दुर्जल शेती : अनिश्चित व कमीजास्त प्रमाणात पडणाऱ्या व एकंदरीने कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशातील विशेष प्रकारच्या शेतीच्या पद्धतीला दुर्जल शेती असे नाव आहे. या पद्धतीत कमी आणि त्याचबरोबर अवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत मुरवून त्याचा पिकांचे उत्पादन करण्यासाठी जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्यात येतो. सर्वसाधारणपणे उष्ण हवामानातील ७५ सेंमी. पर्यंत पावसाच्या प्रदेशात या पद्धतीचा अवलंब केला जातो.

जगातील रुक्ष आणि अर्धरुक्ष प्रदेशातील लोक पुरातन काळापासून दुर्जल शेतीचा स्थूलमानाने अवलंब करीत आहेत. जमीन नांगरून तिचा वरचा थर भुसभुशीत केल्यामूळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत हाते, असे प्राचीन ग्रीस आणि इटलीतील रुक्ष प्रदेशांतील शेतकऱ्यांना आढळून आले परंतु एकंदरीने दुर्जल शेतीच्या प्रदेशात पिकांचे उत्पन्न बेताचेच असे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उटा राज्यात १८६५ मध्ये नव्यानेच वसाहत केलेल्या शेतकऱ्यांनी दुर्जल शेतीची खास तत्त्वे प्रथम शोधून काढली.

पृथ्वीवरील एकूण जमिनीपैकी सु. ६५% क्षेत्र रुक्ष आणि अर्धरुक्ष असून कमी आणि अनियमित पावसामुळे या क्षेत्रात पिकांचे सर्वसाधारण उत्पन्न मिळण्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. शास्त्रीय पद्धतीवर आधारलेल्या दुर्जल शेतीचा अवलंब करून धान्योत्पादन वाढविण्यास या क्षेत्रात बराच वाव आहे. सध्या अर्जेंटिना, द. आफ्रिका, द. ऑस्ट्रेलिया, मँचुरिया, मंगोलियाचा काही भाग, रशिया, कॅनडा व आशियातील कमी पावसाच्या प्रदेशांत दुर्जल शेतीचा अवलंब केला जातो.

भारतातील दुर्जल शेती : भारतात कमी व अनिश्चित पावसाखालील प्रदेशाचे (दुर्जल शेतीचे) एकूण क्षेत्र ४·७० कोटी हेक्टर असून ते देशातील लागवडीखालील क्षेत्राच्या जवळजवळ १/३ आहे. ११० जिल्हे मिळून होणाऱ्या या दुर्जल शेती क्षेत्राचे पुढील तीन मुख्य विभाग आहेत. : (१) उत्तरेस पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशाचा नैर्ऋत्य भाग आणि मध्य प्रदेशाचा वायव्य भाग मिळून होणारा सिंधु–गंगा नदीचा सपाट प्रदेश (२) महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील पठारावरील टंचाईग्रस्त भाग या भागात काळा खडक (ट्रॅप) आढळून येतो. (३) ग्रॅनाइट प्रकारच्या खडकापासून तयार झालेला पूर्व कर्नाटक, पश्चिम आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील पठाराचा भाग.

जमिनीचा प्रकार, उतार, हवामान इ. गोष्टींचा विचार करून त्या त्या विभागासाठी योग्य अशा शास्त्रीय दुर्जल शेती पद्धतीची शिफारस केली जाते. या पद्धतीसंबंधी महाराष्ट्रात सोलापूर, तमिळनाडूत हगेरी, कर्नाटकात विजापूर व रायचूर आणि पंजाबात रोहटक येथे पुष्कळ संशोधन झाले आहे. भारतातील निरनिराळ्या विभागांसाठी शिफारस केलेल्या दुर्जल शेतीच्या तपशीलात फरक असला, तरी त्या सर्वांमध्ये स्थूलमानाने खालील बाबींचा अंतर्भाव होतो : (१) निरनिराळ्या पिकांसाठी योग्य जमिनीची निवड (२) पावसाचे पाणी अडविण्यासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी समप्रतली (एकाच पातळीत) बांध घालणे. (३) पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरावे, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट कमी व्हावी व तणांची वाढ होऊ नये यांसाठी सर्व मशागत समप्रतली रेषेवर करणे. (४) पेरणीसाठी पिकांच्या सुधारित प्रकारांचा वापर करणे. (५) पेरणीसाठी कमी प्रमाणात बी वापरून ओळींतील व झाडांतील अंतर जास्त ठेवणे. (६) मातीची संरचना सुधारण्यासाठी आणि पिकाला अन्नांश पुरविण्यासाठी भरखते आणि वरखते देणे. (७) समप्रतली रेषेत पिकाची पट्टा पेरणी करणे. (८) पिकांची फेरपालट करणे आणि जमीन पडीक ठेवणे.

