बरबरुआ, हितेश्वर :(? डिसेंबर १८७६- ? १९३९). असमिया कवी. जोरहाट येथे एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज आहोम दरबारात उच्च अधिकारपदावर होते. हितेश्वर हुशार विद्यार्थी असूनही त्यांना परिस्थितीमुळे जेमतेम मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेता आले. नंतर त्यांना एका चहामळ्यात लिपिक म्हणून नोकरी करावी लागली. त्यांनी इंग्रजी साहित्याचे व आसामच्या इतिहासाचे (विशेषतः आहोम कालखंडाचे) सखोल अध्ययन केले होते. त्यांचे वैयक्तिक जीवन दुःखी होते. दोन मुलांच्या व पत्नीच्याही मृत्युचे आघात त्यांना लागोपाठ सोसावे लागले. याचा परिणाम त्यांच्या संवेदनाशील मनावर व काव्यलेखनावरही खोलवर झाला. त्यांच्या काव्यावर सर्वत्र ह्या दुःखाची गडद छाया पडल्याचे जाणवते.

हितेश्वरांना लहानपणापासूनच काव्यरचनेची आवड होती. आपली ऐतिहासिक काव्ये लिहिताना त्यांना आपल्या इतिहासाच्या व्यासंगाचा खूपच उपयोग झाला. धोपाकलि हा  आपल्या सुरूवातीच्या कवितांचा लहानसा संग्रह १९०२ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केला. ह्या संग्रहामुळे एक उदयोन्मुख प्रतिभावंत कवी म्हणून त्यांच्याकडे वाचकांचे लक्ष वेधले गेले. खिन्न व उदास अशी त्यांची मधुर भावगीते व सुनीते त्यांच्या आमास काव्य (भावगीतसंग्रह – १९१४), मालच (१२८ सुनीतांचा संग्रह – १९१८) आणि चकुलो (सुनीतसंग्रह – १९२२) या संग्रहांत संकलित अहेत. त्यांच्या धाकट्या मुलाच्या मृत्युवर त्यांनी लिहिलेल्या उत्कट भावपूर्ण सुनीतांचा चकुलो हा संग्रह असून तो विशेष महत्तवाचा मानला जातो. असमियात सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट सुनीते लिहिणारे कवी म्हणून हितेश्वर प्रसिद्ध आहेत. त्यांनी सु. २०० सुनीते व शेकडो भावगीते लिहिली आहेत.

प्रदीर्घ आख्यानपर कविता व महाकाव्य या प्रकारांत मोडेल अशी निर्यमक काव्यरचनाही त्यांनी विपुल केली आहे. कमतापुर ध्वंस काव्य (१८९९), बिरहिणी बिलाप काव्य (१९१२), तिलोतार आत्मदान (१९१३), युद्धक्षेत्रत आहोम रमणी काव्य किंवा मुल गाभरू (१९१५) ही महाकाव्याच्या शैलीत लिहिलेली त्यांची ऐतिहासिक आख्यानकाव्ये आहेत. अंगिला (१९१७) हे ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या द व्हिकार ऑफ वेकफील्डचे संक्षित भाषांतर, डेस्डिमोना काव्य (१९१७) हे ऑथेल्लोवर आधारित काव्य आणि बैदेहिर निर्वासन ही त्यांची इतर उल्लेखनीय लघुकाव्ये होत.

मालिता (१९१४) ही त्यांची आहोम कालखंडावरील ऐतिहासिक कादंबरी. आहोमर दिन हा त्यांचा ऐतिहासिक स्वरूपाचा गद्यग्रंथ व तलसारा फुलर तिनी आंजली हे बृहत्‌काव्य हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध असून ती अप्रकाशित आहेत. आयुष्याच्या अखेरीअखेरीस ते इतिहाससंशोधनाकडे वळले. एक प्रतिभासंपन्न कवी व सुनीतकार म्हणून त्यांना असमिया साहित्यात मह्त्वपूर्ण स्थान आहे.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं) सुर्वे, भा. ग. (म.)