पाउस्तोव्हस्की, कन्स्तांतीन : (३१ मे १८९२–१५ जुलै १९६८). सोव्हिएट कथाकर. मॉस्कोमध्ये जन्मला.शिक्षण कीव्ह (कीएफ) आणि मॉस्को विद्यापीठांत झाले. आरंभीचे आयुष्य कष्टाचे गेले. उदरनिर्वाहासाठी मजुरीही करावी लागली. 

‘अग्नी’(इं. शी. फायर) ही त्याची पहिली कथा १९११ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘कारा-बुगाज’ (१९३२), ‘पोविस्त अ लिसाख’ (१९४८, इं. शी. द स्टोरी अबाउट फॉरेस्ट्स),‘रझ‌्द्येनिये मोर‌्या’ (१९५२, इं.शी. द बर्थ ऑफ द सी) ह्यांसारख्या स्वच्छंदतावादी वळणाच्या अनेक कथा लिहिल्या. उत्कट निसर्गप्रेम हे त्याच्या कथालेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. रमांतिकी (१९३५, इं. शी. रोमँटिक्स) ही त्याची कांदबरीही प्रसिद्ध आहे. ह्यांखेरीज अनेक खंडांत प्रसिद्ध झालेल्या रास्सकाज झीज्नी (१९४६–६२, इ.भा. द स्टोरी ऑफ अ लाइफ, १९६४) ह्या आत्मचरित्राचा अंतर्भाव त्याच्या उत्कृष्ट साहित्यकृतींत करावा लागेल. दर्जेदार निबंधलेखनही त्याने केलेले आहे.

मॉस्कोमध्ये तो निधन पावला. 

पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)