स्थूलता : शरीरात प्रमाणाबाहेर वसा-ऊतकाची ( मेद, चरबी ) निर्मिती होत असलेल्या अवस्थेस स्थूलता म्हणतात. या स्थितीची सर्व-साधारण कल्पना शरीराच्या एकूण वजनावरून येऊ शकते. उंची व वजन यांमधील संबंध दाखविणार्‍या तक्त्यात दिलेल्या वजनाच्या सरासरीपेक्षा सु. २० प्रतिशत अधिक वजन असणारी व्यक्ती स्थूल म्हणता येते उदा., १६८ सेंमी. उंचीच्या पुरुषाचे वजन ५६ — ७२ किग्रॅ. अपेक्षित आहे. या मर्यादेचा मध्यबिंदू ६४ किग्रॅ. असल्यामुळे त्याच्या २०% अधिक म्हणजे ७६.८ किग्रॅ.हून अधिक वजन स्थूलता दर्शविते. १६८ सेंमी. उंचीच्या स्त्रियांच्या बाबतीत हीच वजनाची मर्यादा ५२ — ६७ किग्रॅ. असल्याने ७१.४ किग्रॅ. हा स्थूलतेचा निर्देशक असू शकेल.

स्थूलतेचे प्रमाण पाश्चात्त्य प्रगत देशांमध्ये अधिक आहे. सुमारे ३०% पुरुष व ३५% स्त्रिया स्थूल असल्यामुळे आणि हे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे या देशांमध्ये स्थूलता व तिचे तोटे यांविषयी जागरूकताही वाढत आहे. भारतासारख्या विकसनशील देशांतही हे प्रमाण कमी नाही. वाढत्या वयोमानाशी स्थूलता निगडित असल्याने आयुर्मर्यादेच्या वाढी-बरोबरच सर्व देशांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे. वजनातील वाढ सरासरीपेक्षा २० — ४०% आणि ४० — १००% अधिक असणार्‍या व्यक्ती (सौम्य आणि गंभीर स्थूलता) आढळणे, ही आता अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही. 

उंची व वजन यांच्या प्रमाणाचा तक्ता 

( आनुवंशिकतेनुसार व प्रकृतीनुसार कमी-जास्त ) 

उंची ( सेंमी.) 

