शोधक : (रेडिओ तरंग शोधक डिटेक्टर). रेडिओ संदेशवहनशास्त्रात ज्या अरेषीय प्रयुक्तीव्दारे विरूपित रेडिओ तरंगामधून मूळ माहिती (अवगम) किंवा इष्ट संकेत परत मिळविला जातो तिला शोधक म्हणतात.

शोधन क्रिया : प्रेषित संकेत (बहुधा श्राव्य कंप्रतेचा) रेडिओ कंप्रता वाहक तरंगाशी ⇨ विरूपण क्रियेने संलग्न केला जातो. अवकाशात त्याचे रेडिओ कंप्रता तरंगाच्या रूपात प्रसारण होते. वाहक तरंग कंप्रतेपासून इष्ट श्राव्य कंप्रता संकेत शोधकाव्दारे अलग केले जातात म्हणजेच शोधकाचे कार्य विरूपण कियेच्या अगदी उलट असते. ग्राही स्थानी संपूर्ण संकेताचे गहण करून तेथे त्याचे परत मूळ अवगम संकेत व वाहक संकेत यांमध्ये शोधकाव्दारे पृथ:करण केले जाते. विरूपण करण्याकरिता परमप्रसर, कंप्रता व कला विरूपण असे तीन प्रकार उपलब्ध आहेत [→ विरूपण]. या भिन्न प्रकारे विरूपित केलेल्या तरंगाचे शोधन करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या पद्धती व त्या कामाकरिता उपयोगात आणलेली इलेक्ट्रॉनीय मंडले ही अर्थातच निराळी असतात.

परमप्रसर विरूपित तरंगाचे शोधन करण्याकरिता अर्धतरंग एकदिशीकरण किया वापरतात. आदान रेडिओ कंप्रता वर्चस् विरूपण कंप्रतेने जसे कालानुसार बदलत जाते, तसाच हुबेहूब बदल ⇨ एकदिशकारक मंडलातून मिळणाऱ्या प्रदान वर्चसात मिळत जातो. विक्षोभशून्य शोधन कार्य होण्याकरिता प्रदानातील विरूपण कंप्रता घटकाचा तरंगाकार विरूपित वाहक तरंग आवरणाशी एकरूप असावयास पाहिजे, हे उघड आहे. [→ तरंग गती]. कंप्रता व कला विरूपित वाहक तरंगाचे शोधन करण्याकरिता त्यांचे प्रथम अधिशोधक इलेक्ट्रॉनीय मंडलाव्दारे परमप्रसर विरूपित प्रकारात रूपांतर करण्यात येते. या प्रकारच्या तरंगाचे शोधन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या योजनांपैकी एकीचा वापर करून प्रत्यक्ष शोधन किया केली जाते. रेडिओ, दूरचित्रवाणी इ. प्रकारच्या रेडिओ संकेतांचे शोधन करण्याकरिता शोधकाचा सगळ्यात जास्त वापर करतात. निरनिराळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनीय मापनप्रणालीमध्येसुद्धा शोधक उपयोगी पडतात. अशा प्रणालींमध्ये इलेक्ट्रॉनीय संकेताचे अस्तित्व दाखविले जाते किंवा त्यांमधील काही इष्ट राशींचे मूल्यमापन केले जाते. उदा., इलेक्ट्रॉनीय रेडिओ कंप्रता वर्चस्मापक या यंत्राव्दारे रेडिओ कंप्रता संकेताच्या अस्तित्वाचे दर्शन किंवा त्याचे प्रत्यक्ष वर्चस् मापन यांपैकी कोणतेही कार्य करता येते. स्थिर तरंग उपकरण संच योजनेमध्ये (जुळणीमध्ये) प्रतिरोध इ. राशिमापनाकरिता जी सेतु-मंडले [→ व्हीट्स्टन सेतु ] वापरतात त्यांमध्ये शोधकाचा दर्शक म्हणून उपयोग करतात.

