लागरक्विस्ट, पार फेबिअन : (२३ मे १८९१–११ जुलै १९७४). स्वीडिश कवी, कादंबरीकार व नाटककार. जन्म स्वीडनमधील हेक्श येथे. अप्साला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर तो समाजवादाकडे वळला. स्वत:ला तो ‘धार्मिक निरीश्वरवादी’ म्हणवीत असे.

पहिल्या महायुद्धाच्या कालखंडातील लागरक्किस्टच्या साहित्यावर निराशावादाची गडद छाया पडलेली दिसते. ‘अँग्‍विश’ (१९१४, इं. शी.) हा त्याचा कवितासंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. अर्थशून्य आणि आशाहीन अशा जीवनाची जाणीव त्यात व्यक्त करण्यात आलेली आहे. तथापि ती हळूहळू कमी होत गेली. द इटर्नल स्माइल (१९२०, इं. भा. १९७१) हा त्याचा कथासंग्रह आणि गेस्ट ऑफ रिॲलिटी (१९२५, इं. भा. १९३६) ही त्याची आत्मचरित्रात्मक कादंबरी ह्याचा प्रत्यय देते. ‘द ट्रायंफ ओव्हर लाइफ’ (१९२७, इं. शी.) ह्या एखाद्या गद्य एकभाषितासारख्या चिंतनात्मक ग्रंथात त्याने मानवावरचा आपला अदम्य विश्वास प्रकट केला आहे.

लागरक्किस्टची आंतरराष्ट्रीय कीर्ती मुख्यतः त्याच्या दोन कादंबऱ्यावर अधिष्ठित आहे : द ड्‍वॉर्फ (१९४४, इं. भा. १९५३) आणि बाराब्बास (१९५०, इं. भा. १९५२). मानवी आणि पाशवी किंवा शिव आणि अशिव ह्यांच्यातील संघर्ष हा ह्या दोन्ही कादंबऱ्यांचा विषय. द ड्‌वॉर्फ ह्या पहिल्या कादंबरीतील वातावरण एका प्रबोधनकालीन राजदरबाराचे असून त्यातील ड्‌वॉर्फ ही व्यक्तिरेखा एकाच वेळी वास्तववादी आणि प्रतीकात्मक आहे. नकारात्मक वृत्ती, वांझपणा ह्यांचा तो प्रतिनिधी आहे. बाराब्बास हा साऱ्या मानवजातीचा प्रतिनिधी. येशू ख्रिस्ताच्या तेजोमय व्यक्तिमत्वासमोर हा दरोडेखोर उभा केला आहे. स्वतःच्या पलीकडे जाण्याची क्षमता नसलेला परंतु ह्या अक्षमतेची पूर्ण जाणीव असलेला असा तो, अखेरीस एक मानव आहे.

लागरक्किस्टच्या नाट्यलेखनात काही एकांकिका आणि काही तीन वा त्याहून अधिक अंक असलेल्या नाट्यकृती अंतर्भूत आहेत. त्याच्या तीन एकांकिका ‘द डिफिकल्ट अवर’ (इं. शी.) ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत (१९१८). ‘द सिक्रेट ऑफ हेवन’ (१९१९, इं. शी.), ‘द हॅंगमन’ (१९३३, इं. शी.) आणि  ‘लेट मॅन लिव्ह’ (१९४९, इं. शी.) ह्या त्याच्या अन्य एकांकिका. ‘द मॅन विदाउट अ सोल’ (५ अंक, १९३६, इं. शी.), ‘व्हिक्टरी इन द डार्क’ (४ अंक, १९३९, इं. शी.) ही त्याची नाटकेही उल्लेखनीय आहेत.

लागरक्किस्टने विख्यात स्वीडिश नाटककार आउगुस्ट स्ट्रिनबॅर्य ह्याला रंगभूमीच्या नवयुगाचा प्रेषित मानले. त्याच्या नाट्यकृतींवर स्ट्रिनबॅर्यच्या अभिव्यक्तिवादी नाट्यतंत्राचाही प्रभाव जाणवतो. ‘द डिफिकल्ट अवर’ मधील एकांकिका त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. आधुनिक रंगभूमीसंबंधीचे आपले विचार त्याने  ‘मॉडर्न थीएटर : पॉइंट्‍स ऑफ व्ह्यू अँड अटॅक’ (१९१८, इं. शी.) ह्या नावाने काढलेल्या एका जाहीरनाम्यात व्यक्त केलेले आहेत.

लागरक्किस्टला फॅसिझमबद्दल मनस्वी तिटकारा होता आणि तो त्याच्या साहित्यातून व्यक्त झालेला आहे. त्याने बराच प्रवास केला होता. बहुधा पॅरिसला असताना आधुनिक चित्रकलेने-विशेषतः चित्रकलेतील घनवादी संप्रदायाने–तो प्रभावित झाला होता. ‘व्हर्बल आट अँड पिक्टोरिअल आर्ट’ (१९१३, इं. शी.) हा त्याचा साहित्यविषयक निबंध प्रसिद्ध आहे. १९४१ साली स्वीडिश साहित्य अकादमीवर त्याची नेमणूक झाली. १९५१ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. स्टॉकहोम येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.