सडपातळ बांधा 

मध्यम बांधा 

सुदृढ बांधा 

वजन किग्रॅ.मध्ये 

( अ ) पुरुषांसाठी 

१६० 

५०—५५ 

५४—५८ 

५८—६५ 

१६४ 

५४—५८ 

५५—६४ 

६०—६८ 

१६६ 

५५—६० 

५८—६५ 

६२—७० 

१६८ 

५६—६० 

६०—७० 

६५—७२ 

१७२ 

६२—६६ 

६६—७० 

६६—७५ 

१७५ 

६५—६८ 

७०—८० 

७६—८२ 

१८० 

६८—७२ 

७२—७६ 

७८—९० 

१८४ 

७०—७४ 

७३—८० 

७८—९० 

१८८ 

७२—७६ 

७४—८२ 

८०—९२ 

१९० 

७३—७८ 

७५—८५ 

८०—९४ 

(आ) स्त्रियांसाठी 

१४८ 

४०—४४ 

४३—४८ 

४६—५३ 

१५० 

४२—४६ 

४४—५० 

४८—५६ 

१५२ 

४३—४८ 

४५—५१ 

४९—५६ 

१५६ 

४५—४८ 

४७—५३ 

५१—५९ 

१५८ 

४६—५२ 

४८—५५ 

५२—६० 

१६० 

४८—५४ 

५०—५५ 

५३—६२ 

१६४ 

५०—५५ 

५२—५९ 

५७—६५ 

१६८ 

५२—५७ 

५५—६२ 

५८—६७ 

१७० 

५३—५९ 

५६—६४ 

६०—६९ 

१७४ 

५५—६० 

५८—६६ 

६२—७५ 

१७६ 

५८—६२ 

६२—६९ 

६६—७५ 

१७८ 

६०—६४ 

६३—७० 

६६—७६ 

१८० 

६२—६५ 

६४—७२ 

६७—७८ 

कारणे : शरीरातील ऊतकांचे मुख्यतः चार गट आहेत : (१) स्नायू , यकृत, वृक्क यांसारखी सक्रिय ऊतके (२) हाडे, कूर्चा, सांधे, त्वचा (३) संयोजी ऊतके इ. कोशिकाबाह्य द्रव, रक्त, लसीका द्रव आणि त्यांच्या वाहिन्या (४) वसा-कोशिका आणि त्यांच्या आत साठविले जाणारे वसाद्रव्य. निरोगी आणि शारीरिक कष्टाची नियमितपणे सवय असलेल्या व्यक्तींमध्ये या चार ऊतकांचे प्रमाण संतुलित असते. आहारातून घेतलेल्या ऊर्जेचा वापर काम करण्यासाठी होत असल्याने फारशी अतिरिक्त ऊर्जा शिल्लक राहत नाही. याउलट खर्च होणार्‍या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा आहारातून सतत घेत राहिल्यास आणि शारीरिक कष्ट कमी केल्यास अतिरिक्त ऊर्जेचे रूपांतर चरबीत होऊन ती वसा-कोशिकांच्या आत साठविली जाते. त्यांचे आकारमान वाढत जाते. बालवयात अशा परि- स्थितीमध्ये नवीन वसा-कोशिका निर्माण होण्याचा वेगही अधिक असतो. ही सर्व प्रक्रिया इतर तीनही गटांमधील ऊतकांच्या वाढीवर आणि एकंदर वजनावर विपरीत परिणाम करीत असते. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. साधारणपणे दर ९ कॅलरी अतिरिक्त आहारातून एक ग्रॅम वसा- द्रव्याची निर्मिती होते.

ट्रायग्लिसराइडाच्या स्वरूपात ते कोशिकेत साठविले जाते. ( ग्लिसरॉलाचा एक रेणू आणि वसाम्लाचे तीन रेणू यांचा संयोग होऊन ट्रायग्लिसराइडाचा रेणू बनतो ).

         ‘अतिरिक्त आहार व कमी काम ’ अशा सोप्या शब्दांत स्थूलतेचे कारण सांगता आले, तरी त्यामागे अनेक घटकांची पार्श्वभूमी असते. आनुवंशिक प्रवृत्तीमुळे जवळजवळ ३०% वर्तनाचे स्पष्टीकरण देता येते. कुटुंबातील अनेक व्यक्तींमध्ये आढळणारी आणि जुळ्या भावंडांत समान असणारी अतिरिक्त आहाराची सवय आनुवंशिक असू शकते.मेंदूतील आहारनियंत्रक यंत्रणा कोणत्या पातळीवर कार्यान्वित होते त्या समाधान बिंदूची निश्चिती काही अंशी आनुवंशिक गुणांमुळेच होत असावी. या बिंदूची ( सेट पॉइंटची ) निश्चिती होण्यास बालपणातील आहाराच्या सवयी, अंतःस्रावी ग्रंथींचा प्रभाव आणि अधोथॅलॅमसामधील काही नियंत्रक केंद्रांना झालेली इजा यांचाही हातभार लागतो. बाल्यावस्थेत आग्रहाने अतिरिक्त आहार घ्यायला लावण्याच्या सवयीमुळे पालकांकडून वसा-ऊतकांची संख्या ३ ते ५ पट वाढविण्याच्या प्रक्रियेस नकळत मदत होत असते. प्रौढ व्यक्तींमध्ये स्थूलता निर्माण करण्यास कधीकधी मानसिक अवसादन, तीव्र दुःख देणार्‍या घटनांप्रत घडून येणारी प्रतिक्रिया, मानसिक ताण आणि मनोविकार यांच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे हे घटक कारणीभूत असतात. इतर विकारांसाठी वापरली जाणारी कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे, गर्भनिरोधक गोळ्या आणि शक्तिवर्धक औषधे तसेच प्रसूतीपश्चात दिले जाणारे आहार यांचा परिणाम म्हणून ही स्थूलतेची प्रक्रिया सुरू होऊ शकते. या सर्व प्रौढ स्थूलावस्थांमध्ये वसा-ऊतकांची संख्या फारशी वाढत नसून उपलब्ध कोशिकांमध्ये साठविले जाणारे वसाद्रव्य व कोशिकांचे आकारमान यांत प्रचंड वाढ होऊ शकते. साठविलेली चरबी परत वापरण्यासाठी आवश्यक असलेले वसा विघटक एंझाइम ( विकर ) अकार्यक्षम किंवा सदोष असावे अशीही शक्यता प्राण्यांमधील निरीक्षणांवरून मांडण्यात आली आहे.