रेडिओ संदेशवहनाच्या प्रसारामध्ये इलेक्ट्रॉनीय तंत्रज्ञानाचा कार्यभाग बहुमोलाचा आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनीय तंत्रज्ञानात व प्रयुक्तीत ज्या ज्या सुधारणा झाल्या त्यांचा परिणाम ह्या क्षेत्रात ताबडतोब दिसून आला व अजूनही ती प्रक्रिया वेगाने चालूच आहे. परिणामी सर्वच स्तरावरील उपभोक्त्यांसाठी व त्यांच्या अपेक्षा व विनिर्देशांची आपूर्ती करणारी उपकरणे सातत्याने जास्त चांगल्या दर्जाची, वजनाला हलकी होणारी आणि त्याचबरोबर कमी किंमतीत मिळू लागली आहेत. इलेक्ट्रॉनीय क्षेत्रात दृक्‌श्राव्य संकेत रेडिओ तरंगाव्दारे विरूपित करून त्याचे प्रेषण करण्याचे व ग्राही स्थानी त्याचे शोधन करूनमूळ संकेत शुद्घ स्वरूपात मिळविण्याचे तंत्र विकसित करण्यात निर्वात नलिकांचा शोध आणि त्यात ऋणाग व धनागांमध्ये निरनिराळी जालकागे (ग्रीड) टाकून द्वि,-त्रि,-व पंचप्रस्थ आदी नलिका बनविण्याच्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा होता.

प्रेषित मूळ संकेत ग्राही स्थानी त्याच्या शुद्घ स्वरूपात परत मिळविण्याकरिता शोधकाची तद्रूपता (अनुगामिता) चांगली असावयास पाहिजे. शोधकातून मिळणाऱ्या प्रदान संकेताचे मूल्य विरूपित आवरणाच्या परमप्रसराच्या मूल्याबरोबर जर रेषीय चलन दाखवीत असेल, तर तद्रूपता चांगल्या प्रतीची असते. व्यवहारातील शोधकाचा प्रतिसाद या आदर्शापेक्षा कमी प्रतीचा असतो. त्यामुळे प्रदानात पुढील प्रकारचे विक्षोभ (विकृती) निर्माण होतात : (अ) परमप्रसर विक्षोभ : यामुळे मूळ संकेतात नसलेल्या कंप्रता शोधक प्रदानात निर्माण होतात. (आ) कंप्रता विक्षोभ : मूळ संकेतातील घटक कंप्रतांचे परस्परसापेक्ष, परमप्रसर मूल्ये, प्रदानात बदलली जातात. (इ) कला विक्षोभ : मूळ संकेतातील घटक कंप्रतांच्या एकमेकींशी असलेल्या कलासंबंधात फरक पडतो.

ज्या शोधकाच्या प्रदान संकेताचा परमप्रसर, आदान वहन तरंगाच्या प्रभावी परमप्रसर मूल्याच्या वर्गाप्रमाणे बदलतो, त्यास वर्ग नियमित शोधक म्हणतात. वर्चस्‌-विद्युत्‌ प्रवाह अभिलक्षण वकाच्या अरेषीय विभागामध्ये शोधक प्रयुक्तीला कार्यान्वित करून, त्यावर लावलेल्या आदान वर्चसाचे मूल्य एका ठराविक मूल्यापेक्षा कमी ठेवले, तर या प्रकारचे शोधन कार्य मिळते. हा शोधन प्रकार फक्त मापन तंत्रात उपयोगी पडतो.

संदेशवहनाच्या विकासात निर्वात नलिकांच्या योगदानाची दखल घेतानाच शोधन प्रकियेची मूलतत्त्वे विशद करण्यासाठी सुरूवातीच्या काळात वापरात आलेली काही मंडले व त्यांची स्पष्टीकरणे ह्यांच्या विकासातील ऐतिहासिक टप्पे लक्षात येण्यासाठी पुढे दिलेले आहेत.


