उनसेट, सिग्री : (२० मे १८८२–१० जून १९४९). नॉर्वेजियन लेखिका. जन्म डेन्मार्कमधील कालुनबॉर ह्या शहरी. तिचे वडील पुरातत्त्ववेत्ते होते. त्यांच्या अकाली निधनामुळे उनसेटला नोकरी करावी लागली. दहा वर्षांच्या नोकरीत तिला विविध अनुभव आले. शहरात नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणींच्या व्यथा तिने आपल्या लेखनातून समर्थपणे मांडल्या. तिला १९२८ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. Fru Marta Oulie (१९०७), Den Iykkelige alder (१९०८), Jenny (१९११, इं. भा. १९२०) ह्या सर्वच कादंबऱ्यांतून सुखस्वप्‍ने पाहणाऱ्या तरुणींची वैफल्यग्रस्तता साकारली आहे.

तिचे वडील पुरातत्त्ववेत्ते असल्याने तिलाही इतिहासाचे आकर्षण होते. तिचे दोन ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. मध्ययुगीन नॉर्वेच्या इतिहासावर त्या आधारलेल्या आहेत. त्यांपैकी एक Kristin Lavransdatter (१९२०—२२, इं. भा. १९२३—२७) ही विसाव्या शतकातील यूरोपमधील एक श्रेष्ठ कादंबरी समजण्यात येते. Olav Audunsson (१९२५–२७) ही तिची दुसरी ऐतिहासिक कादंबरी.

ती रोमन कॅथलिक बनल्यानंतरच्या तिच्या कादंबऱ्यांवर धार्मिक विचारांचा पगडा दिसतो. त्यांपैकी Ida Elisabeth (१९३२, इं. भा. १९३३) Den trofaste hustru (१९३६, इं. भा. द फेथफुल वाइफ, १९३७) ह्या प्रमुख होत. Madame Dorathea (१९३९, इं. भा. १९४०) ही तिची शेवटची कादंबरी.

दुसऱ्या महायुद्धात नाझी फौजांनी नॉर्वेचा ताबा घेतला आणि ती अमेरिकेला गेली. तिथे तिने व्याख्याने आणि लेखन यांद्वारे नाझीवादावर कठोर हल्ले चढवले आणि नॉर्वेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. युद्ध संपल्यावर ती नॉर्वेला परतली. ऑस्लो येथे ती निधन पावली.

जगताप, दिलीप