व्यायामाचा अभाव हे कारण महत्त्वाचे आहे. त्यामागे मनाचा निग्रह नसणे, वेळ किंवा जागा उपलब्ध नसणे, बैठ्या कामाचा व्यवसाय, स्थूलतेमुळे कमी होणारी हालचाल इ. अनेक कारणे असू शकतात. समाजाच्या वरच्या थरातील व्यक्तींवर लठ्ठपणाला आक्षेप घेणारे दडपण असल्यामुळे व व्यायामाच्या सुविधा उपलब्ध असल्याने स्थूलतेला वेळीच आळा घालणे शक्य होते. त्यामुळे आधुनिक काळात स्थूलतेचे प्रमाण कनिष्ठ वर्गात अधिक असल्याचे काहीसे अनपेक्षित चित्र आढळून येते.

अतिस्थूलतेमुळे निर्माण होणारी लक्षणे आणि विकार : शरीराच्या निरनिराळ्या भागांत वसा-ऊतकांची वाढ सारख्याच प्रमाणात होत नाही. तसेच त्वचेखालील मेदवृद्धी जितक्या सहजपणे लक्षात येते तितकी अंतर्गत इंद्रियांभोवतालची वाढ ( उदा., आतडी, वृक्क, श्रोणीमधील इंद्रिये इ. ) बाहेरून जाणवत नाही. तरीही या सर्व ठिकाणी वाढलेल्या ऊतकांमुळे काही लक्षणे निर्माण होतात. उदा., छातीच्या आणि मध्य-पटलाच्या ( छाती व पोट यांच्यामधील पडद्याच्या ) पृष्ठभागावर मेदवृद्धी झाल्यामुळे फुप्फुसावर दाब पडून श्वसनास अडथळा येतो थोड्याशा श्रमामुळेही धाप लागते, व्यायाम घडविणार्‍या हालचाली नकोशा वाटतात दिवसा झोपावेसे वाटते आणि झोपेतही कधीकधी श्वासास अडथळा येऊ शकतो. छाती व पोटातील मेदवृद्धीमुळे पाठ आणि कंबर दुखते, श्रोणींचे, गुडघ्याचे व घोट्याचे सांधे संधिशोथाची लक्षणे दाखवू लागतात आणि चालणे किंवा पळणे दुःसह होते. अतिशय घाम येणे, त्वचेच्या घड्यांमध्ये खाजणे किंवा संक्रामणजन्य विकार झाल्यास तो लवकर बरा न होणे, पायांवर व घोट्यांभोवती सूज येणे यांसारखी इतरही लक्षणे केवळ  स्थूलतेमुळे निर्माण होऊ शकतात.

छाती व पोट यांवरील स्थूलतेमुळे रक्तातील वसाद्रव्यांचे प्रमाण वाढून  रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामानाने श्रोणिप्रदेशाभोवती असलेली मेदवृद्धी ( पोटावर मेद नसल्यास ) कमी हानिकारक समजली जाते. इतर मेदजन्य विकारांत पित्ताशयातील खडे, मासिक ऋतुस्रावाच्या अनियमिततेशी संबंधित विकार, मोठ्या आतड्याचा व अष्ठीला ग्रंथीचा ( प्रोस्टेटचा ) कर्करोग आणि मानसिक समस्या यांचा उल्लेख करता येईल.


स्थूलतेचे निदान आणि मापन : वजन-उंचीच्या प्रमाणित निर्देशक वजनांवर अवलंबून न राहता मापनासाठी काही अधिक विश्वासार्ह सूत्रांचा उपयोग स्थूलतेच्या अभ्यासात केला जातो. त्यांतील दोन पद्धती सर्वाधिक प्रचलित आहेत

(१) देह वस्तुमान निर्देशांक = 

वजन ( किग्रॅ.) 

उंची ( मी.) 

 

 

 याचे मूल्य २० — २५ असावे. २७ पेक्षा अधिक असल्यास सौम्य स्थूलता आणि ३० पेक्षा अधिक असल्यास उपचार करणे आवश्यक समजले जाते.

