५ जानेवारी १७९१–२१ जानेवारी १८७२). ऑस्ट्रियन नाटककार. जर्मन भाषेत लेखन. जन्म व्हिएन्ना येथे. व्हिएन्ना विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर पडल्यामुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. कारकून म्हणून सरकारी नोकरीत शिरला (१८१३) आणि १८५६ मध्ये निवृत्त झाला.

Blanka von Kastalien (१८०९) ही त्याची पहिली शोकात्मिका. Die Ahnfrau (१८१७, इं. शी. द ॲन्सेस्ट्रेस), Sappho (१८१८), Das goldene vliess (नाट्यत्रय,  १८२१-२२. त्यात Der Gastfreund, Die Argonauten आणि Medea  ह्या तीन नाट्यकृती समाविष्ट), Koenig Ottokars Glueck und Ende (१८२५, इं. भा किंग ओटोकार, हिज राइज अँड फॉल, १९३८), Des Meeres und der Liebe Wellen (१८३१, इं. शी. वेव्ह्‌ज ऑफ लव्ह अँड द सी), Der Traum ein Leben (१८३४, इं. भा. अ ड्रीम इज लाइफ, १९४६), Weh’ dem der luegt (१८३८, इं. शी. डाउन विथ द लायर), Libussa (१८७२), Ein Bruderzwist in Habsburg (१८७३) ह्या त्याच्या काही नाट्यकृती. इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारी शक्ती ह्यांचे द्वंद्ध त्याच्या नाट्यकृतींतून प्रत्ययास येते. ⇨ लोपे दे व्हेगा  ह्या स्पॅनिश नाटककाराचा प्रभाव त्याच्या नाटकांवर होता. गटेनंतरचा हा प्रमुख जर्मन अभिजात नाटककार. Tristia ex Ponto (१८३५) मध्ये त्याच्या भावकविता संगृहीत आहेत.

ग्रिल्पार्ट्‌सरला लोकप्रियता आणि राज्यमान्यता मिळाली परंतु ती फार उशिरा. व्हिएन्ना येथील विज्ञान अकादमीचे सदस्यत्व त्याला लाभले होते. लॉर्ड्‌स सभेचाही तो काही काळ सदस्य होता. इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, तुर्कस्तान आदी देशांत त्याने प्रवास केला होता. जर्मनीत असताना त्याची आणि गटेची भेट झाली होती. व्हिएन्ना येथे तो निवर्तला.

घारपुरे, न. का.