राजस्थानी साहित्य : राजस्थानी साहित्यपरंपरेत प्राचीन साहित्य उपलब्ध आहे. या साहित्याला लोकसाहित्याची मोठी परंपरा आहे. एम. डी. देसाई यांनी संपादित केलेल्या जैन गुर्जर कविओ या पुस्तकात सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या कवींच्या रचनांचा संग्रह केला आहे. जी धार्मिक गाणी गायली जातात, त्यांतही ही परंपरा दिसते. शिवाय पोवाड्यांतूनही वीरगाथा, रामायण, महाभारताच्या कथा ऐकावयास मिळतात. ‘बगरवत भारत’, ‘पाबूजी रा वाडा’, ‘भीम भारत’, ‘नर्सीजी रो माहेरो’, ‘रुक्मिणी रो ब्यावलो’, ‘शिवाजी रो ब्यावलो’, सारखे पोवाडे प्रसिद्ध आहते. ‘निहाल दे-सुलतान’ ‘धोला-मारू’ सारखी प्रेमकथा सांगणारी गीते आहेत तर चनणा, नागजी, भूमाल, पन्ना, राणा कछवा सारख्यांची प्रेमगीतेही आहेत. याशिवाय प्रसंगानुसार गायली जाणारी हजारो गीते राजस्थानीत आहेत.

कवितेच्या संदर्भात १०५० ते १४५० असा प्रारंभिक काळ मानला जातो. हा काळ जैन कवींचा आहे. त्यांनी रास, फागू, चतुष्पदी, चौपाई, स्तवन, स्तोत्र, यासारख्या छंदामधून कविता लिहिली. धनपालचे सच्चौरीय महावीर उत्साह (अकरावे शतक), पल्लाचे जीनदत्त सूरी स्तुति (बारावे शतक), देव सूरीचे भरतेश्‍वर बाहुबली घोर (तेरावे शतक), सोम मूर्तीचे जीन प्रबोध सूरी चर्चरी (चौदावे शतक),राजशेखर सूरीचे नेमिनाथे फागु (पंधरावे शतक) अशा काही महत्वाच्या कृती आहेत. शारंगधर, श्रीधर यांच्या कृतीही आहेत. नरपती नाल्हचा विसालदेव रास (सु. १२१५) हा रासो प्रकारातील काव्यग्रंथही मौखिक परंपरेतूनच उपलब्ध झाला आहे.

कवितेचा मध्यकाल १४५० पासून पुढे मानला जातो. यात अनेक गीते व दोहे लिहिलेले दिसतात. राजांच्या कथा, धार्मिक प्रसंग, पुराणप्रसंग, युद्धकथा यावंर दीर्घ कविता लिहिल्या गेल्या. पंधराव्या शतकातील पद्मनाभाचा कान्हडदे प्रबंध, सोळाव्या शतकातील विहूसूजोचा चंद राउ जयतसी राउ, सतराव्या शतकातील राठोड पृथ्वी राजचा कृष्ण रुक्मिणी री वेली, अठराव्या शतकातील वीरभाणचे राजरूपक, १९ व्या शतकातील कृपाराम खिडियाचे राजिया र सोरठा यासारख्या महत्वाच्या कृतींचा निर्देश आर्वजून करावा लागेल.

याशिवाय नाथ संप्रदायातील पृथ्वीनाथ, मानसिंग, बाणनाथ, बिष्णोई संप्रदायातील जांभोजी, उदोजी, परंमानंद जसनाथी संप्रदायातील करमदास, देवोजी निरंजनी संप्रदायाचे हरिदास, तुलसीदास निंबार्क संप्रदायातील परशुराम देव दादू पंथातील दादू, रज्जब, सुंदरदास आणि इतर अनेक विभिन्न संप्रदायी कवी होऊन गेले.