वरील प्रत्येक बाबीचा स्वतंत्रपणे अवलंब करून उत्पन्नात जी वाढ होते त्यापेक्षा सर्व बाबींच्या एकत्रित परिणामामुळे जास्त वाढ होते. केवळ बांध घालण्यामुळे उत्पन्नात  २५ ते ३०% वाढ होते, परंतु सर्व बाबींच्या एकत्रित परिणामामुळे उत्पन्न ५० ते १००% अगर त्याहूनही जास्त वाढते. भारतातील वर वर्णन केलेल्या तीन दुर्जल शेती विभागांसाठी शिफारस केलेल्या शेती पद्धतींचे तपशील संक्षिप्तपणे खाली दिले आहेत.


मुंबई दुर्जल शेती पद्धत : महाराष्ट्रातील ट्रॅप खडकापासून तयार झालेल्या जमिनीच्या प्रदेशासाठी व तशाच प्रकारच्या इतर क्षेत्रासाठी या पद्धतीची शिफारस केली जाते. सोलापूर येथील संशोधन केंद्रावर केलेल्या अनेक वर्षांच्या प्रयोगांच्या निष्कर्षांवर ही पद्धत आधारलेली आहे.

महाराष्ट्रातील पठारावरील फार मोठा भाग टंचाईचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ ६६ लाख हे. असून ते राज्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या ३६% आहे. या प्रदेशात ६०–७५ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो आणि काही भागांत तो ५० सेंमी. पेक्षाही कमी असतो. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नासिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या ११ जिल्ह्यांतील टंचाईचे भाग मिळून हा प्रदेश होतो. या प्रदेशात खरीपाच्या पावसाला जूनच्या मध्याला सुरुवात होते परंतु पडणारा पाऊस इतका थोडा असतो की, तो ज्वारी व बाजरीच्या पेरण्यांसाठी पुरेसा नसतो. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत २५ ते ३० सेमी. व उरलेला ३५–४० सेंमी पाऊस सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पडतो आणि त्यातील काही भाग जोराच्या सरींचा असतो. पावसाच्या एकूण सु. ५० दिवसांपैकी तीन दिवसांत रोज साधारणपणे ५ सेंमी. प्रमाणे १५ सेंमी. पाऊस पडतो. जोरदार पावसामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता जमिनीवरून वाहून जाते. १० दिवसांत रोज सरासरी २·५ सेंमी. प्रमाणे २५ सेंमी. व उरलेल्या सु. ३० पावसाच्या दिवसांत रोज १० पासून ३५ मिमी. प्रमाणे एकूण २० सेंमी. पाऊस पडतो. दोन पावसांत २ ते ६ आठवड्यांची उघडीप असते. तसेच या प्रदेशातील सरासरी तापमान जास्त असते व सोसाट्याचे वारेही वाहतात. या सर्व कारणांमुळे जमिनीतील ओल बाष्पीभवनामुळे निघून जाते व परिणामी पिके वाळतात. जमिनीला बांध घालून व इतर उपायांनी (उदा., पाझर तलाव खणून) पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरू देणे आणि त्या पाण्याचा पिकाला जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असते. मुंबई दुर्जल शेती पद्धतीचा वापर करून या क्षेत्रातील रबी ज्वारीचे उत्पन्न दोन ते अडीच पटींनी वाढू शकते, असा अनुभव आहे. या पद्धतीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.

समपातळी बांध घालणे : दुर्जल शेती पद्धतीत ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. बांध घालण्याचे काम संपूर्ण पाणलोटाच्या क्षेत्रात करणे आवश्यक असते.

