खरवत : (हिं. खरोटी, काळा-अंबर क. गरगळ्‌ळी, खरगस सं. खरपत्र लॅ. फायकस ॲस्पेरिमा कुल-मोरेसी). हा लहान वृक्ष मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प, कोकण व उ. कारवार येथील गर्द जंगलांत व श्रीलंकेत आढळतो. याची साल पांढरी व गुळगुळीत फांद्या थोड्या खरबरीत पाने (४–१२ X २–७ सेंमी.) एकांतरित (एकाआड एक) अंडाकृती, लंबवर्तुळाकार, टोकाच्या बाजूस दंतुर, तीन मुख्य शिरांची आणि दोन्ही बाजूंस खरबरीत असतात. पुष्पासन (कुंभासनी) एकटे सवृंत (देठयुक्त), गोलाकार (१·३-२ सेंमी.), पिकल्यावर पिवळे किंवा जांभळे व त्यावर पिवळे ठिपके असून खरबरीत व रोमश (राठ केसयुक्त) असते. कुंभासनीत पुं-पुष्पे आतील बाजूस पण वर आणि गुल्मपुष्पे व जननक्षम फुले खाली असतात [→ फूल]. अंडाकृती व निरुंद कृत्स्नफले (शुष्क, आपोआप न फुटणारी एकबीजी फळे) मार्च-एप्रिलमध्ये येतात. लाकूड पांढरे किंवा पिवळट करडे व मऊ असून त्याला बाक येतो व ते चिंबते त्यामुळे फारसे उपयुक्त नाही. यकृत व प्लीहा (पानथरी) यांस सूज आल्यास झाडाचा रस व साल देतात.

पहा : अंजीर मोरेसी.                                       

ज्ञानसागर, वि. रा.