‘कान्त’ – मणिशंकर रतनजी भट्ट : (१० नोव्हेंबर १८६७ – ६ जून १९२३). प्रसिद्ध गुजराती कवी. जन्म सौराष्ट्रातील चावंड ह्या गावी. त्याचे शालेय शिक्षण सौराष्ट्रात व बी. ए. पर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. काही काळ शिक्षणखात्यात त्याने नोकरीही केली. तत्त्वज्ञानाची त्याला विशेष आवड होती. ⇨ ई. स्वीड्नबॉर्गच्या विचारांचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. काही काळ त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला; पण नंतर तो हिंदू धर्मात आला. धर्मांतरामुळे त्याला कुटुंबियांचा व समाजाचा प्रखर विरोध सहन करावा लागला. त्याचे जीवन करुण प्रसंगांनी व तीव्र संघर्षांनी भरलेले आहे. त्याच्या काव्यावरही ह्या तीव्र अनुभवांचा प्रभाव दिसतो. त्याच्या साहित्यिक प्रभावळीत बलवंतराय ठाकोर, नानालाल, रमणभाई, कलापी यांचा अंतर्भाव होतो.

कान्तच्या काव्यात त्याच्या संवेदनशीलतेचा व चिंतनशीलतेचा आविष्कार आढळतो. आपल्या काव्यात त्याने संस्कृत, फार्सी व बोल-भाषेतील शब्दांचा प्राचुर्याने, पण औचित्यपूर्ण उपयोग केला. मराठीतील ‘अंजनी’ ह्या जातिवृत्ताचा तसेच अर्थानुकूल विराम चिन्हांचा त्याने आपल्या काव्यात वापर केला. सृष्टिसौंदर्य व मानवी जीवनातील मूलभूत समस्या यांचा अकृत्रिम आविष्कार त्याच्या काव्यात आढळतो. पूर्वालाप (१९२४) ह्या संग्रहात त्याची बहुतांश कविता संगृहीत आहे. ती भावगीतात्मक असून तीत काही सुनीतरचनाही आहे. कान्तने विविध छंदातील भावपूर्ण खंडकाव्ये गुजरातीत प्रथमच लिहिलेली असून त्यांत त्याची प्रतिभा विशेषत्वे प्रगट झाली आहे. वसंत विजय, चक्रवाक मिथुन, अतिज्ञान, देवयानी ही त्याची विशेष प्रसिद्ध खंडकाव्ये. त्यांत प्राचीन व अर्वाचीन काव्यशैलींचा मनोज्ञ मिलाफ आढळतो. त्यांपैकी चक्रवाक मिथुनमधील प्रेमभावनेचा प्रतीकात्मक आविष्कार नाविन्यपूर्ण आहे. शब्दयोजना, शैली व भावनांची खोली ह्या बाबतींत पहिली दोन खंडकाव्ये उत्कृष्ट आहेत. कान्तच्या खंडकाव्यातून प्रेरणा घेऊन अनेक कवींनी खंडकाव्ये लिहिली.

त्याने काही गद्यलेखनही केले असून त्यांत रोमन स्वराज्य (१९२४) व गुरू गोविंदसिंह (१९२४) ही नाटके; प्रेसिडेन्ट लिंकननुं चरित्र (१८९५) व शिक्षणनो इतिहास (१८९५) हे स्वतंत्र ग्रंथ; सिद्धांतसारनुं अवलोकन (१९२०) हा समीक्षापार ग्रंथ; कलापीनो केकारव (१९०३) हा संपादित ग्रंथ आणि एक देवीनो वृत्तांत (१८९७), लग्नस्नेह अने तेना विशुद्ध सुखो (१८९८), स्वर्ग अने नरक (१९००) इ. अनुवादित ग्रंथ यांचा समावेश होतो. अर्वाचीन गुजराती काव्य समृद्ध करण्यात कान्तचा वाटा मोठा आहे. काश्मीरचा प्रवास करीत असता त्याचे निधन झाले.

पेंडसे, सु. न.