 

नांगरणी व कुळवणी : हलक्या, उथळ व मध्यम जमिनी नांगरण्याऐवजी जून–जुलै अथवा जुलै–ऑगस्टमध्ये (पाऊस पडेल त्याप्रमाणे) दोन वेळा कुळवाव्यात. भारी जमिनी ३ अगर ४ वर्षांनी एकदा रबी पीक काढल्यानंतर ताबडतोब (साधारणपणे मार्च–एप्रिल महिन्यात) खोल नांगराव्यात. नांगरणी आणि कुळवणी समपातळी रेषेवर करावी. कुंदा अथवा हरळीची बेटे खोल नांगरून अथवा हाताने खणून काढावीत. भारी जमिनी नांगरल्यावर त्यांना चार कुळवण्या द्याव्यात पहिली कुळवणी नांगरणीनंतर तीन आठवड्यांनी व बाकीच्या तीन कुळवण्या सर्वसाधारणपणे एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात. प्रत्येक कुळवणी शेतात पावसाच्या चांगल्या सरी पडल्यावर करावी.

खत : चार वर्षांतून एकदा १२·५ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत (अथवा दरवर्षी सु. ४ टन) कुळवणी अथवा नांगरटीपूर्वी घालावे.

पेरणी : रबी हंगामात मालदांडी ३५–१ ज्वारीचे बी हेक्टरी ४·५ किग्रॅ. प्रमाणे ४५ सेंमी. अंतरावरील ओळींत ७·५ ते १० सेंमी. खोल पेरून फळी फिरवून झाकून घ्यावे.


कोळपणी : रबी ज्वारीला सर्वसाधारणपणे दोन वेळा कोळपणी करावी. भारी जमिनीत जोरदार पाऊस पडल्यास एक जादा कोळपणी करावी लागते. त्यामुळे तणांची वाढ रोखली जाते.

फेरपालट : तीन वर्षे लागोपाठ ज्वारी घेऊन चौथ्या वर्षी हरभरा अथवा भुईमूग पेरावा अथवा या फेरपालटातील दुसऱ्या वर्षांतील ज्वारीऐवजी गहू, कापूस किंवा तंबाखू पेरावा.

पट्टा पेरणी : ज्वारीबाजरीसारखी पिके जमिनीची धूप थांबवू शकत नाहीत. याउलट भुईमूग, हुलगा, मटकीसारखी पिके धूप थांबवितात. यासाठी पहिल्या प्रकारच्या पिकांना धूपसुलभ आणि दुसऱ्या प्रकारच्या पिकांना धूपप्रतिबंधक पिके म्हणतात. समपातळी रेषेत धूपसुलभ आणि धूपप्रतिबंधक पिकाचे पट्टे आलटून पालटून पेरावेत. भुईमुगाखेरीज धूपप्रतिबंधक पिकाची पेरणी नेहमीपेक्षा दुप्पट अथवा तीनपट बी वापरून करावी. धूपप्रतिबंधक पिकाचा पट्टा दरवर्षी पुढे सरकवावा म्हणजे ४–५ वर्षांच्या काळात शेतातील सर्व जागेत धूपप्रतिबंधक पिकाची लागवड पूर्ण होईल. जमिनीला १ टक्का उतार असल्यास धूपप्रतिबंधक आणि धूपसुलभ पिकाच्या पट्ट्याचे प्रमाण १ : ५, २ टक्के उतारासाठी १ : ४ व ३ टक्के उतारासाठी १ : ३ ठेवावे. भुईमुगासारख्या धूपप्रतिबंधक पिकाचा पट्टा ६० सेंमी. रुंदीचा असल्या ज्वारीसारख्या धूपसुलभ पिकाच्या पट्ट्याची रुंदी १, २ व ३ टक्के उतारांसाठी अनुक्रमे ३००, २४० आणि १८० सेंमी. ठेवावी.

पावसामुळे धुपून गेलेल्या, चढउताराच्या आणि बांध न घातलेल्या शेतातही पट्टा पेरणीमुळे जमिनीची धूप थांबते. हे पट्टे उताराला आडवे व शक्यतोवर समपातळी रेषेत असावेत.

पिकाची योग्य निवड : हलक्या, उथळ धुपून गेलेल्या जमिनीमध्ये खरीपात बाजरी व तूर (मिश्रपिक) अथवा भुईमूग पेरावा अथवा अशा जमिनीत हिरवळीच्या खताचे पीक वाढवून ते बाजूच्या भारी खोल जमिनीत गाडावे.

