शवोपजीवन : सजीवांच्या मृतावशेषांवर उपजीविका करणाऱ्या वनस्पतींना शवोपजीवी व पोषणाच्या या असाधारण प्रकाराला ‘शवोपजीवन’ म्हणतात.[→ जीवोपजीवन]. अशा प्रकारची जीवनपद्धती सूक्ष्म जंतू व कवके यांमध्ये सामान्यतः आढळते. हा प्रकार सहजीवनाचा असून जीवसृष्टीत याला महत्त्वाचे स्थान आहे. प्राणी व वनस्पती यांच्या परस्परावलंबनाचे हे उत्तम उदाहरण असून, त्यामुळे सृष्टीतील पदार्थांचा समतोल राखला जातो. शवोपजीवी सूक्ष्मजंतू व कवके यांच्या ठायी प्रकाशसंश्लेषण व रासायनिक प्रकाशसंश्लेषणाची क्षमता नसते. त्यांच्या पोषणविषयक गरजा मूलतः भिन्न असतात. उच्च दर्जाच्या वनस्पतींमध्ये शवोपजीविता अगदी क्वचितच आढळते, तथापि अर्धशवोपजीविता मात्र त्यांमध्ये आढळते.

 रासायनिक प्रक्रियांमुळे बव्हंशी सूक्ष्मजंतू व कवके हे मृतावेशषांतील कार्बनी घटकांचे विघटन घडवून ते हळूहळू नाहीसे करतात व अकार्बनी घट भूमिस्थित अकार्बनी द्रव्यांबरोबर एकरूप होतात. तेच पुन्हा स्वोपजीवी (अकार्बनी द्रव्यांपासून स्वतःचे अन्न स्वतःच तयार करणाऱ्या) वनस्पतींनी शोषून घेतल्यावर व अनेक प्रक्रियांनंतर कार्बनी स्वरूपात येतात. अशा प्रकारे संश्लेषण व विश्लेषण यांसारख्या प्रकियांनी मूलद्रव्यांचे अभिसरण चक्र सुरू असते. पृथ्वीवरील मृत देहांची जर अशी विल्हेवाट लागली नसती, तर त्यांच्या प्रचंड राशी साचून नवीन सजीवांना जगणे अशक्यच झाले असते.

ज्या वनस्पतींत ⇨हरितद्रव्याचा पूर्ण अभाव असतो (उदा., सूक्ष्मजंतू, कवके इ.) त्यांना स्वतंत्रपणे अन्ननिर्मिती करता येत नाही. साहजिकच त्यांपैकी काही पूर्णपणे मृतांवर जगतात व त्यांना पूर्ण ‘शवोपजीवी’ म्हणतात. हरितद्रव्य असणाऱ्याकाही वनस्पती अंशमात्र किंवा अपूर्ण शवोपजीवी असतात. अपवादात्मक असे काही सूक्ष्मजंतू प्रकाशसंश्लेषण करू शकतात तर काही रासायनिक संश्लेषण करतात. दोन्ही बाबतींत या वनस्पतींचा उद्देश परिस्थितीशी जुळवून घेणे किंवा समरस होणे हा असतो. पूर्ण शवोपजीवन अनेक सूक्ष्मजंतू व कवकांत (उदा., पेनिसिलियमाच्या सर्व जाती, श्लेष्म बुरशी यांत) आढळते. मात्र अर्धवट शवोपजीवन वाहिनीवंत (पाणी व अन्नरसाची ने-आण करणारे स्वतंत्र शरीरघटक असलेल्या) वनस्पतींत (नेचाभ पादप व बीजी वनस्पती यांत) कधीकधी आढळते. शवोपजीवी वनस्पतींची विविधता, त्यांच्या अधिवास, पोषण पद्धती व शवोपजीवनामुळे झालेलाऱ्हास इत्यादींविषयीची माहिती पुढे दिलेल्या काही गटांच्या तपशिलांवरून मिळेल.