आ. १. द्विपस्थ शोधकाचे मूलभूत मंडल : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) मेलित मंडल, (३) द्विपस्थ, (४) प्रदान संकेत.परमप्रसर आवरण शोधक : द्विप्रस्थ शोधकाचे मूलभूत कार्य आ. १ मध्ये दाखविले आहे. ⇨ रेडिओ ग्राही मध्ये द्विप्रस्थाच्या योगाने होणाऱ्या शोधन कार्याची कल्पना या आकृतीवरून येईल. आकाशकापासून मिळालेला रेडिओ कंप्रता संकेत मेलित मंडलाच्या साहाय्याने निवड व गहण केला जातो. त्यापासून निर्माण झालेले विद्युत् वर्चस् द्विप्रस्थाला पुरविले जाते. जर द्विप्रस्थाचा पुरोगामी (अगभागी) रोध हा भाररोधाच्या (R) मानाने नगण्य असेल, तर रेडिओ कंप्रता संकेताच्या प्रत्येक धन अर्ध-आवर्तन कालात द्विप्रस्थ संवाहक बनून (C) धारितेला प्रभारित करून तिच्यावरचे वर्चस् जवळजवळ रेडिओ कंप्रता संकेताच्या शिखरमूल्यापर्यंत नेईल. या आवर्तनाच्या लागलीच आ. २. रेडिओ कंप्रता वाहक तरंग : (१) मूळ संकेतनिर्मित परमप्रसर आवरण, (२) द्विप्रस्थ शोधक प्रदान.पाठोपाठ येणाऱ्या ऋण अर्ध-आवर्तनामध्ये द्विप्रस्थातील संवहन बंद होते, (C) धारितेचा आदान वर्चसाशी असलेला संबंध तुटतो व या कालात तिचे (R) रोधमार्गे विसर्जन होऊन त्यावरील वर्चस् घटत जाते. वरील विवेचनात द्विप्रस्थाचा अवगामी (व्युत्क्रमी) रोध जवळजवळ अपरिमित आहे व द्विप्रस्थ धारिता अत्यंत अल्प असल्यामुळे ऋण अर्ध-आवर्तनात त्यामध्ये वाहणारा धारिता विद्युत् प्रवाह नगण्य आहे असे मानले आहे. (C) धारितेचे विसर्जन ऋण अर्ध-आवर्तनात होतेच पण ते त्यानंतर लागलीच क्रमश: येणाऱ्या धन अर्ध-आवर्तनाच्या काही कालखंडात चालूच राहते. धन अर्ध-आवर्तनामध्ये रेडिओ कंप्रता वर्चस् कालाप्रमाणे सारखे वाढतच असते, त्यामुळे याचे मूल्य जेव्हा धारितेच्या तात्कालिक विसर्जन वर्चसाएवढे अथवा थोडे जास्त होते, तेव्हा ही विसर्जन किया थांबून परत द्विप्रस्थ संवाहक बनून त्यामधील विद्युत् प्रवाह धारितेला परत प्रभारित करू लागतो. धारितेवरील वर्चस् या दोन्ही कियांमुळे कसे बदलत जाते हे आ. २ वरून दिसेल. ‘ अब ’या कालखंडात धारितेचे विसर्जन होते, तर ‘ बक ’या कालांतरात ती प्रभारित होते. R व C यामंडल घटकांची योग्य मूल्ये निवडल्यास ‘ ’या क्षणी मिळणारे वर्चसाचे शिखर-मूल्य रेडिओ कंप्रता संकेताच्या धन शिखरमूल्यापेक्षा थोडे कमी असते. या परिस्थितीत संकेत वर्चसाचे शिखरमूल्य जर विरूपणामुळे आ. ३. रेडिओ कंप्रता छानक (गाळणी) व एव्हीसी योजनेसहित द्विप्रस्थ शोधक मंडल : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) द्विप्रस्थ, (३) एव्हीसीकरिता प्रदान एकदिश विद्युत् प्रवाह, (४) प्रदान संकेत, (५) प्रदान ऊर्जा नियंत्रक.संथपणे बदलत असेल, तर धारितेवरील वर्चस् त्याच प्रमाणात बदलत जाईल आणि प्रदान तरंगाकार व मूळ विरूपित तरंगाकार यांमध्ये जास्तीत जास्त समरूपता मिळेल. द्विप्रस्थामध्ये संवाहक विद्युत् प्रवाह रेडिओ कंप्रता संकेताच्या प्रत्येक धन अर्ध-आवर्तनाच्या शिखराजवळील पर्याप्त काल-खंडात विद्युत् स्पंदाच्या स्वरूपात वाहतो. धारितेवर (C) मिळणाऱ्या प्रदान वर्चसात पुढील घटक असतात : (१) सरल वर्चस् : ज्याचे मूल्य श्राव्य संकेताच्या सरासरी आवरण प्रसराएवढे असते. (२) विरूपण कंप्रतेचा एक प्रत्यावर्ती भाग, (३) वाहक तरंग कंप्रतेच्या सूक्ष्म लहरी (वीची). शोधकाव्दारे मिळालेल्या पदान वर्चसातून (अ) सरल घटकाचे व रेडिओ कंप्रता सूक्ष्म लहरीचे उच्चटन आणि (आ) स्वयंचलित प्रदान ऊर्जा नियंत्रण (AVC एव्हीसी) करण्याकरिता योजना शोधक मंडलाच्या व्यावहारिक स्वरूपात घालाव्या लागतात. या योजना असलेले एक मंडल आ. ३ मध्ये दाखविले आहे. C1, C2 या धारितांमुळे रेडिओ कंप्रता घटकाचा मंडल संक्षेप केला जातो. R1, C1 व C2 हे मंडल घटक मिळून जवळ जवळ निम्नपारक छानकाप्रमाणे काम देतात. R2, R4 या एकसरीत असलेल्या रोधभारावर फक्त सरल व विरूपण कंप्रतेचाच संकेत उरतो. यातील काही सरल ऋण भाग R3 C4 मंडलाच्या साहाय्याने एव्हीसी योजनेकरिता मिळविला जातो. R4 या रोधावरील प्रदानातील सरल घटक C3 R5 या धारितारोध मंडलाव्दारे काढून टाकून उरलेला विरूपण कंप्रता संकेत विवर्धनाच्या कार्याकरिता पुढे पाठविला जातो. C3ही धारिता सरलवर्चस् अडविण्याचे काम करते. R5 या चलित रोधामुळे प्रदान वर्चसाचे मूल्य हवे तसे बदलता येते. अशा प्रकारे ग्राहीत अंतिम स्थानी असलेल्या ध्वनी विस्तारकाला पुरविल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. शोधन कार्यक्षमता ‘ प्रदान वर्चस् भागिले उच्च्तम शक्य वर्चस् ’या परिमाणाने मापली जाते.


