शांसाँ द जॅस्त : फ्रेंच साहित्यातील प्राचीन वीरकाव्ये. बाराव्या ते पंधराव्या शतकांतील अशा सुमारे ८० ते १०० वीरकाव्यांची हस्तलिखिते उपलब्ध आहेत. काव्यांच्या विशेष उत्कर्षाचा कालखंड म्हणजे अकरावे ते चौदावे शतक हा होय. एकोणिसाव्या शतकापासून या काव्यरचनांचे संपादन व भाषिक आधुनिकीकरण करण्यास चालना मिळाली.

ही वीरकाव्ये साधारणतः एक हजार ते वीस हजार ओळींपर्यंतची आहेत. ह्या वीरकाव्यांना समकालीन घटनांचे वर्णन करणाऱ्यास पूर्वकालीन स्फुट रचनांची पार्श्वभूमी आहे. जर्मनिक लोकविद्या आणि परंपरा ह्यांचा ह्या कवितांवर प्रभाव असावा. दुसऱ्या एका मतानुसार रॉलां, जिरार्ड द रूसिल्याँ ह्यांसारख्या वीरांच्या स्मृतिस्थळांना भेटी देणाऱ्या यात्रेकरूंना मठवासी संन्याशांनी सांगितलेल्या कथांवरून ही वीरकाव्ये रचिली गेली असावीत. ह्या कथांमध्ये स्वतःच्या कल्पनांची भर घालून ‘त्रुव्हॅर’ आणि ‘जाँग्लर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रेंच कवींनी त्यांची रचना केली. यात्रेकरूंना मठांकडे आकृष्ट करण्यासाठी ह्या संन्याशांनी स्वतःही ही वीरकाव्ये रचिली असणे शक्य आहे. ही वीरकाव्ये मौखिक परंपरेने सादर होत असल्याने, त्यांच्या मूळ संहिता सतत बदलत गेल्याचे दिसते.

लौकिक पराक्रम व धार्मिक भावना, ह्या दोन प्रबल प्रेरणांतून ही वीरकाव्ये निर्माण झाली. ऐतिहासिक घटना व काल्पनिक प्रसंग ह्यांची विलक्षण गुंतागुंत आणि अतिशयोक्तिपूर्ण, अवास्तव वर्णन त्यांत आढळतात. 

तेराव्या शतकातील त्रुव्हॅर यांनी ह्या वीरकाव्यांची विभागणी तीन साखळ्यांत केलेली आहे : (१) शार्लमेन राजाच्या राजवटीशी निगडित असलेली वीरकाव्ये. यांत सर्वांत प्राचीन आणि वाङ्‌मयीन दृष्टा उत्कृष्ट अशा ⇨ ला शांसाँ द रॉलांचा समावेश होतो. (२) दुसऱ्या साखळीत ‘गारां द मोंग्लान’ची साखळी अथवा ‘जॅस्त द गीयोम’ किंवा ‘एम्‌रिद’ची साखळी म्हटले जाते. यात सॅरसेनांच्या विरुद्ध गारां द मोंग्लान आणि त्याच्या वंशजांनी केलेल्या लढाया व त्यांचे पराक्रम वर्णिलेले आहेत. तिसरी साखळी दून द मेयांसची. बंड आणि फितुरी करणाऱ्या सरदारांना अखेरीस राजसत्तेपुढे कसे नमावे लागते, हे ह्या रचनांतून दाखवले आहे.

ह्या वीरकाव्यांतील व्यक्तिचित्रण साचेबंद आहे. पुढेपुढे मंत्रतंत्र, जादू, अतिमानुषाचे आणि अद्‌भुताचे आविष्कार त्यांत दिसू लागले. तत्कालीन उच्च वर्गाच्या चालीरीती, पोशाख, शस्त्रास्त्रे इत्यादींचा तपशील त्यांत मिळतो. शांसाँ द बेर्त्रां दी गेस्क्लां  हे १३८४ मध्ये लिहिले गेले. पंधराव्या शतकाच्या आरंभी लिहिले गेलेले द जॅस्त बुरगिन्नो   हे ह्या परंपरेतले अखेरचे वीरकाव्य होय.                                                  

 टोणगावकर, विजया