 काही ⇨ शैवले  समुद्रतळाशी साचलेल्या मृत कार्बनी द्रव्यांतून आपले अन्न घेतात. बर्फाळ पृष्ठावर (ध्रुवीय व आल्पीय प्रदेशांवर) आढळणारे ‘गोलसर शैवल’ (स्फिरेला निवॅलिस) आपली उपजीविका मृत कीटक, परागकण व इतर कार्बनी द्रव्यांवर करते. त्याच्या लाल रंगामुळे त्याला ‘लाल बर्फ’ म्हणतात. कवकांपैकी अत्यंत प्रारंभिक असे ‘श्लेष्म कवक’ (मायसिटोझोआ) अमीबा या प्रारंभिक व साध्या जीवाप्रमाणे कार्बनी द्रव्यांचे घन कण ⇨ एंझाइमाच्या साहाय्याने पचवून शोषण करतात. जंगलातील कुजणारी व सुकलेली पाने, काटक्या इत्यादींवर ही ⇨ कवके आढळतात. अनेक सूक्ष्मजंतू व कवके मृत वनस्पतींच्या व प्राण्यांच्या कार्बनी द्रव्यांवर वाढतात. नासणे, कुजणे, आंबणे इ. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या क्रियांनी तयार झालेली द्रव्ये शोषली जातात. काही सारग्राही (निवडून घेणारी) कवके विशिष्ट कार्बनी द्रव्यांवर रासायनिक प्रक्रिया घडवितात व त्यांना आवश्यक त्या द्रव्यांचे ग्रहण करतात. उदा., यीस्ट (किण्व) शर्करा विद्रावात मद्यार्काचे उत्पादन करतात. ‘कॉप्रिनस’ व ‘पायलोबोलस’ प्राण्यांच्या विष्ठेवर आढळतात. काही कवके शंकुमंत वृक्षाच्या खालच्या वनभूमीवर वाढतात (उदा., लॅक्टॅरियस डेलिसिओसस). इतर कवकांच्या जाती सर्वसामान्य कार्बनी द्रव्यावर कुजण्याची क्रिया घडवून आणतात उदा., स्परजिलस, पेनिसिलियम, फ्युजेरियम व म्यूकर इ. बुरशीच्या जाती व काही ⇨ भूछत्रे.  खडकांतील लहान भेगांत साचलेल्या कुचकट द्रव्यांत किंवा झाडांच्या सालीवरील भेगांत साचलेली धूळ व कार्बनी पदार्थांत अनेक शवोपजीवी सूक्ष्मजंतू व कवके आढळतात. पिथियम व इतर जीवोपजीवी म्हणून ओळखली जाणारी कवके शवोपजीवनास सक्षम असतात.

 वाहिनीवंत वनस्पतींत (टेरिडोफायटा व बीजी वनस्पती यांत) शवोपजीवन क्वचितच आढळते. ⇨ सायलोटेलीझ गणातील जातींच्या मूलक्षोडावर व गंतुकधारीत, ⇨ लायकोपोडियमाच्या गंतुकधारीत आणि ऑफिओग्लॉसम या नेचाच्या बीजुकधारी वनस्पतीच्या मुळांत व गंतुकधारीत कवकतंतू [संकवक → कवक] असतात. त्या कवकतंतूच्या मदतीने कार्बनी पदार्थांतून या वनस्पती अन्नशोषण करतात [→ ऑफिओग्लॉसेलीझ] काही फुलझाडे पूर्णपणे शवोपजीवी असून बहुतेकांची मुळे व खोडे फारच र्‍हास पावलेली असतात. यांचेही पोषण संकवकांच्या मदतीने होते. यांच्या भूमिस्थित खोडांपासून एक लहान दांडा जमिनीवर येतो, त्यावर पांढरट, पिवळट किंवा पिंगट खवल्यासारखी पाने व फुलोरा येतो. नीओशिया, कोरॅलोर्‍हायझा व एपिपोजियम ही आमरांची [→ ऑर्किडेलीझ] उदाहरणे त्यांपैकी असून इंडियन पाइप (मोनोट्रोपा) या द्विदलिकित वनस्पतींचे [→ एरिकेलीझ] पोषणही पूर्णपणे मुळांवरील संकवकाद्वारे होते. यालाही खवल्यासारखी पाने असतात. काहींच्या मते ही वनस्पती जीवोपजीवीप्रमाणे कवकापासून अन्नशोषण करते.  कोरॅलोर्‍हायझा व एपिपोजियम यांना मुळेही नसतात. त्यांची खोडे संकवकाद्वारे शोषण करतात. पायरोलाच्या जाती अर्धशवोपजीवी औषधी (लहान व नरम वनस्पती) आहेत व त्यांना चिवट हिरवी पाने व भूमिस्थित मूलक्षोड असून मुळांवर संकवक असते. एरिकेसी कुलातील कित्येक जाती (उदा., गंधपुरा, क्रेनबरी,   ऱ्होडोडेंड्रॉन) व अम्लयुक्त जमिनीत वाढणाऱ्या काही जाती अर्धवट शवोपजीवी असतात. त्या आपल्या हिरव्या पानांच्या मदतीने अन्ननिर्मिती करतात परंतु संकवकाच्या मध्यस्थीने त्यांची मुळे जमिनीतील कार्बनी द्रव्यांपासून अंशतः पाणी, लवणे व कार्बनी पदार्थ घेतात.