        (२) वस्तुमानाच्या निर्देशांकावरून वसा-ऊतकाच्या प्रमाणाची स्पष्ट कल्पना येत नाही. वजनाचा मोठा भाग स्नायू आणि इतर ऊतकांमुळे असल्याने एखाद्या सुदृढ पेहलवानाचा निर्देशांकही ३० पेक्षा अधिक असू शकतो. त्वचेची घडी चिमटीत उचलून तिची जाडी मोजण्याची पद्धत अवलंबिल्यास अधिक माहिती मिळू शकते. त्वचा-वलीमापन करण्या-साठी विशेष प्रकारचे व्यासमापक उपलब्ध असतात त्यांच्या साहाय्याने दंडाची पुढील बाजू व मागील बाजू , पाठीवरील खांद्याच्या हाडाच्या किंचित खालचा भाग आणि पाठीवरील कंबरेच्या हाडाच्या किंचित वरचा भाग अशा चार ठिकाणी मापे घेतली जातात. त्यांची बेरीज ५० —६० मिमी. असावी किंवा कोणत्याही एका ठिकाणी पुरुषांमध्ये २० मिमी. व स्त्रियांमध्ये २८ मिमी. पेक्षा अधिक जाडीची घडी आढळू नये.

यांशिवाय अधिक सखोल अभ्यासासाठी एकूण वसाद्रव्याचे मापन, पोटॅशियमाचे मापन, शरीरातील एकूण पाण्याचा अंश, चुंबकीय अनुस्पंदनी प्रतिमादर्शन ( एमआरआय ) यांसारख्या गुंतागुंतीच्या व किरणोत्सर्गी ( भेदक कण वा किरण बाहेर टाकणार्‍या ) द्रव्यांवर अवलंबून असलेल्या पद्धती वापरल्या जातात.

उपचार : स्थूलतेच्या उपचारांत प्रथम तिच्या कारणांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करणे आणि नंतर उपचाराची रूपरेषा व्यक्तीला नीट समजावून चिकाटीने प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. उपचारात खंड पडल्यास अधिक वेगाने स्थूलता वाढते, हा गैरसमज दूर करणे आवश्यक असते. समुपदेशक आणि आहारतज्ञ यांच्या मदतीने आहार, व्यायाम आणि आवश्यक तेव्हा औषधे वापरून ऊष्मांकांच्या ( कॅलरीच्या ) आय-व्ययातील संतुलन साधता येते.

आहारनियंत्रणात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी करून त्यांच्या ऐवजी प्रथिने, सहज विघटित न होणारी कार्बोहायड्रेटे ( स्टार्च नसलेले बहुवारिक पदार्थ ), फळे व पालेभाज्या यांचे प्रमाण वाढविले जाते. सेल्युलोजासारखे अन्नाचे वस्तुमान वाढवून लवकर पोट भरल्याचे समाधान देणारे पदार्थ यांसाठी उपयुक्त ठरतात. आहार कमी करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केल्यास ती अधिक परिणामकारक व सुरक्षित ठरते. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची पूरक मात्रा देणे आवश्यक असते. भूक कमी करण्यासाठी ॲम्फेटामीन वर्गातील काही द्रव्ये वापरली जातात परंतु निद्रानाश, रक्त-दाबातील वाढ यांसारखे दुष्परिणाम टाळण्याठी औषधांचा वापर शक्यतो टाळणे इष्ट असते. आहारातील परिवर्तन हे तात्पुरते नसून त्याची कायमची सवय लावणे अतिशय आवश्यक असते.

व्यायामाच्या नियोजनात ऊर्जा वापरली जाण्याचे प्रमाण वाढविणारे व्यायाम निवडले जातात. पळणे, पोहणे, भरभर चालणे यांसारखे व्यायाम या दृष्टीने उपयुक्त ठरतात. व्यायाम कमीत कमी किती वेळ करावयाचा याचे वेळापत्रक कटाक्षाने पाळावे लागते. व्यायामाने लागलेली भूक भागविण्या-साठी अधिक आहार घेतला जाणार नाही, याकडे लक्ष देणे ही स्थूल व्यक्ती, उपचार करणारे आणि आप्त या सर्वांची जबाबदारी असते.

