वाळा : (खस हिं. बाला, बेना, खसखस, खस गु. वाळो क. मुदिवला, लवंचा, कुरुवेळु सं. अभय, शीत-सुगंधी-मूलक, उशीर इं. व्हेटिव्हर, खसखस ग्रास लॅ. व्हेटिव्हेरा झिझेनॉइड्स कुल-ग्रॅमिनी). हे दाट झुबकेदार बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत नदीच्या  काठाने व दलदलीत वाढते. साधारणपणे १,२०० मी. उंचीपर्यंत ते आढळते. भारत, म्यानमार (ब्रह्मदेश), पाकिस्तान, मलेशिया, वेस्ट इंडीज, उष्ण कटिबंधीय आफ्रिका, ब्राझील इ. प्रदेशांत सामान्यपणे रानटी अवस्थेत आढळते. मूलक्षोड (जमिनीतील खोड) शाखायुक्त व संधिक्षोडे (ताटे) १-२ मी. उंच व आवरकांनी वेढलेली असतात. मुळे लांब, जाड, सुविरल(भुसभुशीत) व सुवासिक असतात. पाने एकाआड एक साधी, गवतासारखी फिकट हिरवी व अरुंद असून कडा किंचित काटेरी, खरबरीत व ३०-९० सेंमी. लांब असतात. फुले सु. १५-४० सेंमी. लांबीच्या परिमंजरीत [⟶ पुष्पबंध] येतात. फुलोऱ्याचा दांडा जाड असून त्यावर ६-१० फांद्यांची मंडले येतात, कणिशके (लहान फुलोरे) करडी हिरवी किंवा जांभळट, ४-६ मिमी. लांब व जोडीने असतात. एक कणिशक बिनदेठाचे, दुसरे देठ असलेले प्रत्येकात दोन फुले, एका कणिशकात एक फूल द्विलिंगी व दुसरे वंध्य, दुसऱ्या कणिशकात एक वंध्य व दुसरे नर-पुष्प असते. पशूके नसतात [⟶ फूल].

वाळा : (१) मुळांसह खोडाचा तळभाग, (२) कणिश फुलोरा, (३) कणिशक.मुळे प्रशीतकर (थंडावा आणणारी), कडू उत्तेजक, स्तंभक (आकुंचन करणारी) व शक्तिवर्धक असतात. त्यांचा ज्वरनाशक, वाजीकर, दीपक (भूक वाढविणारी), आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) म्हणूनही उपयोग होतो. मुळे पाण्यात उगाळून किंवा त्यांची पूड पाण्यात कालवून तापात अंगास लावतात. मुळापासून मिळणारे खस तेल सर्वांत दाट बाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणारे) तेल असून ते इतर तेलांत मिसळता येते. उच्च दर्जाच्या सुगंधी साबणाकरिता आणि अत्तरे व सुगंधी तेलांकरिता ते वापरतात. सुवास येण्याकरिता ते सरबतांत घालतात. तेल वायुनाशी असून पोटदुखी व वांत्यांवर गुणकारी असते. पानांचा काढा स्वेदक (घाम आणणारा ) असतो. तेल संधिवात, लचकणे इत्यादींवर चोळण्यास चांगले असते. मुळांपासून पडदे, पंखे, चटया, टोपल्या इ. बनवितात. सुक्या गवताचा उपयोग केरसुण्या करण्यास व छपराकरिता करतात, तसेच कागद लगदा करण्यास हे गवत उपयुक्त आहे.

भारतात फार प्राचीन काळापासून वाळा वापरला जात आहे. राजे लोक वापरीत असलेल्या सुगंधी द्रव्यांच्या यादीत वाळ्याची नोंद असलेले ताम्रपट उपलब्ध आहेत. कौशिक सूत्र, बृहत्संहिताचरकसंहिता इ. जुन्या ग्रंथात ‘उशीर’ नावाने वाळ्याचा उल्लेख औषधी व सुगंधी द्रव्यांच्या संदर्भात आला आहे.

जमिनीची धूप होऊ नये यासाठी एक उपाय म्हणून अलीकडे वाळ्याची कुंपणासाठी लागवड करतात. असे कुंपण जनावरे खात नाहीत. भारतात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत हजारो हेक्टर क्षेत्रात याची लागवड, विशेषतः कापसाच्या काळ्या जमिनीत, केलेली आहे.

