मस्तिष्काघात : कोणत्याही कारणामुळे, मेंदूतील स्थानीय विकृतीमुळे, तंत्रिका तंत्रातील (मज्जा संस्थेतील) बिघाडामुळे एकाएकी उद्‌भवणाऱ्या लक्षणसमूहाला ‘मस्तिष्काघात’ म्हणतात. रक्तपुरवठ्यातील बिघाड हे आद्य कारण असल्यामुळे या रोगाला ‘मस्तिष्कवाहिनी अपघात’ अशी दुसरी नावे आहेत. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये. म्हणून निसर्गाने वाहिनीमीलनाची उत्तम व्यवस्था करून ठेवली आहे, तरी देखील वाहिनी विकृतीमुळे रक्तपुरवठ्यात व्यत्यय येण्याचा धोका असतोच. सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तीला ५५ ते ७० मिली. रक्त प्रत्येक १०० ग्रॅ. मेंदू ऊतकाकरिता (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशांच्या-समूहाकरिता) दर मिनिटास पुरविणे जरूर असते. मेंदूला लागणारी ऊर्जा फक्त रक्तातील कार्बोहायड्रेटांच्या (ग्लुकोजाच्या) ऑक्सीडीकरणापासूनच [⟶ ऑक्सिडीभवन] मिळते. या करणाकरिता ऑक्सीजनीकृत रक्ताचा सतत पुरवठा अत्यावश्यक असतो. याकरिता काही स्वनियंत्रित यंत्रणा कार्यान्वित होतात व या यंत्रणामुळे मेंदूतील रक्तदाब व सार्वदेहिक रक्तदाब एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे जातात. या कारणामुळे सार्वदेहिक रक्तदाबातील बदलांचे परिणाम रक्तपुरवठ्यात व्यत्यय आणीत नाहीत. निसर्गाने काळजी घेऊनही या यंत्रणा कोलमडून मस्तिष्काघात उद्‌भवतो (‘तंत्रिका तंत्र’ या नोंदीतील ‘मस्तिष्क रक्तवाहिन्या विकारजन्य रोग’ या उपशीर्षकाखालील माहितीही पहावी).

मस्तिष्काघात ही केंद्रीय तंत्रिका तंत्राची एक प्रमुख व नेहमी आढळणारी विकृती आहे. पाश्चात्त्य देशांतून मृत्यूच्या कारणांमध्ये तिचा तिसरा क्रमांक आहे. भारतातील या रोगाचे निश्चित प्रमाण अज्ञात असले, तरी नागरी रुग्णालयांतून प्रतिवर्षी दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये १% रुग्ण मस्तिष्काघाताचे असतात. तरुण व वयोवृद्ध या दोन्ही गटांध्ये तंत्रिका तंत्राच्या विकृतींमध्ये मस्तिष्काघात अग्रगण्य आहे.

संप्राप्ती : मस्तिष्काघात बुहुधा रोहिणीकाठिण्य, अतिरक्तदाब किंवा दोन्ही संयुक्तपणे कारणीभूत असल्यामुळे उद्‌भवतो. तरूण वयात उपदंश किंवा क्षयरोग वाहिनीक्लथनामुळे किंवा अंतर्कीलनामुळे (रक्ताची गुठळी वा अन्य काही बाह्य पदार्थ रक्तवाहिनीत अकस्मात अडकून उद्‌भवलेला मस्तिष्काघात ७५ ते ८०% रुग्णालयीन रुग्णांत आढळतो. स्त्रियांपेक्षा त्याचे प्रमाण पुरुषांत दुप्पट आढळते. ५५ ते ६५ वयोगटात सर्वाधिक प्रमाण आढळणारा हा रोग चाळिशीखाली सहसा आढळत नाही. दीर्घकालीन अतिरक्तदाब व ⇨ मधुमेह प्रवृत्तिकर कारणांत मोडतात. मेंदूतील रक्तस्त्राव तरुणांत रोहिणी विस्फार विदारमामुळे (रोहिणीच्या भित्तीचा विस्तार होऊन ती फाटल्यामुळे) किंवा वयस्कर व्यक्तींत अतिरक्तदाबामुळे होतो.