आ. ४. R C मूल्याचा प्रदानावर परिणाम : (१) R C मूल्य कमी,(२) R C मूल्य योग्य, (३) R C मूल्य जास्त.उच्चतम शक्य वर्चस् हे केव्हाही रेडिओ कंप्रता शिखर वर्चसापेक्षा जास्त असू शकणार नाही, हे उघड आहे. आ. १ मधील शोधक मंडलाची कार्यक्षमता (R) रोधभार मूल्याने ठरते. या रोधाचे मूल्य द्विप्रस्थाच्या पुरोगामी रोधाच्या वीसपट असेल, तर ०.८ एवढी कार्यक्षमता मिळते. संकेताच्या धन आवर्तनामध्ये होत असलेल्या संवहनामुळे (R) रोध मेलित मंडलाकरिता शाखांतर बनतो व ऊर्जाशोषण करून मंडलाच्या गुणांकाचे (गुणवत्ता गुणकाचे) मूल्य कमी करतो. यामुळे मंडलाच्या निवडक्षमतेवर सुद्धा अनिष्ट परिणाम होतो. हे परिणाम कमी करण्याकरिता (R) रोधाचे मूल्य जास्त घ्यावे लागते. R-C या छानकातील घटकाची मूल्ये योग्य नसतील, तर त्यामुळे प्रदान वर्चसात विक्षोभ मिळतो. R C राशीचे मूल्य वाजवीपेक्षा कमी असल्यास प्रदान तरंग आवरणाचा आकार खडबडीत होतो व मूळ संकेतात नसलेल्या कंप्रता प्रदानामध्ये दिसू लागतात. याउलट R C चे मूल्य जास्त असेल, तर छानकाला जलद चलित आवरणाप्रमाणे बदलणे कठीण होते. त्यामुळे अशा वेळी मूळ संदेशातील उच्च कंप्रता लोप पावतात (आ. ४). विरूपण संकेताच्या ऋण शिखरात ‘ काटछाट ’हा आणखी एक सामान्यपणे आढळणारा विक्षोभाचा प्रकार आहे. उच्च मूल्याचा रोधभार व मोठया प्रमाणाचे आदान संकेत वर्चस् यांचा वापर केल्यास या विक्षोभाचे प्रमाण बरेच कमी करता येते. वाहक कंप्रतेकरिता धारिता (C) हिचा प्रतिरोध (R) रोधापेक्षा खूप कमी असावयास पाहिजे. या सर्व शर्ती व गोष्टी विचारात घेऊन R व C यांची मूल्ये ठरवावी लागतात.

प्रतिसाद चांगला रेषीय, चांगले अनुगामित्व, त्यातील विक्षोभाचे प्रमाण सर्वसामान्यपणे कमी हे द्विप्रस्थाचे चांगले गुणधर्म आहेत. याउलट त्याची संवेदनशीलता कमी असल्यामुळे त्याच्या कार्यक्षम उपयोगाकरिता आदान वर्चसाचे प्रमाण बरेच जास्त असावे लागते. या शोधकाचा उपयोग त्यामुळे अत्यंत संवेदनशील अशा संकरण पद्धतीच्या रेडिओ ग्राहीत करतात. या पद्धतीमध्ये संकेताचे प्रथम मोठया प्रमाणात विवर्धन करून नंतर तो शोधक मंडल विभागाला पुरविला जातो.