लागवड, जमीन व उत्पादन : भारतात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे व्यवस्थितपणे वाळ्याची लागवड केली जाते तथापि त्यापासून मिळणारे तेल व इतर उपयोगांकरिता लागणारा माल (मुळे) बहुतांश वापरला जातो. फुले येणारा व फुले न येणारा असे दोन प्रकार आढळतात. उत्तर भारतात पहिला प्रकार अधिक असून दक्षिण भारतात दोन्ही प्रकार आहेत. याचबरोबर मध्यम जाडीचे खोड व अधिक शाखायुक्त मुळे असा एक प्रकार असून दुसऱ्या सामान्यतः आढळणाऱ्या प्रकारात अधिक जाड खोड व कमी शाखांची मुळे असतात. भरतपूर, अकिला व मुसानगर येथील वाळ्याच्या तेलाला अधिक सुगंध येतो व दक्षिण भारतीय वाळ्यात तेलाचे प्रमाण जास्त असते.

वाळ्याला कोणतीही सकस, चांगल्या निचऱ्याची व वाळुमिश्रित जमीन मानवते तसेच सु. १००-२०० सेंमी. पाऊस व २१°-४३.५° से. तापमान असावे लागते. दलदली प्रदेश व उबदार पण दमट हवा असल्यास वनस्पती अधिक कणखर होते आणि तिला मुळे बारीक व भरपूर येतात. केरळमध्ये समुद्रकिनाऱ्यावर वाळूत लागवड करतात. लागवडीकरिता जिवंत झुबक्यातील १५-२० सेंमी. लांबीचे कोंब मूलक्षोडासह (तुकडे) काढून लावतात. जानेवारीत बिया पन्हेरीत लावून प्रथम रोप तयार करतात आणि नंतर पावसाळ्यात त्यांची लागवड करतात परंतु ही पद्धत फारशी वापरात नाही. लावणीपूर्वी सामान्यपणे सर्वत्र ३० सेंमी. उंच, ६८ सेंमी. रुंद असे वाफे ४५ सेंमी. अंतर ठेवून करतात आणि पूर्वीच्या पिकाच्या कोंबांचे तुकडे त्यावर २२ सेंमी. अंतर ठेवून दोन ओळींत लावतात. कमीजास्त लांबीचे व उंचीचे वाफेही करतात. मे ते ऑगस्टपर्यंत लावणी संपवावी लागते. दर हेक्टरी १.५०-२.२५ लाख तुकडे लावतात. यानंतर अनेकदा तण काढणे, खत देणे व आवश्यक असल्यास पाणी देणे या प्रक्रिया होतात. वाळ्यावर काही कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींद्वारे होणारे) रोग पडतात त्यांवर रूढ उपाय करतात. काही अळ्या मुळांची हानी करतात व गुरेही पाने खातात, त्यापासूनही संरक्षण करावे लागते. साधारणपणे वनस्पती लावल्यावर १०-१२ महिन्यांनी उपयोगाकरिता कोरड्या ऋतूत काढून घेतात. काही ठिकाणी १५-१८ महिन्यांनंतर मुळे काढून घेऊन तेलाकरिता वापरतात. दक्षिणेत बहुधा दर हेक्टरी ४,०००-५००० किग्रॅ. मुळे मिळतात. ती पिवळट किंवा तांबूस पिवळी असून त्यांना सुगंध येतो.

ताज्या किंवा सुक्या मुळांचे तेल ऊर्ध्वपातनाने काढतात. जगातील तेलाचे उत्पादन सु. १४० टन असून हैती, रेयून्यों बेट व जावा येथे यांचे उत्पादन सर्वांत जास्त असते. भारतात स्थानिक गरजेपुरते उपलब्ध होते, काही थोडे निर्यात केले जाते. भारतातील भरतपूर, मुसानगर व केरळच्या किनाऱ्यावरची काही ठिकाणे येथे विशेष उत्पादन होते. तेल शुद्ध स्वरूपात किंवा अत्तह म्हणून काढतात, अत्तर चंदन तेलात किंवा तत्सम विद्रावक (विरघळविणाऱ्या) तेलात काढतात. उत्तर भारतात तेलाचा उतारा ०.१-०.३% व दक्षिण भारतात ०.६२-०.७९% असतो.  तेल तांबूस तपकिरी, कधी हिरवट व दाट असून ते दिवसेंदिवस गडद होत जाते. त्याला आल्हादकारक सुगंध असून तो दीर्घकाल टिकणारा असतो. रानटी वनस्पतीपासून काढलेल्या तेलास व्हेटिव्हर (खस) ऑइल व लागवडीतील वनस्पतीच्या मुळांपासून काढलेल्या तेलास ऑइल ऑफ व्हेटिव्हर रूट्स असे म्हणतात. चंदन, गुलाब व पाच यांच्या तेलाशी त्याचे चांगले मिश्रण होते.

पहा : ग्रॅमिनी.

संदर्भ : 1. Badhwar, R .L. Rao, P. S. Sethi, H. Some Useful Aromatic Plants, New Delhi, 1964.    

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X. New Delhi, 1976.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.