जमीन पडीक ठेवणे : दुर्जल शेती परिस्थितीत भारी जमीन पडीक ठेवल्याने फायदा होतो. दरवर्षी सर्वसाधारणपणे एकषष्ठांश भारी जमीन पडीक ठेवून तीत दोन वर्षांतून एकदा पीक घ्यावे. ज्या वर्षी जमीन पडीक असेल त्या वर्षी जमिनीत नांगरणी, कुळवणी, खत घालणे ही मशागतीची कामे करावीत व तणे वाढू देऊ नयेत. अशा प्रकारच्या पडीक जमिनीत पुढील (पिकाच्या) पावसाचे प्रमाण कमी असल्यासही पडीक न ठेवलेल्या जमिनीपेक्षा पीक चांगले येते, असा अनुभव आहे. हलक्या व उथळ जमिनी पडीक ठेवल्याने फायदा होत नाही.

 

मुरमाड माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलक्या व उथळ जमिनीसाठी मुंबई दुर्जल शेती पद्धत विशेष फायदेशीर ठरलेली नाही. अशा जमिनीत बाजरी किंवा बाजरी व तूर यांचे मिश्रपिक, कुळीथ, मटकी, मूग, उडीद, तीळ, अंबाडी ही पिके घेतात. या जमिनीसाठी दरवर्षी हलक्या नांगराने नांगरणी करणे, सर्व मशागत समपातळी रेषेवर करणे, हेक्टरी ४·५ किग्रॅ. बी वापरुन फण्यांत ३० सेंमी. अंतर असलेल्या पाभरीने पेरणी करणे अशा शिफारशी केल्या गेल्या आहेत. नांगरणीनंतर कुळवाच्या फक्त दोन पाळ्या आणि आंतर मशागतीसाठी फक्त दोन कोळपण्या पुरेशा होतात.

उत्तर भारतासाठी दुर्जल शेती पद्धत : ही पद्धत स्थूलमानाने मुंबई दुर्जल शेती पद्धतीप्रमाणे आहे. स्थानिक परिस्थितीनुसार केलेले विशेष फेरफार पुढीलप्रमाणे आहेत (१) रेताड जमिनी दरवर्षी पहिल्या पावसाच्या सरी पडून गेल्यावर १० ते १२·५ सेंमी. खोल नांगराव्यात. पुढे पावसामध्ये खंड असेल त्यावेळी बाजरी अथवा गवारीच्या पेरणीपर्यंत जमिनीची पुनःपुन्हा उथळ नांगरणी करून सोहागाच्या (लाकडी फळीच्या) साहाय्याने जमीन दाबून घ्यावी. यामुळे जमिन पाणी शोषून घेते (२) पिकाच्या फेरपालटांत हलक्या जमिनीत गवार व भारी जमिनीत गव्हानंतर हरभऱ्याचे पीक घ्यावे. (३) राजस्थानच्या विशेष टंचाईग्रस्त आणि कोरड्या भागात दोन वर्षे जमीन पड ठेवून तिसऱ्या वर्षी पीक घ्यावे.


 

दक्षिण भारतासाठी दुर्जल शेती पद्धत : मुंबई दुर्जल शेती पद्धतीशी तुलना करता या पद्धतीत विशेष फरक आढळून येत नाही. कापसाच्या पिकासाठी राखून ठेवलेल्या जमिनीत थरांची उलटापालट करणाऱ्या नांगराने १८ ते २० सेंमी. खोल नांगरणी करून कापसाचे पीक घेतल्यावर पुढील वर्षी नांगरणी न करता त्या जमिनीत ज्वारी घेण्याची शिफारस या पद्धतीत करण्यात आली आहे. धुपून गेलेल्या उथळ जमिनी आणि कोरड्या भागातील फार खोल जमिनी वारंवार नांगरल्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो, असेही आढळून आले आहे.

संदर्भ : 1. Arakeri, H. R. Chalam, G. V. Satyanarayana, P. Soil Management in India, Bombay, 1962.

             2. Gadkary, D. A. A Manual on Soil Conservation, Poona, 1966.

             3. Kanitkar, V. N. and others, Dry Farming in India, New Delhi, 1960.

             4. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Introduction to Agronomy and Soil Water Management, Poona, 1973.

             ५. गायकवाड, राजाराम, मूसंरक्षणशास्त्र आणि तंत्र, पुणे, १९६१.

काकडे, ज. रा.