व्हीलांट, हाइन्रिाख ओटो : (४ जून १८७७ – ५ ऑगस्ट १९५७). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. पित्ताम्लांवर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९२७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. [→ पित्तरस].

व्हीलांट यांचा जन्म प्फॉर्ट्‌सहाइम-लाडेन येथे झाला. म्यूनिक विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी त्यांनी संपादन केली (१९०१). १९१७ – ५३ या काळात त्यांनी म्यूनिक टेक्निकल विद्यापीठात, फ्रायबेर्ख रासायनिक प्रयोगशाळेत व म्यूनिक विद्यापीठात विविध पदांवर काम केले.

व्हीलांट यांनी द्विकार्बन शृंखला आणि नायट्रोजनाची ऑक्साइडे यांमधील विक्रियेचा सखोल अभ्यास केला. कार्बनी संयुगांमधील नायट्रोजनची भिन्न रूपे एकमेकांपासून वेगळी शोधून काढता येतात व ओळखता येतात, असे त्यांना आढळून आले (१९११). त्यांनी केलेल्या हायड्रॅझिनांवरील अध्ययनामुळे द्विसंयुजी [इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणाऱ्या अंकास संयुजा म्हणतात → संयुजा] आणि चार संयुजी नायट्रोजन असलेल्या मुक्त मूलकांचा (विद्युत्-भाररहित व एक किंवा अधिक अयुग्मित इलेक्ट्रॉन असलेल्या अणुगटांचा) शोध लागण्यास मदत झाली. परिणामतः मुक्त मूलकांच्या वैशिष्ट्यपूर्ण पट्ट वर्णपटामुळे मुक्त मूलके आणि तशीच संरचना असलेले आयन (विद्युत्‌-भारित अणू, रेणू वा अणुगट) यांतील फरक ओळखणे शक्य झाले. व्हीलांट यांनी सुचविलेल्या कृतीमुळे हॅलोजने आणि नायट्रोजन गट बेंझीन केंद्रात समाविष्ट करता येतात. तसेच हायड्रोकार्बन द्विबंधावर (इलेक्ट्रॉनांच्या दोन जोड्या समान रीतीने वाटून घेणाऱ्या अणूंमधील दुव्यावर) नायट्रिक अम्लाची क्रिया करता येते. या शोधामुळे ⇨ ॲलिफॅटिक संयुगे आणि ⇨ ॲरोमॅटिक संयुगे यांच्यामधील परस्परसंबंध समजण्यास मदत झाली.

व्हीलांट यांनी यकृतात तयार होणाऱ्या पित्ताम्लांचे संशोधन केले (१९१२) आणि वेगळ्या करण्यात आलेल्या तीन पित्ताम्लांच्या संरचना सारख्या असून संरचनिकीयदृष्ट्या त्या कोलेस्टेरॉलाशी संबंधित आहेत असे त्यांना आढळून आले. त्यांनी ऑक्सिडीकरणविषयक हायड्रोजननिरासाचा सिद्धान्त  सांगितला. त्यानुसार सजीव ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या वा पेशींच्या समूहांचे) ऑक्सिडीकरण म्हणजे हायड्रोजन अणू काढून टाकणे असून ऑक्सिजन समाविष्ट करणे नव्हे. हा सिद्धान्त शरीक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि वैद्यक या विषयांमध्ये फार महत्त्वाचा ठरला.

लूटव्हिख गॅटरमन यांच्या लॅबोरेटरी मेथड्‌स ऑफ ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री (इं. शी. पहिली आवृत्ती १८४९) या ग्रंथाची सुधारित ३४वी आवृत्ती व्हीलांट यांनी १९५२ मध्ये प्रकाशित केली. कार्बनी रसायनशास्त्रावरील तो अभिजात ग्रंथ समजला जातो.

  व्हीलांट म्यूनिक येथे मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.