प्वेब्लो – २ : अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील प्वेब्लो काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०५,००० (१९७५). हे डेन्व्हरच्या दक्षिणेस १७७ किमी. रॉकी पर्वताच्या पायथ्याशी समुद्रसपाटीपासून १,४३० मी. उंचीवर आर्‌कॅन्सॉ नदीकाठी वसले आहे. याचा परिसर शेतीच्या दृष्टीने विकसित आणि चांदी, कोळसा, खनिज तेल, तांबे इ. खनिजांनी समृद्ध असल्याने यास व्यापारी आणि औद्योगिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्थळी अनेक संशोधक येऊन गेले. कायम स्वरूपाची वसाहत येथे १८४२ मध्ये करण्यात आली. १८७३ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. १९२१ मध्ये याची नदीच्या पुरामुळे फारच हानी झाली. पोलाद उद्योग हा येथील प्रमुख उद्योग असून १८८१ मध्ये येथे पहिला पोलाद कारखाना उभारण्यात आला. याशिवाय येथे मांस डबाबंदीकरण, तेलशुद्धीकरण, कातडी वस्तुनिर्मिती इ. उद्योग आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात साजरा केला जाणारा राज्य उत्सव, जवळच असलेले सॅन इझाबेल नॅशनल फॉरेस्ट, काउंटी कोर्ट हाउस, मिनरल पॅलेस इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

लिमये, दि. ह.