राजस्थानी भाषा : राजस्थानी ही अर्वाचीन इंडो-आर्यन भाषा गुजरातीप्रमाणेच मध्यवर्ती भाषासमूहापैकी असून, ती प्रामुख्याने राजस्थान आणि जवळच्या मध्य प्रदेशसारख्या राज्यातील जिल्ह्यांतून बोलली जाते. राजस्थानी भाषकांनी इतर शहरांत स्थलांतर केल्यामुळे या भाषेचा दूरवर प्रसार झालेला आहे, हे प्रसिद्धच आहे. राजस्थानी भाषकांनी हिंदी ही प्रादेशिक भाषा म्हणून स्वीकारलेली असल्यामुळे राजस्थानी भाषक जनगणनेमध्ये राजस्थानी ही आपली मातृभाषा असल्याचे नोंदवतातच असे नाही. म्हणून राजस्थानी भाषा बोलणाऱ्यांची नेमकी संख्या किती असावी, याचा नेमका अंदाज करता येत नाही.

पुराण गुजराती -राजस्थानीचा काळ इ.स. १०३० ते १६३० (१३४० ते १४३० हा भरभराटीचा काळ) इतका मानावा लागतो. नंतर तिचे विभाजन मध्य गुजराती व मध्य राजस्थानी यांमध्ये झाल्याचे दिसते. उपलब्ध पुराव्यांवरून मध्य राजस्थानी भाषेत १४४० पासून १७५० पर्यंत वाङ्मयनिर्मिती होत असल्याचे दिसते. म्हणजे १४४० नंतरही तिची प्राचीन अवस्था वाङ्मयापुरती टिकून राहिली. वाङ्मयीन भाषा पंरपराप्रिय असल्यामुळे ते शक्य होते. राजस्थानी व हिंदी यांचे द्विस्तरीय नाते गृहीत धरूनसुद्धा आधुनिक राजस्थानी भाषेत सर्जनशील वाङ्मय निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न होत आहेत. मध्ययुगीन राजस्थानी वाङ्मय भारतव्यापी अशा भक्तिपंथाशी संबंधित असल्यामुळे, त्याला राष्ट्रीय महत्त्व आले आहे. काही राजस्थानी लेखकांनी राजस्थानीचा प्रभाव असलेल्या काहीशा कृत्रिम अशा ब्रज भाषेत रचना केली. अशा प्रकारच्या राजस्थानी-प्रभावित ब्रज भाषेला ‘पिंगल’ असे म्हणतात, तर ज्या राजस्थानी मातृभाषेत रचना केली त्याला ‘डिंगल’ भाषा म्हणतात. माहेश्‍वरी यांनी आपल्या ग्रंथात(१९६०) या वाङ्मयाची सविस्तर चर्चा केली असून, त्यात मीराबाई, दादू इ. लेखकांच्या वाङ्मयाचा अंतर्भाव आहे.

आधुनिक राजस्थानी बोलींचे ग्रीअर्सन यांनी पुढील प्रकारे वर्गीकरण केले आहे. (१९०८) : (१) पश्चिम घाट (मारवाडी): प्रमाण(मध्यवर्ती), पूर्वी (मेवाडी, मारवाडी-ढुंढारी, गोड़ाबाटी हा अजमेरकडील एकप्रकार) दक्षिणी (गोडबारी, सिरोही देवड़ावाटी, मारवाडी गुजराती संमिश्र) पश्चिमी (थाळी, मिश्र बोली) उत्तरी (बिकानेरी, शेखावाटी, बागडी). (२) मध्यपूर्व गट: जयपुरी / ढुंढारी (प्रमाण, तोरावाटी, काढैरा, चौरासी, नागर्चाल, राजावाटी), किशनगढी, अजमेरी, हाड़ौटी (प्रमाण,सिपाडी). (३) उत्तरपूर्व:मेवाती, अहिरवाटी (४) माळवी (अनेक पोटभेद असलेली) (५) निमाडी.

ध्वनिविचार : अनेक राजस्थानी बोलींतील ग, ज आदी सघोष स्फुट वर्णांना अन्तःस्फुटित पर्याय असतात उदा., पुष्पा गिडवानी (१९७७ : २४–२५) म्हणतात, की मेवाडीतील सघोष स्फुट हे शब्दाच्या शेवटी आले, तर अन्तःस्फुट नसतात पण इतरत्र अन्त:स्फुट असतात आणि हे वैशिष्ट्य अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांच्या मध्य व उत्तरपश्चिम भाषासमूहांतून आढळते (उदा., सिंधी). ग्रीअर्सन(१९०८ : ३३–३४) यांनी महाप्राणत्वाच्या लोपाची म्हणून जी काही उदाहरणे दिली आहेत, त्यामधून असाच काहीसा प्रकार असावा.

पश्चिम व उत्तरपश्चिम भाषासमूहांप्रमाणेच राजस्थानी भाषेत(व गुजरातीतही) हल्लीचा मूर्धन्य ‘ण’ व ‘ळ’ हे मध्य इंडो-आर्यन भाषांमधील अनुक्रमे एकेरी न् आणि एकेरी ल् यांपासून आले आहेत तर नवीन दन्तमूलीय ‘न’ व ‘ल’ हे मध्यभारतीय द्वित्वयुक्त ‘न्न्’ व ‘ल्ल्’ यांपासून अनुक्रमे आलेले आहेत.

शब्दभंडार : राजस्थानी शब्दसंग्रह जवळजवळ गुजराती शब्दसंग्रहासारखाच आहे: तर गुजराती शब्दभांडार हे लगतच्या अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांपेक्षा वेगळे आहे. उदा., मुलगी हा शब्द घेतला, तर त्यास राजस्थानी छोरी गुजराती छोकरी हिंदी लडकी मराठी मुलगी हे शब्द आहेत.