आधुनिक काव्याची सुरुवात खऱ्या आर्थाने व्या शतकाच्या चौथ्या दशकात झाली. पाश्चात्य संस्कृती व ज्ञानाचा जो प्रभाव इथल्या जीवनावर पडू लागला, त्याचे ठसे काव्यातही उमटू लागले. आर्य समाजी आंदोलन, गांधीजींचे आंदोलन यांच्या प्रभावाने सरंजामदारांच्या वर टीका होऊ लागली. मार्क्सवादाच्या प्रभावाने भांडवलशाही विरोधी कविता लिहिली जाऊ लागली. याच कालखंडात हिंदी वाङ्मयाचाही प्रभाव राजस्थानीवर पडू लागला.

१९५० नंतरची साहित्यनिर्मिती तर हिंदी वाङ्मयाच्या धर्तीवरच होऊ लागली. चंद्रसिंगचे बादळी हे नव कवितेचे पहिले पुस्तक होय. यांत वाळवंटातील माणसाची सुखदुःखे आहेत. मानवी जीवनाच्या आशापूर्तीचे आश्‍वासन देणाऱ्या कविता आहेत. लू हा त्यांचा आणखी एक काव्यसंग्रह. यात ढग, वारा यांचे नव्या संदर्भात केलेले चित्रण पहावयास मिळते. त्यात माणसाच्या उणीवाही कवीने दाखविल्या आहेत. गणेशीलाल उस्ताद हे लोकांचे आवडते कवी होत. स्वातंत्र्य पूर्व काळात त्यांनी दुःखाला व निराशेला वाचा फोडली त्याबरोबर संघर्षाचेही आवाहन केले. स्वातंत्र्योत्तर काळात हाच कवी आनंदी व आशावादी बनलेला पाहावयास मिळतो. मेघराज मुकूल हा कवी ‘सेनानी’ कवितेपासून प्रकाशात आला आणि हजारो लोकांना आश्चर्यचकित करणारा ठरला. सुमेरसिंग शेखावत यांचे मेघमाल व नारायणसिंग भाटी यांच्या सांझसारख्या संग्रहातून मात्र विशुद्ध निसर्गकविता पहावयास मिळते. भाटींनी तर कालिदासाच्या मेघदूताचा राजस्थानीत अनुवादही केला. रेवतदान हा कवी स्वातंत्र्ययुद्ध काळातील होय. जमीनदारीच्या विरुद्ध, सामाजिक असमानतेविरुद्ध याने आवाज उठवला. जगनारायण व्यास हाही याच विचाराचा कवी असल्याने त्याची कविता साम्यवादी वळणाची झाली आहे.

सत्यप्रकाश जोशी हा प्रथम हिंदीतून लिहिणारा, पण नंतर राजस्थानीतून नवीन छंद व मुक्तछंद यांचा वापर करणारा कवी आहे. त्यांनी लोकगीतांतून नवीन प्रेरणा घेतल्या, तसेच अभिव्यक्तीची नवी पद्धतही अंगीकारिली. व्यक्तीच्या आंतरिक जीवनातील भावनिक प्रसंगांना वाट करून देताना त्यांनी मानसिक सखोलताही दाखविली. एन. एस. भाटींनीही असेच केले. दोघांनी राधा व मीरेची कथा नव्या रूपात विचार व भावनांना जागृत करेल अशा पद्धतीने सांगितली आहे. कन्हैयालाल सेठीया यांच्या काव्यात भाषेचे सौंदर्य पहावयास मिळते. त्यांच्या कवितेतील शब्दांच्या कोट्या, विनोद हे त्यांचे विशेष होत. व्यंग व विनोद यासांठी विश्वनाथ विमलेश आणि बुद्धिप्रकाश यांचे नाव घेतले जाते.

कवितेच्या क्षेत्रात १९६० नंतर मात्र लक्षणीय अशी निर्मिती झालेली दिसत नाही. त्यानंतर मात्र व्यावसायिक बंधने सोडून तसेच कविसंमेलनासारखे विचार सोडून एक नवीन कवींची पिढी उदयास आलेली दिसते. यात मणिमधुकर, सी. पी. देवल., तेजसिंग जोधा, गोवर्धनसिंह, शेखावत, पारस अरोडा ही नावे उल्लेखनीय होत. मणिमधुकरांचे पग फेंरो, सी. पी. देवलांचे पागी, हे पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रह होत. नंद भारद्वाज यांचा अंधारपख, गोवर्धनसिंह यांचा किरकर, आर. डी. श्रीमाली यांचा म्हारो गांव (१९७८) इ. प्रसिद्ध रचना आहेत.