शल्यचिकित्सेला स्थूलतेच्या उपचारात अगदी अपवादात्मक परि-स्थितीत स्थान मिळते. अतिस्थूलतेमुळे हालचालींवर मर्यादा पडल्यास किंवा अंतर्गत मेदस्तरांमुळे हृदयाच्या आणि श्वसनाच्या हालचालींना गंभीर धोका निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून वसायुक्त संयोजी ऊतकांचे थर काढून टाकावे लागतात. आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जठराचा काही भाग काढून टाकण्याचा उपायही कधीकधी अवलंबिता येतो. अशा शस्त्र-क्रियेमुळे थोडेसे अन्न खाल्ल्यावर जठर भरते आणि तृप्तीची भावना निर्माण झाल्यामुळे आहारावर आपोआपच नियंत्रण येते. 

श्रोत्री, दि. शं.  

मेदोवृद्धी : ( आयुर्वेद ). व्यायाम न करणारा, दिवसा झोप घेणारा परंतु दूध, तूप, गोड असा कफकारक आहार नेहमी सेवन करणार्‍या व्यक्तीच्या शरीरात अधिक गोड असा आम अन्नरस निर्माण होतो आणि तो अतिस्निग्ध असल्यामुळे त्याच्यापासून शरीरात पोट व त्याभागातील इतर अवयवांमध्ये मेद संचित होऊ लागतो नंतर स्तन, ढुंगण, गळा इ. भागांत साठतो. यांमुळे अतिशय स्थूलता ( लठ्ठपणा ) येते. त्यामुळे तहान, भूक, झोप, घाम, अंगाला दुर्गंधी, झोपल्यावर घशामध्ये घुर घुर आवाज, अंग गळूण जाणे, बोलताना आवाजालाही अडथळा येणे व चालताना थकवा येणे, दम लागणे ही लक्षणे उत्पन्न होतात.

उपचार : मेद कमी व्हावा म्हणून हळूहळू व्यायाम करून त्याचा व्यय व्हावा असे करावे. शरीरामध्ये कोणताही स्निग्ध व मधुर पदार्थ जाऊ देऊ नये. मेद उत्पन्न होण्याचे कारणच नाहीसे करावे आणि शरीरामध्ये असलेला मेद कमी करण्याला रुक्ष असा आहार करावा. त्यामुळे शरीरात मेदोत्पादक द्रव्ये न गेल्यामुळे शरीराचा श्वासोच्छ्वासादी शरीराच्या नित्य कर्मामुळे आणि व्यायामामुळे शरीरात साठलेला मेद खर्ची पडेल आणि मेद कमी होईल. त्याकरिता जव, मूग, कोद्रूचे धान्य, वर्‍याचे तांदूळ, नुसत्या पालेभाज्या अशा ह्या रुक्ष आणि मेदाचे छेदन करणार्‍या आहाराचे नेहमी सेवन करावे. औषधामध्ये शीलाजतू , गुग्गूळ, गोमूत्र, लोहभस्म, रसांजन, मध ह्यांचा उपयोग करावा. आरोग्यवर्धिनी त्रिफळाचूर्ण, गुग्गूळ, चंद्रप्रभावटी, लीलाविलास रस इ. औषधांचे वाढत्या प्रमाणामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने नित्य सेवन करावे आणि शास्त्रामध्ये जी लेखनद्रव्ये सांगितलेली आहेत त्यांचा बस्ती ( एनिमा ) घ्यावा. खडबडीत उटणे ( त्रिफळा इ. द्रव्यांचे ) लावावे. ही चूर्णे त्वचेला लावून ती घासावीत. खरखरीत कपड्याने अंग घासावे. नारळाच्या काथ्यासारख्या खडबडीत अशा आसने व वस्त्रप्रावरणे यांचा शरीराशी नेहमीच स्पर्श होत राहील असे करावे म्हणजे मेद नाहीसा होईल. कष्ट आणि दुःखे मेदस्वी शरीराला सुखोत्पादक व आरोग्योत्पादक असतात.  

पहा : आहार व आहारशास्त्र चयापचय मधुमेह.

जोशी, वेणीमाधवशास्त्री  

संदर्भ : 1. Brownwll, K. D. Foreyt, P. Eds., Handbook of Eating Disorders : Physiology, Psychology and Treatment of Obesity, Anorexia and Bulimia, 1986.

             2. Stunkard, A. J. Stellar, E. Eating and It’s Disorders, 1984.