गाजरी : (चटकचांदणी, पांढरी फुली, गाजर गवत लॅ. पार्थेनियम हिस्टेरोफोरस कुल-कंपॉझिटी). साधारणपणे १९६० सालानंतर विशेष परिचयाचे झालेले हे ओषधीय [→ ओषधि] वर्षायू (एक वर्ष जगणारे) तण मूळचे वेस्ट इंडीज व उ. आणि द. अमेरिकेतील असून आयात केलेल्या धान्याबरोबर भारतात आले आहे व आता महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषतः ओलसर ठिकाणी, पसरलेले आहे. ते चिवट असल्याने त्याने इतर तणांवर मात केली आहे इतकेच नव्हे, तर सर्व ठिकाणी भरपूर उगवणाऱ्या उपयुक्त गवताला त्याने मागे टाकले आहे त्यामुळे जनावरांना चरण्याला उपयुक्त अशी ठिकाणे झपाट्याने कमी होत आहेत. ते स्वतः अखाद्य, रोगकारक व विषारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

गाजरी : (१) फुलोऱ्यासह वनस्पती, (२) फुलोरा (स्तबक) खालून दिसणारा, (३) फुलोरा (स्तबक) वरुन दिसणारा, (४) किरण-पुष्पके, (५) बिंब, (६) फुग्यासह संकृत्स्न फळ.

हे तण सु. १–१·५ मी. उंच वाढते खोड बारीक असून त्यावर जाड लांबट रेषा व तुरळकपणे केस असतात. फांद्या थोड्या असून बरीचशी मोठी पाने खोडाच्या तळाशी येऊन जमिनीवर झुबक्यासारखी पसरतात. ती साधी पण अनियमितपणे कमीजास्त विभागलेली, दातेरी, लवदार, एकाआड एक व काहीशी शेवंती, टोमॅटो किंवा गाजराच्या पानांसारखी (त्यामुळे व फुलोऱ्यामुळे ‘गाजरी’ हे नाव) दिसतात. फुले पांढरी व फार लहान असून फुलोरे [स्तबक,→ कंपॉझिटी] ऑगस्ट ते नोव्हेंबरात येतात. हे फुलोरे खोड व फांद्यांच्या टोकास विरळ मंजऱ्यांवर येतात ते चांदण्यांप्रमाणे दिसत असल्याने ‘चटकचांदणी’, ‘पांढरी फुली’ ही नावे पडली आहेत. स्तबकात (व्यास ०·५ मिमी.) बिंब-पुष्पके व पाच किरण-पुष्पके [→ पुष्पबंध] असतात. किरण-पुष्पकांपासून संकृत्स्न फळे [→ फळे] बनतात ती असंख्य, बारीक, गर्द पिंगट, एकबीजी, खाली टोकदार व वर गोलसर असतात. प्रत्येकास दोन लहान फुग्यासारखे भाग असल्याने त्यांचा प्रसार फार जलद व मोठ्या प्रमाणात होतो.

या तणाच्या मूलस्थानात त्याचा औषधी उपयोग बलवर्धक, ज्वरनाशक, आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे), मज्‍जातंतुव्यथेत वेदनाहारक म्हणून करतात मुळांचा काढा आमांशात देतात. भारतात हे तण जनावरे खात नाहीत तसेच त्यामुळे मनुष्याला त्वचारोग, दमा व ज्वरादि विकार होतात असे आढळले आहे यामध्ये ‘पार्थेनीन’ हे कटुद्रव्य (ग्‍लायकोसाइड) असते. शिवाय त्याच्या वाढीमुळे जमीन निकस होते. ह्या तणामुळे होणारे नुकसान वाचविण्याचा मुख्य उपाय म्हणजे त्याला नामशेष करणे. याबाबत उपटून टाकणे, जाळणे इ. सामान्य उपायांखेरीज २-४-डी चे एस्टर किंवा अमाइन ही रसायने वापरतात. दर हेक्टरी एक किग्रॅ. रसायन १,००० लि. पाण्यातून फवारतात. मिठाचे पाणी फवारून या तणाचा नाश करता येतो, असेही आढळून आले आहे, तथापि अधिक कडक उपाययोजना करण्यासंबंधी अमेरिकेत व भारतात (पुणे, दिल्ली व बंगलोर) संशोधन चालू आहे.

संदर्भ : CSIR, The Wealth of India, Vol. VII, New Delhi, 1966.

परांडेकर, शं. आ.