दोदे, आल्फाँस : (१३ मे १८४०–१६ डिसेंबर १८९७). फ्रेंच कादंबरीकार आणि कथाकार. दोदेचा जन्म दक्षिण फ्रान्समधील नीम येथे झाला. त्याचे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. लहान वयात व अनोळखी गावात त्याला शिक्षक म्हणून काम करावे लागले. या काळातील कडूगोड अनुभव त्याने ल् पती शोझ (१८६८, इं. शी. द लिट्ल गुड फॉर नथिंग) या कादंबरीत रेखाटले आहेत. त्यानंतर दोदे पॅरिसला आपल्या भावाकडे गेला. वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्याच्या कथा लॅत्र द माँ मुलँ (इं. शी. लेटर्स फ्रॉम माय विंडमिल) ह्या शीर्षकाखाली संगृहीत झाल्या (१८६८). प्रॉव्हांसच्या लोकांचे जीवन, तेथील निसर्गसौंदर्य, लहानलहान गावांतील वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती आणि धार्मिक समारंभ हे सर्व दोदेने आत्मीयतेते चित्रित केले आहे. नमुनेदार वाक्प्रचार व म्हणी ह्यांनी ओतप्रोत भरलेली प्रॉव्हांसची लयदार बोली, प्रचारात असलेल्या दंतकथा ह्यांचाही प्रभावी उपयोग त्याने आपल्या कथांसाठी करून घेतला. फेलिब्रीज चळवळीचा सूत्रधार, विख्यात फ्रेंच कवी मिस्त्राल याचा दोदेशी १८६० मध्ये परिचय झाला होता. एक जिवंत भाषा म्हणून प्रॉव्हांसाल भाषेचे व साहित्याचे पुनरुज्जीवन करणे हा फेलिब्रीज चळवळीचा हेतू होता. दोदेवरही तिचा प्रभाव पडला.

तार्तारँ द तारास्कों (इं. शी. तार्तरिन ऑफ तारास्कों) ही कादंबरी १८७२ मध्ये प्रसिद्ध झाली व त्यानंतरच्या काळात तार्तारँच्या जीवनावरील इतर कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. दक्षिण फ्रान्सच्या लोकांची वैशिष्ट्ये टिपून घेऊन त्याने त्यांची खेळकरपणे टर उडविली आहे.

निसर्गवादी संप्रदायाच्या कलातत्त्वांना अनुसरून त्याने औद्योगिक, सामाजिक जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्याही लिहिल्या. त्याच्या जाक (१८७६), साफो (१८८४) ह्या सुप्रसिद्ध कादंबऱ्यांत त्याने नैतिक दृष्ट्या शिथिल असलेले जग रंगवले आहे. निसर्गवादी संप्रदायाची पद्धती त्याने स्वीकारली, तरी दोदेचा आशावाद, त्याचा विनोद, त्याची भावनास्पर्शी काव्यमय शैली त्याचे वेगळेपण स्पष्ट करतात.

दोदेची तुलना इंग्रजी लेखक डिकिन्झशी केली जाते. औद्योगिक युगात गरीब लोकांचे होत असलेले हाल व लहान मुलांना कोवळ्या वयात पैसे मिळविण्याकरिता करावी लागत असणारी धडपड दोघांनीही विलक्षण आत्मीयतेने वर्णिली आहे. दोदेने काही नाटकेही लिहिली. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Dobie, G. Vera, Alphonse Daudet, London, 1949.

            2. Sachs, Murray, The Career of Alphonse Daudet, Cambridge (Mass.), 1965.

टोणगावकर, विजया