प्रवाल-सर्प : नाग ज्या सर्पकुलातला आहे त्याच इलॅपिडी कुलात प्रवाल-सर्पाचा समावेश होतो. हे बहुधा लहान पण फार सुंदर रंगांचे असतात. बहुतेकांच्या शरीराची खालची बाजू गुलाबी पोवळ्या रंगाची असते. सगळे प्रवाल-सर्प विषारी आहेत पण माणसाला याच्या विषाची फारशी बाधा होत नाही. प्रवाल-सर्पाच्या एकूण ९-१० जाती आहेत. त्यांपैकी पाच भारतात आढळतात आणि त्यांतील खाली वर्णन केलेल्या तीन महराष्ट्रातही आढळतात.

(१) बारीक प्रवाल-सर्प : याचे शास्त्रीय नाव कॅलोफिस मेलॅन्यूरस आहे. महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात आणि भारतात इतरत्र तो आढळतो. लांबी सु. ४० सेंमी असते. शरीराची वरची बाजू फिक्कट तपकिरी रंगाची असते. डोके व मान काळी असते आणि त्यांच्यावर पिवळे ठिपके असतात. शेपटीच्या बुडाशी एक व टोकावर एक काळे वलय असते. जिवंतपणी शरीराचे खालचे पृष्ठ गुलाबी पोवळ्या रंगाचे किंवा तांबडे असते. विषदंताच्या (विषारी दाताच्या) मागे दोन-तीन सूक्ष्म दात असतात. हा साप विषारी आहे. महाराष्ट्रात अशी समजूत आहे की, हा साप रात्री चावला, तर उजाडण्यापूर्वी रोगी मरतो, म्हणून याला ‘रात’ म्हणतात. हा साप अंडी घालतो.

(२) भारतीय सामान्य प्रवाल-सर्प : भारतात आढळणाऱ्या सगळ्या प्रवाल-सर्पांत हा मोठा आहे. याचे शास्त्रीय नाव कॅलोफिस नायग्रेसेन्स आहे. महाराष्ट्रात पाचगणी, महाबळेश्वर आणि पश्चिम घाटात इतर ठिकाणी तो आढळतो. तामिळनाडू, केरळ वगैरे भागांतही तो सापडतो. लांबी सु.११५ सेंमी. असते. याची बहुतेक लक्षणे ‘रात’सारखीच असतात पण शरीराच्या वरच्या बाजूला रंग फिक्कट तांबडा असून त्यावर पाच काळे पट्टे असतात. त्यांपैकी तीन शेपटीवर असतात. डोके आणि मान काळी असते पण डोक्याच्या मागच्या बाजूवर एक पिवळी वाकडी रेघ असते.

(३) बिब्रोन प्रवाल-सर्प : हा पश्चिम घाटात क्वचित आढळतो. याचे शास्त्रीय नाव कॅलोफिस बिब्रोनी आहे. लांबी सु. ६० सेंमी किंवा थोडी जास्त असते. डोक्याचा पुढचा भाग काळा असतो. शरीराचे खालचे पृष्ठ तांबडे असून त्यावर आडवे काळे पट्टे असतात पाठीचा रंग तांबडा किंवा जांभळा-तपकिरी असतो.

आफ्रिका व अमेरिका खंडांत प्रवाल-सर्प आढळतात व त्यापैंकी काही फारच शोभिवंत असतात.

कर्वे, ज. नी.