राजस्थानी नाटकाची सुरुवात मात्र अलीकडची आहे. येथील नाटककारांनी संस्कृतची नाट्यपरंपरा न स्वीकारता सर्वसामान्य माणसाचे मनोरंजन करणारे ‘ख्याल’, ‘नृत्य’, ‘लीला’ यांसारखे प्रकार हाताळले. मराठी-गुजरातीशी संबंधित लेखकांनी नाटक लिहिण्यास सुरुवात केली. शिवचंद्र भारतीय (१८५३–१९१८) यांची केशरविलास (१९००), बुढापा की सगाई (१९०६), फाटका जंजाळ (१९०७) भगवतीप्रसाद दारुक यांची वृद्ध विवाह (१९०३), बाल विवाह (१९२०), ढळती फिरती छायाँ (१९२०), कल्‌कतिया बाबू (१९२२) या नाटकांबरोबरच गुलाबचंद नागौरी, नारायणदास सारडा, श्री नारायण अगरवाल, बालकृष्ण लाहोटी, घाशिराम यांच्यासारखे राजस्थानापासून दूर वास्तव्य करून असणारे पण राजस्थानीतून लिहिणारे नाटककार झाले. यांचा प्रभाव येथील रंगभूमीवर फारसा पडला नाही पण येथील प्रदेशात वास्तव्य असलेल्या नाटककारांनी आपापल्या शैलीमध्ये जी नाटके लिहिली, ती पहावयास मिळतात. जयपूरचे एम्. एम्. सिद्ध यांचे जयपुर की ज्योणार, एम्. एन्. भट्टांचे महाकाव्यसदृश्य रंभा रमण (१९२०), जमनालाल पछेरीयांचे नई बीनणी, भरत व्यासांचे रंगीलो मारवाडधोला-मारू (प्रसिद्ध प्रेमी युगल) यांसारखी नाटके निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर आज्ञाचंद्र भंडारीचे पन्ना धाय, जी. एल. शास्त्रींचे प्रणवीर प्रताप, यादवेंद्र चंद्राचे ताश रो घर सारखी नाटकेही पुढे आली. या नाटकांचे विषय सामाजिक व व्यापार करणाऱ्या समाजाशी संबंधित होते. पछेरीया व व्यास यांनी रंगीभूमीवर सादर करण्यायोग्य नाटके लिहिली पण त्यांस विशिष्ट हेतू नव्हता, केवळ काही सामाजिक व प्रणयपर कथांची गुंफण होती. भंडारी व शास्त्री यांनी उज्वल भूतकाळ रंगविला, तर भट्टांनी जुन्या कथा रंगविल्या. सिद्ध यांनी विनोदाची कास धरली, यादवेंद्रानीं आजची उदासिनता दाखवली व ए. आर्. सुदामा यांनी (बढती अन्वळाई) आजच्या लाचलुचपतीचे दर्शन घडवले. अर्जुनदेव चरण यांनी दो नाटक आज रा सारखे प्रायोगिक नाटक लिहिले. आधुनिक नाटककारांनी पाश्चात्त्य साहित्यातून नवे तंत्र उचलले व नव्या नाटकांची उभारणी केली, ही वस्तुस्थिती आहे. हीच गोष्ट एकांकिका व नभोनाट्यांनाही लागू पडते. मनोहर शर्मांचा राजपूत परंपरेवर आधारित नैणसी रो साको हा प्रसिद्ध एकांकिका-संग्रह आहे. जी. एल्. माथुर व जी. एल्. व्यास यांनी सहकार, पंचायत राज्य, समाजविकास यांवर आधारित एकांकिका लिहिल्या. विसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात दिवंगत झालेल्या शोभाराम जम्मडचे नाव विनोदी व व्यंग्यपूर्ण लेखक म्हणून आर्वजून घेतले जाते. एकंदरीत राजस्थानातील नाटकाचा विशेष विकास झालेला पहावयास मिळत नाही.