आ. ५. स्फटिक द्विप्रस्थ शोधक मंडल : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) मेलित मंडल, (३) स्फटिक एकदिशकारक, (४) प्रदान संकेत, (५) एव्हीसीकरिता प्रदान एकदिश विद्युत् प्रवाह.स्फटिक द्विप्रस्थ शोधक : या प्रयुक्तीमध्ये गुळगुळीत व अम्लरेखित केलेल्या जर्मेनियम किंवा सिलिकॉन या ⇨ अर्धसंवाहका च्या प्रतलावर प्लॅटिनम किंवा टंगस्टन या धातूच्या तंतूच्या साहाय्याने विद्युत् बिंदुस्पर्श केलेला असतो. हवेचा अनिष्ट परिणाम टाळण्याकरिता याचा संधिप्रदेश मेणाच्या आवरणात व संपूर्ण प्रयुक्ती त्याच कारणाकरिता काचेच्या आवरणात बंदिस्त करतात. हा शोधक वापरलेले मंडल आ. ५ मध्ये दाखविले आहे. त्यावरून या मंडलात किंवा द्विप्रस्थ निर्वात नलिका शोधक मंडलात काही फरक पडत नाही, असे लक्षात येईल. या प्रयुक्तीचा अवगामी रोध अपरिमित नाही. त्यामुळे ऋण अर्ध-आवर्तन कालात (C) धारितेचे विसर्जन रोध (R) याच्याच मार्गे केवळ न होता काही अल्प प्रमाणात द्विप्रस्थमार्गे सुद्धा होते. अवगामी विद्युत् प्रवाह शून्य नसणे व प्रयुक्तीच्या तापमानाप्रमाणे तीमधील ⇨विद्युत् गोंगाटाच्या प्रमाणात वाढ या दोन गोष्टी या प्रयुक्तीच्या बाबतीत अनिष्ट समजल्या जातात. संक्रमण काल इ. परिणामामुळे द्विप्रस्थ निर्वात नलिकांचा जेथे वापर करता येत नाही, अशा सूक्ष्मतरंग शोधन कार्याकरिता स्फटिक प्रयुक्तीचा उपयोग होतो. वर्ग-नियमित प्रकारात याचा उपयोग केला असता (आदान कार्यशक्ती काही मायकोवॉटपेक्षा कमी असेल तर) यामधून मिळणारे प्रदान आदान कार्यशक्तीच्या तंतोतंत प्रमाणात असते, असे आढळते. अशा प्रकारे रेडिओ कंप्रता किंवा आणखी उच्च कंप्रता संकेतातील कार्यशक्तीचे मापन करता येते. या परिस्थितीत प्रयुक्तीचा आदान प्रतिरोध व आंतरिक प्रतिरोध हे दोन्हीही स्थिर मूल्य होतात. स्फटिकाचा शोधक म्हणून उपयोग कंप्रता विरूपित दूरचित्रवाणी, रडार, ट्रँझिस्टर ग्राही इ. मंडलांत करतात.