नामविकार : गुजरातच्या लगतच्या प्रदेशातील राजस्थानीच्या बोलीत तीन लिंगे वापरतात. इतरत्र दोन लिंगांचा वापर केला जातो. ह्या बोलीत प्रथम पुरूषाची बहुवचनाची दोन रूपे आहेत. एक समावेशक (मराठी ‘आपण’ सारखे) ‘आपाँ’ आणि दुसरे व्यावर्तक (मराठी ‘आम्ही’ सारखे) ‘म्हे’. नामाचे प्रातिपदिकास प्रथमा, कर्तृवाचक, सामान्यरूप, सप्तमी व संबोधन विभक्ती असेविकार होतात आणि विभक्तीदर्शक उत्तरयोगी रूपांच्या साहाय्याने त्याची द्वितीया, पंचमी, षष्ठी आणि विश्‍लेषणात्मक सप्तमीची रूपे होतात. अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांच्या इतर समूहांप्रमाणेच द्वितीयेने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्माचा बोध होतो. कर्तृवाचक विभक्ती ही हिंदीसारख्या भाषेतील ‘ने’ या रूपासारखी असून ती प्रत्ययघटित विभक्ती आहे (उत्तरयोगीपदाने दाखवली जात नाही). काही कर्मणी रचनेत कर्त्याला कर्तृविभक्तीचा बोध करून देणारे उत्तरयोगी प्रत्यय लागले, तरी कर्ता व क्रियापद यांची रूपसंगती लागते. हीच गोष्ट मॅगिअर (१९३८) व त्यावरून वॉलिस (१९८५) यांनी निदर्शनास आणली आहे.

क्रियापद-विकार : राजस्थानीत जुन्या साध्या वर्तमानकालाचा स्वार्थी उपयोग टिकवून धरला गेला आहे. याचा संभावनादर्शकही उपयोग होतो पण हिंदीत मात्र तो पूर्णपणे केवळ संभावनादर्शक म्हणूनच वापरला जातो. राजस्थानी बोलीत निश्चित वर्तमान हा वर्तमान धातुसाधिताला सहायक अस्तित्ववाचक क्रियापद लागून होत नाही, तर वर्तमानकाळाला लागून होतो. उदा., मारूँ छूँ ‘मी मारतो-ते’ (मारतो–छूँ) असे रूप होत नाही. तसेच क्रियावाचक नामाच्या सामान्यरूपाला सहायक रू जोडून अपूर्ण भूतकाळ होतो. ‘मै मारतो छो’ असे न होता, ‘मैं मारै छो’ असे म्हणजेच ‘मी मारण्यात होतो’ म्हणजेच ‘मी मारत होतो’ असे होते. अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांच्या इतर अनेक भाषांसमूहांत ‘–य–’ या बहुशः आढळणाऱ्या प्रत्ययाचा भूतकाळात वापर करून केलेली कर्मणी वाक्यरचना आढळते. आणखी दोन लक्षणे अशी आहेत: भविष्यकाळात एक ‘–ल–’ (हिंदीत याचे साम्य–ग–शी आहे.) आणि शौरसेनी प्राकृताचा

–स्य–हा दोन्ही राजस्थानीत टिकून आहेत. क्रियापदाचा शेवट ‘–बो’ किंवा ‘–णू’ मधे होतो आणि धातुसाधिताच्या शेवटी–(आ)र येतो. ‘कोनै’ या नकारार्थी अव्ययाचा क्रियापदाला जोडून उपयोग होताना त्यामधले दोन घटक कधीकधी वेगळे पडलेले दिसतात. उदा., कोई–ई आदमी को–देतो–नै ‘कोणीही माणूस देत नसे’आणि ‘कोनै रोऊ’‘(मी) रडत नाही.’

जी.ए.ग्रीअर्सनच्या (१९०८) म्हणण्याप्रमाणे हे वर्णन साधारणतः जयपुरी बोलीला धरून केलेले आहे. इतर बोली याच्याशी कमीअधिक समान आहेत- म्हणून वरील वर्णन संपूर्ण राजस्थानीच्या बाबतीतही फारसे चूक ठरणार नाही पण मॅगिअरने मारवाडीसंबंधी काही संशोधन केले आहे आणि त्याच्या पुस्तकाच्या प्रसिध्दीनंतर भाषाभ्यासकांना मारवाडी ही प्रमाण बोली समजून तिच्या संदर्भात राजस्थानीच्या इतर बोलींचा विचार करावा लागेल. [⟶ मारवाडी(डिंगल) भाषा].

संदर्भ : 1. Gidwani, Pushpa. “Descriptive Analysis of Mewari”, (Unpublished M. A. Dissertation, Deccan College, Pune), 1977.

2. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. IX, Pt.II, Delhi, 19०8.

3. Magier, David, “Systems of Ergativity in Marwari”, (Read at Fifth Roundtable on South Asian Languages Analysis, at Urbana, Illinois), 1983.

4. Wallace, William D. “Subjects and Subjecthood in Nepali” (Unpublished Ph.D. Dissertation, University of Illinois, Urbana-Champaign), 1985.

५. माहेश्वरी, हीरालाल, राजस्थानी भाषा और साहित्य, कलकत्ता, १९६०.

६. लालस, सीताराम, राजस्थानी व्याकरण (राजस्थानी भाषेत), जोधपूर, १९५४.

दासगुप्त, प्रबाल (इं.) रानडे, उषा, (म.)