वर्गीकरण : मस्तिष्काघाताचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (अ) स्थानिक अरक्ताजन्य मस्तिष्काघात : (क) मतिष्क अभिकोथासहित : (मेंदूतील ऊतकमृत्युसहित). (१) मस्तिष्क वाहिनीक्लथन रोहिणीकाठिण्यासहित (२) मस्तिक अंतर्कीलन (३) मस्तिष्क नीलांतील क्लथन (४) रोहिणीशोथ (रोहिणीला दाहयुक्त सूज येणे उपदंश, क्षयरोग वगैरे रोगांत) (५) रोहिणी अल्परक्तदाब (६) रक्तासंबंधीचे रोग {रक्तकोशिकाधिक्यरक्ता (रक्तातील तांबड्या कोशिकांची संख्या प्रमाणाबाहेर वाढणे), दात्र-कोशिका पांडुरोग [⟶ पांडुरोग]} (७) मस्तिष्क ऑक्सिजजनन्यूनता (८) इजा अथवा आघात (९) वाहिनीदर्शनाचे (मेंदूतील रक्तप्रवाहात क्ष-किरणांना आपारद्रशक असेले द्रव्य अंतःक्षेपित करून करण्यात येणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या क्ष-किरण तपासणीचे) उपद्रव (१०) विच्छेदक महारोहिणी विस्फार (महारोहिणीच्या अस्तरामध्ये चीर पडल्याने तीतून रक्त घुसून महारोहिणीची भित्ती फाटणे) (११) अज्ञातहेतुक. (ख) मस्तिष्क अमिकोथरहित : (मेंदूतील ऊतकहानीशिवाय). (१) पुनरावर्तित स्थानीय अरक्ता (२) रोहिणी अल्परक्तदाब (३) अर्धशिशीसहित.

(आ) रक्तस्त्रावजन्य मस्तिषअकाघात : (१) अतिरक्तदाबजन्य मस्तिष्क रक्तस्त्राव (२) रोहिणीविस्फार विदारणजन्य (३) वाहिनीअर्बुद (वाहिनीत नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे उद्‌भवणाऱ्या गाठीने होणारे) विदारण (४) इजा अथवा आघात (५) रक्तसंबंधीच्या विकृती [श्वेतकोशिकार्बुद (रक्तातील पांढऱ्या कोशिकांची संख्या प्रमाणाबाहेर वाढणे) ] (६) रक्तक्लखनावरील (रक्त साखळण्यावरील) प्रतिबंधात्मक उपचारातील उपद्रव (७) मस्तिष्क अर्बुदातील रक्तस्त्राव (८) अनिश्चित कारणे.

(इ) अनिश्चिचित कारणांमुळे उद्‌भवणारा मस्तिष्काघात.

विकृतिविज्ञान : रोहिणीकाठिण्य ही विकृती शोथहीन असून शरीरातील मोठ्या व मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांच्या भित्तींवर 


अंत:मस्तिष्क रक्तस्त्राव, मस्तिष्क रोहिणी अंतर्क्लथन व मस्तिष्क अंतर्कीलन यांमुळे 

उद्‌भवणार्‍या मस्तिष्काघातातील फरक.

वैशिष्ट्य 

अंत:मस्तिष्क रक्तस्त्राव 

मस्तिष्क रोहिणी अंतर्क्लथन 

मस्तिष्क अंतर्कीलन 

सुरुवात

बहुधा क्रियाशील असताना, गंभीर डोकेदुखी (शुद्धीवर असून सांगू शकल्यास).

भोवळ, वाचाघात वगैरे पूर्वसूचक लक्षणे अधूनमधून सुधारणा क्रियाशीलतेशी संबंध नसतो.

काही सेकंदांत किंवा मिनिटांत एकाएकी डोकेदुखी किंवा पूर्वसूचक लक्षणे नसतात क्रियाशीलतेशी संबंध नसतो.

रोग काल अथवा रोग प्रगती

अर्धांग पक्षाघात व इतर लक्षणे काही मिनिटांत ते एक तासात दिसतात.

मंद, कधीकधी काही तास कधीकधी जलद सुधारणा.

जलद सुधारणा शक्य.

इतिहास व इतर संबंधित विकृती

इतर रक्तस्त्राव असल्यास सूचक समजावे श्वेतकोशिकार्वुद आणि इतर रक्तासंबंधीचे रोग सूचक असतात.

इतर भागांतील रोहिणी विलेपी विकार (उदा., ह्रद्रोहिणी अंतर्क्लथन), इ तर रोग, उदा., मधुमेह.

इतर भागांतील अंतर्कींलन उदा., फुप्फुस, प्लीहा (पानथरी), आतड्याचा मार्ग वगैरे.

संवेदी क्षेत्र

बेशुद्धी जलद येते.