आ. ६. ग्रिड शोधक : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) मेलित मंडल, (३) त्रिप्रस्थ, (४) प्रदान.ग्रिड शोधक : योग्य अवपात (विपात) दिला असता कोणत्याही बहुप्रस्थ निर्वात नलिकेचा शोधक व विवर्धक म्हणून एकाच वेळी उपयोग होऊ शकतो. त्रिप्रस्थ नलिका शोधकाचे कार्य आ. ६ वरून कळते. ऋणाग्र- ग्रिडमधील जोडणी द्विप्रस्थ शोधकाच्या पट्टिका ऋणागामधील जोडणीप्रमाणेच असते. C व R हे घटक अनुकमे रेडिओ कंप्रतांकरिता मंडलसंक्षेप व भार म्हणून कार्य करतात. हेच घटक गिडवरील सरल अवपात योग्य त्या पातळीवर आणून ठेवतात. रेडिओ कंप्रता संकेताच्या प्रत्येक धन अर्ध-आवर्तन कालात ग्रिड मंडलात विद्युत् प्रवाह वाहतो. त्यामुळे C धारितेवर ऋण विद्युत् भार व त्यामुळे त्याच प्रकारचा सरासरी विद्युत् अवपात निर्माण होतो. धारिता विद्युत् भाराचा काही काळ संचय करीत असल्यामुळे रेडिओ कंप्रता ऋण (अ)अर्ध-आवर्तन कालातसुद्धा अवपात थोड्याफार प्रमाणात कमी होत गेला, तरी ऋण स्वरूपाचाच राहतो. द्विप्रस्थ शोधकाप्रमाणेच रोध (R) भारावरील प्रदान वर्चसामध्ये (१) सरल, (२) विरूपित संकेत कंप्रता, (३) रेडिओ कंप्रता सूक्ष्म लहरी असे घटक मिळतात (आ. ७). आदान वर्चसाचे विरूपित आवरण ज्याप्रमाणे कालानुसार बदलते थेट तसाच बदल ग्रिड वर्चसामध्ये होत जातो. या वर्चसाचे विवर्धकाव्दारे वर्धन आ. ७. ग्रिड आदान संकेत व परिणामी वर्चस् तरंगाकार : (अ) रेडिओ कंप्रता आदान, (आ) प्रभावी ग्रिड वर्चस् (ग्रिड-क्षरण वर्चस् परिणामासहित).होऊन, पट्टिका मंडलात वर्धित प्रदान वर्चस् मिळते. C1LC2 मुळे प्रदानातील रेडिओ कंप्रता अंशाचा मंडल संक्षेप केला जातो (आ. ६). अंतिम प्रदान रोहित्राच्या साहाय्याने मिळविले जात असल्यामुळे त्यामधील सरल अंश आपोआपच वेगळा केला जातो. C3 धारितेमुळे श्राव्य कंप्रता संकेत पुरवठा विद्युत् घटमालेतून (बॅटरीतून) न जाता सरळ भूमीस मिळतो. द्विप्रस्थ शोधकापेक्षा या शोधक मंडलाची संवेदनशीलता जास्त असते. या शोधकामध्ये चांगल्या रीतीने हाताळू शकणाऱ्या सर्वोच्च वाहक वर्चसाचे मूल्य कमी असते. एव्हीसीकरिता लागणारे ऋण सरल वर्चस् मिळविण्याची सोय नसते. अभिलक्षण वकातील वकतेमुळे क्षीण शक्तीचा आदान संकेत यास दिला असता याच्या प्रदानात विक्षोभ निर्माण होतो. आदान संकेताची शक्ती जास्त असेल, तरीसुद्धा अतिभार झाल्यामुळे विक्षोभ होतो. ग्रिड शोधक हा द्विप्रस्थ शोधकाप्रमाणेच कार्यशक्तीचे शोषण करतो व यामुळे त्याच्या आधी असणाऱ्या मंडल विभागाची (उदा., मेलित मंडल) निवड शक्ती व लाभ यांवर अनिष्ट परिणाम घडवून आणतो.


आ. ८. पट्टिका शोधक : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) त्रिप्रस्थ, (३) प्रदान संकेत.पट्टिका शोधक : या मंडलामध्ये नियंत्रक ग्रिडला योग्य तो सरल ऋण अवपात देऊन प्रयुक्तीचा कार्यबिंदू मज्जाव अवस्थेजवळ (प्रत्यक्ष व्यवहारात थोडा मागे) ठेवण्यात येतो. ग्रिडवर आदान रेडिओ कंप्रता संकेत दिल्यास ऋण अर्ध-आवर्तनामध्ये वाहणारा विद्युत् प्रवाह नगण्य असतो. धन अर्ध-आवर्तनामध्ये त्रिप्रस्थ नलिका संवाहक बनते व तीमधून विद्युत् प्रवाह स्पंद स्वरूपात वाहतो. परिणामी सरासरी पट्टिका विद्युत् प्रवाहाचे मूल्य विरूपित आवरणानुसार चलन पावते. नेहमीच्याच योजना वापरून

सरल व रेडिओ कंप्रता अंश बाजूस काढून इष्ट असा विरूपण कंप्रतेचा संकेत प्रदान स्थानी मिळविता येतो. प्रदान, R-C छानकाव्दारे घेऊन या मंडलात सरल अंशाचे उच्चटन केले आहे. या शोधकास कार्यान्वित करण्याकरिता लागणाऱ्या शर्ती कमी कांतिक स्वरूपाच्या असतात. जर ग्रिडवरचे वर्चस् सर्वकाळ ऋण राहत असेल, तर हा शोधक आदान कार्यशक्तीचे शोषण करीत नाही, त्यामुळे मेलित मंडलाच्या Q गुणांकावर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असत नाही. ग्रिड शोधकाप्रमाणेच हे मंडल क्षीण व शक्तिशाली अशा दोन्ही प्रकारच्या आदान संकेतांकरिता विक्षोभासहित प्रदान देते. समान परिस्थितीत या मंडलाची कार्यक्षमता द्विप्रस्थ शोधकाएढीच असून त्यातील विक्षोभाचे प्रमाण मात्र कमी असते. या मंडलातून एव्हीसी करिता लागणारे पुरेसे सरल ऋण वर्चस् मिळविण्याची सोय नसल्यामुळे या मंडलाचा रेडिओ ग्राहीकरिता फारसा उपयोग होत नाही.

