व्रण : (अल्सर). त्वचा किंवा श्लेष्मकला (बुळबुळीत पटल) यांमध्ये पृष्ठभागावरील अधिस्तराचा (अस्तरासारख्या पटलाचा) नाश होऊन खाली असलेले ऊतक (समान रचना व कार्य असलेला कोशिकांचा म्हणजे पेशींचा समूह) उघडे पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या मर्यादित अशा जखमेस ‘व्रण’ म्हणतात. हृद्कपाट (हृदयातील झडपा) आणि महारोहिणीच्या अंत:स्तरावरील क्षतांनाही ‘व्रण’ हीच संज्ञा देतात. डोळ्याच्या स्वच्छमंडलातील अशाच प्रकारच्या परंतु पारदर्शक क्षतांनाही व्रण म्हटले जाते [→ नेत्रवैद्यक]. व्रण सौम्य, तीव्र, चिरकारी किंवा परिवर्ती असू शकतो.

अधिस्तराचा नाश करण्यास वरचेवर घासले जाणे, भार पडणे, तीव्र रसायनांशी संपर्क, रक्तपुरवठ्यातील कमतरता, तंत्रिका तंतूंच्या (मज्जातंतूंच्या) कार्यात बिघाड, कुपोषण किंवा जंतुसंक्रामण (संसर्ग) यांपैकी एक वा अनेक घटक कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे फार दिवस आजारी असल्यामुळे निजून राहावे लागलेल्या रुग्णाच्या पाठीवरील शय्याव्रण, पोळलेल्या त्वचेवरील जखमा, मधुमेही रुग्णाच्या लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा, कुष्ठरोग्याच्या शरीरावरची संवेदनाशून्य क्षते किंवा जठरातील ⇨पचनज व्रण यांसारखी व्रणांची विविध रूपे दिसून येतात. या सर्वांमध्ये व्रणाला असलेली उंच कड, त्याचा तळ, खोली, वेदनांची तीव्रता, लालसर छटा आणि बाहेर पडणारा स्राव (उदा., पू) यांचा विचार करून व्रणाचे स्वरूप व कारण यांचे निदान करता येते.

सर्वसाधारणपणे तीव्र आणि अल्पकालिक व्रणांची काळजी घेताना मृत ऊतक हलकेच काढून टाकणे, व्रण स्वच्छ व निर्जंतुक राखणे आणि दाहक पदार्थांशी संपर्क येऊ न देणे एवढ्या उपायांनी व्रण बरा होण्यास मदत होते. यांशिवाय इतर प्रकारच्या व्रणांसाठी त्यांची कारणे शोधून उपचार करावे लागतात. व्रणाच्या तळाशी लालसर कणोतक निर्माण होऊन, त्यातून तळापासून नवीन कोशिकानिर्मिती होऊन हळूहळू त्यावर निळसर अधिस्तर वाढू लागत असेल, तर व्रणाची बरे होण्याची प्रगती समाधानकारक म्हणता येते. जीवनसत्त्वे, प्रथिने यांचा आहारात पुरवठा करून कुपोषणाच्या रुग्णांमध्ये ही प्रगती लवकर साध्य होते [→ पथ्यापथ्य पुन:स्थितिस्थापन]. पूर्ण बरा झाल्यावर तेथे काही काळ व्रणचिन्ह किंवा वण दिसू शकतो. केशग्रंथींच्या अभावामुळे तेथे केस उगवत नाहीत.

चिरकारी (दीर्घकालिक) व्रणांमध्ये कडा जाड होऊन तळाशी कठीणपणा वाढू लागल्यास कर्करोगाची शक्यता असते. धूम्रपान करणाऱ्यात व तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींच्या जिभेवर किंवा गालाच्या आतल्या बाजूस असे व्रण होऊ शकतात [→ मुख]. पायांवरील दीर्घकालिक व्रणात नीलाजन्य व्रण, मधुमेहजन्य व्रण [→ मधुमेह]  आणि अवरोधी वाहिनी विकार या सर्व प्रकारांमध्ये रक्तपुरवठ्यात दोष निर्माण झालेला असतो. त्यामुळे वरचेवर व्रण होण्याची प्रवृत्ती आढळते. रोहिणीकाठिण्य व ⇨ हिमदाह वगैरे रोगांतही वण्र निर्माण होऊ शकतो. जननेंद्रियावर व्रण असल्यास उपदंशासारख्या (गरमीसारख्या) लैंगिक संबंधजन्य रोगाची शक्यता लक्षात घेणे आवश्यक ठरते [→ गुप्तरोग]. तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) संपूर्ण परीक्षा करून (टेबीस, सिरिंगोमायेलिया, स्पायनाबायफिडा) पश्चमूल-क्षय, मेरुरज्जुविवरविकार, द्विखंडित पृष्ठवंश यांसारखे विकार व्रणनिर्मितीस कारणीभूत आहेत का हे पाहता येते [→ तंत्रिका तंत्र]. जठरात किंवा अंतर्भागात इतरत्र असलेल्या व्रणांचे निदान क्ष-किरण चित्रण व अंतर्दर्शन यांच्या मदतीने होऊ शकते. असे व्रण जास्त खोल होऊन त्यांचे रूपांतर छिद्रात झाल्यास गंभीर आजार ओढवतो. ⇨  आंत्रज्वर व ⇨  पचनज व्रण या विकारांमध्ये पूर्वी अनेकदा घडून येणारी ही व्याधी आता प्रभावी अशा औषधोपचारामुळे विशेष आढळत नाही.

पहा : गलशोथ नाडीव्रण मृदू रतिव्रण शल्यतंत्र व शालाक्यतंत्र.

ढमढेरे, वा. रा.