नाटकाप्रमाणेच कादंबरीची सुरुवात करणारे राजस्थानपासून दूर गेलेले लेखकच दिसतात. शिवचंद भारतीयांची कनक सुंदर (१९०३), एस्. एन्. आगरवाल यांची चंपा (१९२५) यांचा प्रभाव स्थानिक लेखकांवर पडला नाही. बिकानेरचे एस्. एन्. जोशी हे आद्य राजस्थानी कादंबरीकार मानले जातात. त्यांची आभइ पटकी (१९५२) ही कादंबरी आहे. या नंतर दहा वर्षांनी एक महत्त्वपूर्ण कादंबरी प्रकाशात आली, ती म्हणजे अन्नाराम यांची महकती काया मुळकती धरती (१९६६) ही होय. यानंतर एस्. एन्. जोशी यांची धोराँ रो धोरी (१९६८), यादवेंद्र चंद्र यांची हूँ गोरी किण् पीव री (१९७०) या नंतरच्या काळातील काही महत्त्वाच्या कादंबऱ्या होत. यानंतरच्या काळात आर्. एन्. शर्मा यांची काळ भैरवी, यादवेंद्र यांची जोग संजोग, सत्येन जोशी यांची कँवल पूजा, प्रेम जी प्रेम यांची सेळी चानव खज्यूर की, बी. एल्. माली यांची मानख रा खोज, पारस अरोडा यांची खुल्‌ती गंठान, तसचे व्ही. के. देथा यांनी लोककथा शैलीत लिहिलेली टिडो राव ही कादंबरीही प्रसिद्ध आहे.

या कादंबऱ्यांतील बऱ्याचशा कादंबऱ्या सामाजिक समस्यांवर आधारल्या आहेत. त्यामुळे त्यात विधवाविवाह, आंतरजातीय विवाह यांचे चित्रण आहे. कँवल पूजा ऐतिहासिक आहे, तर काळ भैरवीमध्ये तंत्रमार्गी तांत्रिकांचे चित्रण आहे. त्रिशंकू मध्ये राजकारणाचे चित्रण आहे. सुदामा यांनी खेड्यातील लोकांच्या पिळवणुकीचे चित्रण केले आहे. यादवेंद्र यांचे तंत्र सुंदर आहे, तर सुदामांची भाषा फारच सुरेख आहे. विजयदान देथांची मा-रो-बदलो ही दोन भागांतील बृहद् कादंबरी मानवतेचे माहात्म्य सांगते. ती एका लोकथेच्या आधारे त्यांनी लिहिली आहे. राणी लक्षीकुमारी चूंडावत, मूळचंद प्रानेश, डॉ. मनोहर शर्मा यांनीही लोककथांवर आधारित कादंबऱ्या लिहिल्या.

राजस्थानातील अठराव्या शतकापासून कथेचा आढळ होतो पण ती आधुनिक कथेहून भिन्न अशी आहे. नवीन कथाकारांनी जुनी परंपरा पाहिली नाही. शिवचंद्र भारतीय हे पहिले राजस्थानी कथाकार मानले जातात. ‘विश्रांत पथिक’ (१९०४) ही त्यांची पहिली कथा आहे. यानंतर गुलाब चंद्र नागौरी, शिवनारायण तोष्णीवाळ, छोटाराम शर्मा, ब्रजलाल बियाणी यांनी भारतीय यांचे अनुकरण केले. त्यांनी सामाजिक विषयांवर आदर्शवादी कथा लिहिल्या.