शोधकांची संवेदनशीलता व लाभ हे मोठया प्रमाणावर पण त्याचवेळी विक्षोभरहित असणे हे रेडिओ कंप्रतेच्या माध्यमाने संदेश व संकेत वाहन प्रणालीच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. ह्या घटकांच्या मोजमापाच्या बाबतीत एकसूत्रता व अचूकता आणण्यासाठी त्याबाबतचे विनिर्देश मानकांव्दारे निश्चित करण्यात आले आहेत. त्या निकषांवर आधारित निरनिराळ्या उपभोक्त्यांच्या अपेक्षांप्रमाणे काम देणारे शोधक निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञांनी निरनिराळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनीय मंडळे विकसित केली. प्रथमत: निर्वात नलिका, त्यानंतर अर्धसंवाहक, ट्रँझिस्टर अशा विकसित उत्पादनांचा उपयोग करीत. निरनिराळे गुणधर्म असलेले शोधक प्रमाणित घटक म्हणून मोठया इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्यात वापरासाठी आता मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत.

कंप्रता विरूपण शोधक : कंप्रता विरूपित तरंगाचे शोधन करण्याकरिता, अधिशोधक (विवेचक) मंडलाच्या साहाय्याने त्याचे प्रथम परमप्रसर विरूपित तरंगात रूपांतर केले जाते. नंतर एक साधे द्विप्रस्थ शोधक मंडल वापरून त्यापासून इष्ट श्राव्य अवगम संकेत मिळविला जातो. अधिशोधक मंडले सामान्यपणे आदानातील परमप्रसर बदलाकरिता संवेदनशील असल्यामुळे गोंगाट किंवा अवकाशातील विक्षोभ इ. कारणांमुळे आदान संकेतात नेहमी होणारे परमप्रसर बदल मर्यादक मंडले वापरून प्रथम काढून टाकावे लागतात. कंप्रता-गणक याचाही काही ठिकाणी शोधक म्हणून उपयोग करतात. गणकाचे प्रदान हे कंप्रतेचे तत्कालिक मूल्य दाखवीत असल्यामुळे त्यावर दिलेल्या आदानात कालानुसार होणाऱ्या बदलाचे हुबेहूब प्रतिबिंब प्रदानात येईल हे उघड आहे.

आ. ९. समतोलित कंप्रता विरूपण शोधक : (१) रेडिओ कंप्रता आदान, (२) द्विप्रस्थ, (३) प्रदान परिणामी वर्चस्.अधिशोधक : समतोलित कंप्रता विरूपण शोधक या प्रकारच्या मंडलाचे सर्वांत साधे उदाहरण म्हणजे एकसरी किंवा समांतर L-C-R अनुस्पंदित मंडल हे होय. R रोधावरील प्रदान वर्चस् आदान संकेताच्या कंप्रतेप्रमाणे चलन पावते पण हे चलन रेषीय नसल्यामुळे त्यापासून विक्षोभ निर्माण होतो. हा दोष घालविण्याकरिता आ. ९ मध्ये दाखविलेले समतोलित कंप्रता विरूपण शोधक वापरतात. यामध्ये (अ) व (आ) अशी दोन मेलित मंडले असतात. ज्यांच्या अनुस्पंदन कंप्रता f1 व f2 या वाहक तरंगाच्या सरासरी कंप्रता f0 पेक्षा तितक्याच फरकाने जास्त व कमी असतात. रेडिओ कंप्रता संकेत आदान केला म्हणजे (१) या मंडलातील प्रवाह एकदिशीकृत होऊन त्यामुळे त्याच्या R1 – C1 छानकावर VCB हे प्रदान वर्चस् मिळते. (२) या मंडलात अशीच किया होऊन VAB हे प्रदान वर्चस् मिळते. दोन्ही मंडले एका ठिकाणी (B) जोडली असल्यामुळे परिणामी वर्चस् VAC = VCB± VAB हे मिळते. मंडलघटकाची मूल्ये सारखी असल्यामुळे आदान कंप्रता f0 करिता परिणामी वर्चस् शून्य असेल असे दिसून येईल (आ. १०). आदान कंप्रता ही कंप्रता विरूपणामुळे जितकी f1  च्या जवळ येईल तितक्याच प्रमाणात VAB चे मूल्य VCB पेक्षा जास्त होईल. याउलट जर आदान कंप्रता f2 या उच्च कंप्रतेच्या जवळ गेली, तर VCB चे मूल्य तितक्याच प्रमाणात VAB पेक्षा वाढेल. अशा रीतीने आदान कंप्रता f0 च्या खाली किंवा वर जशी बदलत जाते, तसे शोधकाचे प्रदान वर्चस् धन किंवा ऋण स्वरूप धारण करते व त्याचे मूल्य या कंप्रता फरकाबरोबर आसन्नपणे रेषीय चलन दाखविते. आ. १० मध्ये प्रत्येक मेलित मंडलाचे स्वतःचे निरनिराळे प्रतिसाद वक (VAB व VCB) टिंब वक्र स्वरूपात दाखविले आहेत. हे दोन वक्र एकमेकांत मिळविले असता संपूर्ण शोधक मंडलाकरिता मिळणारा प्रतिसाद वक्रही VAC त्यामध्ये रेखाटला आहे. वरील कंप्रता सीमेमध्ये शोधकाचे विरूपित प्रदान जवळजवळ रेषीय असल्यामुळे मूळ कंप्रता संकेतामुळे मिळणारे प्रदान त्याच संकेताच्या परमप्रसर विरूपित तरंगाकाराची हुबेहूब प्रतिकृती असते.

