नागार्जुन २ : (? १९१० – ).नागार्जुन कवींचे मूळ नाव वैद्यनाथ मिश्र. ‘नागार्जुन’ व ‘यात्री’ या टोपणनावांनी त्यांनी लेखन केले. साहित्यावरच उपजीविका करणारे हिंदीचे ते समर्थ कवी व कादंबरीकार असून त्यांना प्रवासाची जन्मजात आवड आहे. त्यांचा जन्म दरभंगा जिल्ह्यात तरौनी येथे झाला. वयाच्या २०-२१ व्या वर्षीच घरातून बाहेर पडून ते संन्यासी झाले होते. श्रीलंकेला जाऊन अध्ययन व लेखन करण्यासाठी त्यांनी घरदार सोडले होते पण वंशातील एकमेव मुलगा असल्यामुळे त्यांना पुन्हा गृहस्थधर्म स्वीकारावा लागला.

त्यांनी (१९४५) च्या आसपास लेखनास प्रारंभ केला. रतिनाथ की चाची (१९४८), बलचनमा (१९५२), नया पौध (१९५३), बाबा बटेसर नाथ (१९५४), दुखमोचन (१९५७), वरुण के बेटे (१९५७), कुंभी पाक (१९६०), इमरतिया (१९६८), उग्रतारा (१९७०) इ. त्यांच्या कांदबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतून सामान्यतः ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण आले असून त्यांचे मार्क्सवादी विचार त्यांच्या लेखनात प्रतिबिंबित झाले आहेत. कथेचा विकास व अंत, व्यक्तिरेखांची जडणघडण त्यांच्या या पुरोगामी व मार्क्सवादी विचारांनी प्रभावित झालेली आहे. शोषण, आर्थिक विषमता, धार्मिक व सामाजिक रूढी यांवर त्यांच्या लेखनात कोरडे ओढलेले आढळतात. त्यांची बलचनमा कादंबरी विशेष महत्त्वाची आहे.

नागार्जुनांची कविता अनेक प्रयोगांनी समृद्ध झालेली असून तिच्यातील मुख्य प्रवाह प्रगतिशील विचारांचाच आहे. युगधारा (१९५२), सतरंगे पंखोंवाली (१९५९), भस्मांकुर (१९७०), तालाब की मछलियाँ (१९७५) हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कवितेत धारदार विडंबन, मार्मिक उपहास व मर्मभेदी विनोद असून काही कवितांत सुंदर निसर्गचित्रणही आढळते. त्यांची भाषा लोकभाषेशी मिळतीजुळती आहे. लोकमानसाशी हा कवी एकरूप झालेला आहे, याचा प्रत्यय त्यांची प्रत्येक ओळ देत असते. ग्रामीण व नागर दोन्ही प्रकारची भाषा लिहू शकणारा हा कवी संस्कृतचा चांगला अभ्यासू असून संस्कृत शब्दावलीचा प्रचुर उपयोग करून सुंदर कविता लिहू शकतो. हिंदीत प्रगतिशील विचारांचे एक प्रयोगशील कवी म्हणून त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भाषा, लय, जुन्या छंदांचा नव्या तऱ्हेने प्रयोग इ. दृष्टींनी नागार्जुनांनी केलेले बहुविध प्रयोग विशेष लक्षणीय आहेत.

बांदिवडेकर, चंद्रकांत