 प्राण्यांच्या अन्ननलिकेत सतत आढळणारे काही शवोपजीवी सूक्ष्मजीव कधीकधी विषबाधेस कारणीभूत होतात. शहरातील मलमूत्राची विल्हेवाट वाहितमल पद्धतीने लावण्यामध्ये मानवाने शवोपजीवींचा उपयोग फारच मोठ्या खुबीने करून घेतला आहे. नैसर्गिक खते तयार करण्यातदेखील शवोपजीवींचा मोठा वाटा असतो. दूध व दुग्धजन्य पदार्थांत पुढील प्रकारचे शवोपजीवी सूक्ष्मजीव आढळता स्ट्रेप्टोकॉकस, ल्युकॉनोस्टॉक व लॅक्टोबॅसिलस हे दुग्धशर्करेच लॅक्टिक अम्लात रूपांतर करतात. एश्चेरिकिया कोलाय व एंटेरोबॅक्टिरियम एरोजीनस या जाती प्राण्यांच्या मोठ्या आतड्यात आढळतात. त्यांचे दुधातील अस्तित्व दुधाचे दूषितीकरण व पाश्चरीकरण यांचा संवेदनाशील दर्शक (इंडेक्स) मानतात. स्यूडोमोनस या सूक्ष्मजंतूमुळे प्रथिने व वसा यांच्यावर जीवरासायनिक विक्रिया होऊन दूध खराब होते. बॅसिलस सब्टिलिस व बॅ.सेरिअस यांवर पाश्चरीकरण व निर्जंतुकीकरण या क्रियांचा परिणाम होत नसल्यामुळे दूध खराब होते. क्लॉस्ट्रिडियम स्पोरोजिनस प्रथिनांवर हल्ला करते व क्लॉ. ब्युटिरिकम वायू करते (फसफसते). त्यांच्यामुळे चीजमध्ये दोष निर्माण होतात.

 शेवटी कोणत्याही सजीवाला पोषण देऊ शकत नाही असा निदान एक तरी कार्बनी पदार्थ सृष्टीमध्ये उपलब्ध आहे, असे विधान करणे कठीण आहे. अल्कोहॉले, मेदे (स्निग्ध पदार्थ), मेदाम्ले, हायड्रोकार्बने (उदा., मेणे, नॅप्थॅलीन इ.) हे पदार्थही सजीवांच्या पोषणासाठी वापरात असल्याचे नमूद आहे. त्या दृष्टीने कमी-जास्त प्रमाणात ते सजीव शवोपजीवी असतात.

 पहा : एंझाइमे कवक जीवोपजीवन परिस्थितिविज्ञान पाइन भूछत्रे सूक्ष्मजंतुविज्ञान हीद हीदर.

 परांडेकर, शं. आ.