एम्. डी. व्यास यांच्या ‘वरसगाँठ’ (१९५६), ‘इक्केवाळो’ या कथांनी आधुनिक कथेचा पाया घातला. त्यांना प्रेमचंदापासून प्रेरणा मिळाली. त्यांची व्यक्तिचित्रेही प्रसिद्ध आहेत. त्यांचा मार्ग अनुसरणारे लेखक म्हणजे बी. एन्. पुरोहित (अटरवाँ, १९७३ व वकिलसाहब, १९७३) आणि एस्. आर्. चंगाणी (ओळखाँ, १९७६) हे होत.

चंद्रसिंग, श्री चंद्र रे यांनी वेगळ्या कथा लिहिल्या एल्. के. चूंडावतने राजपूतांच्या दिव्यतेच्या, भव्यतेच्या कथा सांगितल्या. त्यांत मांझल रात (१९५७), मूमल (१९६१) प्रसिद्ध होत. विजयदान देथांनी बाताँ री फुलवाडीच्या चौदा संग्रहातून अशा लोककथाच लोकशैलीत वर्णन केल्या.

स्वातंत्र्योत्तर काळात एन्. आर्. राजपुरोहितांचे श्रेष्ठ कथाकार म्हणून नाव घेतले जाते. रात वासो, अमर चुनडी हे त्यांचे प्रसिद्ध संग्रह होत. आर्. डी. श्रीमालींचा सळवटाँ, मूळचंद प्रानेश यांचे उकळता आंतर सिळा साँस, चश्म दीठ गवाह हे संग्रह प्रसिद्ध होत. यांशिवाय मनोहरशर्मा, दामोदर शर्मा, प्रेम जी प्रेम, विनोद सोमाणी, सचिंद्र उपाध्याय यांनी अनेक चांगल्या कथा लिहिल्या, श्रीमालींनी वास्तववादी कथा लिहिल्या. दहियांनी स्वतंत्र कथातंत्र आत्मसात केले. प्रानश व मनोहरशर्मा यांनी ग्रामीण व मध्यमवर्गीय जीवनावर कथा लिहिल्या. यांशिवाय दुष्काळ, भ्रष्टाचार, सामाजिक-नैतिक पतन, सामाजिक पिळवणूक, आंतरजातीय विवाह, मागासवर्गीयांचे प्रश्न , युवकांची उदासीनता यांवर कथा लिहिल्या गेल्या आहेत.

निबंध आणि चरित्रेही राजस्थानीत लिहिली गेली आहेत. बालवाङ्मयही बरेच आहे. टीकात्मक वाङ्मय मात्र हिंदीमधून लिहिले गेले आहे. नवीन लेखक साहित्याला आकार देत असले, तरी त्यातून अद्याप नवी चळवळ किंवा विशिष्ट दिशा राजस्थानी साहित्यास लाभलेली दिसत नाही.

संदर्भ: 1. George, K. M. Ed., Comparative Indian Literature.Vol.2. Trichur, 1985.

2. Maheshwari, Hiralal, History of Rajasthani Literature, Delhi, 198०.

3. Sriniwas Iyengar, K. R. Ed., Indian Literature Since Independence, New Delhi, 1973.

४. चूंडावत, रानी लक्ष्मीकुमारी, राजस्थानी लोकगीत, जयपूर १९५७.

५. चोरवानी, रामदेव, संपा. राजस्थानी साहित्य का महत्त्व, काशी, १९४३.

६. जानी, मदनकुमार, राजस्थान एवं. गुजरात के मध्यकालीन संत एवं भक्त कवी (इ. स. १४०० से १७०० तक), मथुरा.

७. नाहटा, अगरचंद, राजस्थानी -साहित्य की गौरवपूर्ण परंपरा, कलकत्ता १९६७.

८. नाहटा, किरन, राजस्थानी साहित्य: प्रेरणास्त्रोत और प्रवृत्तिंयाँ, जयपूर, १९७४.

९. भानावत, नरेंद्र, राजस्थानी साहित्य : कुछ प्रवृत्तियाँ, जयपूर, १९६५.

१०. मेनारिया, एम्. एल्. राजस्थानी भाषा और साहित्य, प्रयाग, १९७८.

कोटबागे, व्यं. वा.