कलांतर अधिशोधक : अनुस्पंदन कंप्रतेच्या जवळपास अनुस्पंदित मंडलातील आदान व प्रदान वर्चस् कलांमध्ये निर्माण होणाऱ्या तीव्र बदलाचा उपयोग करून कलांतर अधिशोधकात वाहक कंप्रता चलनाचे सममूल्य अशा प्रदान वर्चस् चलनात रूपांतरित केले जाते. ह्यासाठी विकसित केलेल्या अधिशोधकांचे वर्चस्‌-कंप्रता चलन आ. ११ मध्ये दाखविले आहे. दोनशिखरांमधील कंप्रता मर्यादेमध्ये अधिशोधकाचे कार्य जवळजवळ तंतोतंत रेषीय स्वरूपाचे असते. हे रेषीय स्वरूप टिकविण्यासाठी विरूपण कंप्रतेची कक्षा शिखर कंप्रतेच्या ५० ते ६६ टक्क्यांपर्यंत मर्यादित राखली जाते. फॉस्टर-सीली अधिशोधक हा कलांतर अधिशोधक शास्त्रातील आद्य मानला जातो.

आ. ११. फॉस्टरह्र सीली अधिशोधक अभिलक्षण वक्र : f0 - अनुस्पंदन कंप्रता

कला विरूपण शोधक : कंप्रता विरूपण व कला विरूपण या पद्धतींमध्ये विशेष फरक नसल्यामुळे कंप्रता विरूपित संकेताचे शोधन करण्याकरिता उपलब्ध असलेली मंडलेच कला विरूपित संकेताचे शोधन करण्यास थोडाफार फरक केला असता उपयोगी ठरतात. विरूपणांकाचे मूल्य विरूपण कंप्रतेप्रमाणे बदलत असल्यामुळे कला विरूपण शोधन मंडलामध्ये एक असे निम्नपारक छानक घालावे लागते की, ज्याच्या प्रदानाचा परमप्रसर विरूपण कंप्रतेच्या व्यस्त प्रमाणात चलित होतो. या जोडणीमुळे मात्र कंप्रता व गोंगाट विक्षोभ यांचे प्रमाण वाढल्यावाचून राहत नाही. हा दोष काही अंशी काढण्याकरिता प्रेषक स्थानी पूर्व सुस्पष्टकारक योजना वापरतात. यामुळे जशी विरूपण कंप्रता वाढते तसा विरूपणांक कमी होत जातो. अशा वेळी ग्राही स्थानी वरील दोषहारक (विशुद्घक) छानक मंडलाव्यतिरिक्त आणखी एक मंडल विभाग वापरावा लागतो, ज्याचे कार्य पूर्व सुस्पष्टकारक कियेच्या अगदी उलट असते.

पहा : दूरचित्रवाणी प्रकाशीय संदेशवहन रेडिओ ग्राही रेडिओ प्रेषक रेडिओ संदेशवहन प्रणाली.

संदर्भ : 1. Cauch L. W. Digital and Analog Comminication systems, 1992.

            2. Schwartz, M. Information Transmission, Modulation and Noise, 1930.

            3. Taub, H. Schilling, D. L. Principles of Communication Systems, 1986.

चिपळोणकर, व. त्रिं.