थोडी फार शुद्ध असते.

अत्यल्प बिघाड

तंत्रिका तंत्रासंबंधीची लक्षणे

विशेष लक्षणे ज्वर, डोकेदुखी वगैरे मानेचा ताठपणा.

विशिष्ट रोहिणीजन्य विशिष्ट लक्षणे.

विशिष्ट लक्षणांचा अभाव मान ताठ कर्निग लक्षण ब्रडझिन्सकी लक्षण [⟶ मस्तिष्काबरणशोथ].

रक्तदाब

रोहिणी अतिरक्तदाब

रोहिणी अतिरक्तदाब पुष्कळ वेळा.

प्राकृतिक

मस्तिष्क मेरुद्रव

रक्ततमिश्रित

स्वच्छ

स्वच्छ

मस्तिष्क वाहिनीदर्शन

रक्तस्त्राव क्षेत्र दिसते व स्थलांतरित वाहिन्या दिसतात.

विलिस रोहिणी वलयात अडथळा किंवा अरुंद पोकळी.

विलिस रोहिणी वलयात किंवा शाखांत अडथळा. उदा., मध्य मस्तिष्क रोहिणीत किंवा अग्र मस्तिष्क रोहिणीत.

‘विलिस रोहिणी वलय’ याच्या स्पष्टीकरणासाठी ‘तंत्रिका तंत्र’ यो नोंदीतील आ. ४३ (खंड ७, पृष्ठ १०८) पहावी.

परिणाम करते. रोहिणी अंतःस्तराखाली तंतुमय ऊतक व वसा (स्निग्ध पदार्थ) मिळून बनलेल्या गाठी तयार होतात म्हणून या विकृतीला ‘ग्रंथिला रोहिणीकाठिण्य’ असेही म्हणतात. या गाठीमुळे रोहिणीतील पोकळीचा व्यास कमी होऊन मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा पुष्कळसा कमी होतो. कालांताराने गाठीच्या जागी वर्ण तयार होतात व त्यांमध्ये रक्तक्लथनाची जागा, वाहिनीमीलनाचे प्रमाण, रक्तदाब, रक्ताची श्यनता (दाटपणा) इत्यादींवर मस्तिष्क अरक्ता अवलंबून असते. रोहिणीतील प्रवाह बंद होताच ऊतकमृत्यू होऊन ती जागा व्रणाने व्यापली जाते. अर्थातच तेवढा भाग अकार्यक्षम क्षम बनतो.

लक्षणे : स्थानीय प्रेरक तंत्रासंबंधीची [⟶ प्रेरक तंत्र] विकृती, स्थानीय अतिसंवेदनशीलता, वाचा दोष किंवा गंभीर बेशुद्धी यांपैकी कोणत्याही तंत्रिका तंत्रासंबंधीच्या लक्षणाने एकाएकी सुरुवात होऊ शकते. कधी कधी उलट्या, झटके किंवा डोकेदुखीने सुरुवात होते आणि पुष्कळ वेळा मान ताठ झाल्याचे आढळते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कमीजास्त तीव्रता आणि निरनिराळे प्रकार आढळतात. कधी कधी अतितीव्र सुरुवात होऊन रुग्ण धाडकन कोसळतो व गाढ झोपेत असल्याप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो. चेन-स्टोक्स श्वलनक्रिया (स्कॉटिश वैद्य जॉन चेन व आयरिश वैद्य विल्यम स्टोक्स यांच्या नावाने ओळखण्यास येणारी तीव्रतेत पुनरावर्ती विशिष्ट लयबद्ध बदल होणाऱ्या प्रकारची श्वसन क्रिया) सुरु होते एक हात व पाय पूर्णपणे शिथिल पडलेले असतात. मृत्यू काही तासांत किंवा काही दिवसांनी येतो.


कमी तीव्र प्रकाराची सुरुवात अल्प वाचा दोष, विचार, गती, संवेदना किंवा दृष्टी यांतील दोष यांनी होते. शुद्धीवर परिणाम होतो किंवा होत नाही. लक्षणे क्षणिक म्हणजे काही सेकंद, मिनिटे किंवा त्याहून जास्त काळ टिकतात. हाका अनिश्चित असून रोग्यात थोडीफार सुधारणा बहुधा होते.

पूर्वसूचक लक्षणांमध्ये डोकेदुखी, भोवळ, गुंगी व विचारांची अस्पष्टता यांचा समावेश होतो. मस्तिष्क रक्तस्त्रावात ज्वर, डोकेदुखी, उलट्या, झटके व बेशुद्धी ही तंत्रिका तंत्राच्या विकृतीची निर्देशक लक्षणे आढळतात. जी रोहिणी रोगग्रस्त असेल तीवर विशेष लक्षणे अवलंबून असतात. उदा., मध्यमस्तिष्क रोहिणीच्या विकृणीच्या विकृतीत विरुद्ध बाजूस एकांग पक्षाघात किंवा अर्धांग पक्षाघात (लकवा), वाक्विकृती इ. लक्षणे उद्‌भवतात.

कालांतराने उद्‌भवणारी लक्षणे मेंदूचे विकृत क्षेत्र, ऊतकनाशाचे प्रमाण इत्यादींवर अवलंबून असतात. कधी कधी रोगी संपूर्ण बरा होतो.

कोष्टकात अंतःमस्तिष्क रक्तस्त्राव (मस्तिष्क रक्तस्त्राव), मस्तिष्क रोहिणी अंतर्क्लथन (मस्तिष्क वाहिनीर्क्लथन) व मस्तिष्क अंतर्कीलन (मस्तिष्क वाहिनी अंतर्कीलन) या प्रमुख कारणांमुळे उद्‌भवणाऱ्या मस्तिष्कघातातील फरक दर्शविले आहेत.

निदान : कटिसूचिवेधाने (पाठीच्या कण्यातील खालून तिसऱ्या व चवथ्या मणक्यांमध्ये सुई खुपसून) मस्तिष्क-मेरुद्रव (मेंदूरज्जू यांना यांत्रिका आधार देणारा द्रव) काढून तपासणी करणे उपयुक्त असते [⟶ तंत्रिका तंत्र]. हा वेध अतिशय काळजीपूर्वक करावयाचा असतो. याशिवाय मस्तिष्क रोहिणीदर्शन, कवटीचे क्ष-किरण चित्रण, संगणक (गणकयंत्र) वापरून मेंदूची क्ष-किरणाद्वारे क्रमवीक्षणाने (ठराविक क्रमाने निरीक्षण करून) रचनात्मक माहिती मिळविणे (मेंदू क्रमवीक्षण) यांसारख्या विशेष परीक्षा निदानास मदत करतात. विद्युत् मस्तिष्कालेख (मेंदूतील प्रवाहांची आलेख रूपात मिळविलेली नोंद) सर्व प्रकारच्या मस्तिष्काघातात अपसामान्य असतो. या आलेखांचा रोगप्रगतिदर्शक म्हणून उपयोग करता येतो.

फलानुमान : (रोगाचे स्वरुप व लक्षणे यांवरून रुग्ण बरा होण्यासंबंधी करण्यात येणारे अनुमान). मस्तिष्क रोहिणी अंतर्क्लथनामध्ये मेंदूतील ऊतकनाशाचे क्षेत्र व त्याचे प्रमाण यांवर फलानुमान अवलंबून असते. सुधारणेच जेवढा विलंब तेवढे फलानुमान वाईट. अंतःमस्तिष्क रक्तस्त्रावात फलानुमान वाईट असते. अतिरक्तदाब व रोहिणीकाठिण्य असल्यास अधिक धोका असतो.

उपचार : मस्तिष्काघात ही एक वैद्यकीय आणीबाणी असल्यामुळे रुग्णास शक्य तेवढ्या लवकर रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. उपचार मूळ कारणावर अवलंबून असून ते वैद्यकीय सल्ल्यानुसार योजणे हितावह असते. तीव्र अवस्थेतील उपचार सर्वस्वी रुग्णालयीन असतात. उपशामवस्था व पुनर्वसन कालातील उपचाराकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. अर्धांग पक्षाघात झालेल्या रुग्णामध्ये पक्षाघात झालेल्या अवयवाची काळजी, वाक्विकृती, अर्धअंधत्व, मूत्रोत्सर्गावरील किंवा मलोत्सर्गावरील असंयम, मेंदूची कमजोर क्रिया शीलता यांकडे विशेष लक्ष पुरवावे लागते.

संदर्भ :  1. Datey, K. K. Shah, S. J., Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1979.

             2. Davidson, S MacLeod, J., Ed., The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

             3. Krupp, M. A. Chatton, M. J., Current Medical Diagnosis and Treatment, Singapore, 1983.

             4. Petersdorf, R. G. and Others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine. Singapore, 1983.

              5. Scott, R. B., Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.

भालेराव, य. त्र्यं.