लवण ग्रंथि : सागरी कासवे, सर्प, सरडे आणि बराच काळ समुद्रावर घालविणारे पेट्रल, कुरव ( गल) व ॲल्बट्रॉस यांसारखे पक्षी यांच्या डोळ्याजवळ किंवा नासामार्गात असणाऱ्या विशिष्ट ग्रंथीला ‘लवण ग्रंथी’ म्हणतात. ज्या प्राण्यांत या ग्रंथी आढळतात त्याना समुद्राचे खारे पाणी पिण्यास चालते. या खाऱ्या पाण्यातील मीठ शरीराबाहेर टाकणे आणि पाण्याचा व मिठाचा शरीरात समतोल राखणे, हे या ग्रंथीचे विशिष्ट कार्य आहे.

जर मनुष्य किंवा गोडे पाणी पिणारा प्राणी समुद्राचे खारे पाणी प्यायला, तर त्याची तहान न भागता ती उलट वाढेल. याचे कारण खाऱ्या पाण्यातील अधिक मीठ त्याच्या शरीरात गेल्यामुळे ते मूत्र पिंडांद्वारे शरीराबाहेर टाकण्यासाठी त्याला अधिक पाण्याची आवश्यकता भासेल आणि ते त्याच्या शरीरातील द्रवांतून

घेतले जाईल. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात नुसते मीठ ( सोडियम क्कोराइड ) हेच लवण असते असे नव्हे, तर त्यात अतिसार निर्माण करणारे मॅग्नेशियम सल्फेट हे लवणही असते व त्यामुळे शरीराच्या निर्जलीभवनाची समस्या अधिकच कठीण बनते. शरीरातील लवणांवर नियंत्रण ठेवणे हे मूत्रपिंडाचे काम आहे व ते काम योग्य प्रमाणात हे इंद्रिय करीत असते. बराच काळ समुद्रावर घालविणाऱ्या काही प्राण्यांना व पक्ष्यांना मात्र समुद्राचे खारे पाणी प्यावे लागत असल्याने शरीरातील मिठावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना या लवण ग्रंथी लाभल्या आहेत.

ज्या पक्ष्यांत या ग्रंथी आढळतात त्यांची मूत्रपिंडे फारच कमी कार्यक्षम असतात. या पक्ष्यांच्या नासामार्गातील ग्रंथींचा स्त्राव शास्त्रज्ञांनी तपासला तेव्हा त्यांना असे आढळून आले की, या स्त्रावाचा नासामार्ग स्वच्छ करण्याशी काही संबंध नाही. या स्त्रावात पुष्कळ प्रमाणात मीठ असते. अशा पक्ष्यास खारे पाणी पाजले, तर थोड्याच वेळात हा स्त्राव निर्माण होतो व त्याद्वारे मीठ बाहेर टाकले जाते, असे प्रयोगांवरून दिसून आले. अशा प्रकारे शरीरातील मिठावर नियंत्रण ठेवले जाते. या लवण ग्रंथींच्या स्त्रावाचा थेंब चोचीच्या टोकावरून बाहेर टेकला जातो.

सागरी कासवाच्या डोळ्यामागेही अशाच ग्रंथी आढळतात. या ग्रंथीचा स्त्राव तपासला असता त्यात मिठाचे प्रमाण खूप आढळले. पूर्वी या स्त्रावास कासवाचे रडणे म्हणत असत. आता प्रयोगातन्ती हे रडणे नसून शरीरातील मिठावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक मार्ग आहे, असे सिद्ध झाले आहे. या ग्रंथीची सूक्ष्म अंतर्रचना व सागरी पक्ष्यांच्या ग्रंथीची अंतर्रचना यातही बरेच साम्य आहे. सागरी सर्प, सरडे यांसारख्या इतर प्राण्यांच्या डोक्यातही अशाच लवण ग्रंथी आढळतात. समुद्रातील सस्तन प्राण्यांत अजून अशी लवण ग्रंथीसारखी इंद्रिये सापडलेली नाहीत. या प्राण्यांची मूत्रपिंडे अधिक कार्यक्षम असतात व तीच त्यांच्या शरीरातील मिठाचा समतोल राखतात.

लवण ग्रंथी संयुक्त नलिकाकार ग्रंथी असून त्या नासामार्गातील अधिस्तराचे (पातळ अस्तराचे) अंतर्वलन होऊन किंवा विकसित होणाऱ्या नेत्रश्लेष्मकोटरापासून (नेत्रगोल व पापणी यांच्यामधील बुळबुळीत पटलाने तयार होणाऱ्या कोटरापासून) बनलेल्या असतात, असे दिसते. सागरी कासवात ही ग्रंथी नेत्रश्लेष्मकोटरात अतिरिक्त अश्रुग्रंथीच्या रूपात उघडते, तर समुद्री पक्ष्यांत व सरड्यांत ती नासामार्गात उघडते.

लवण ग्रंथी व मूत्रपिंड यांच्या कार्यात वरवर जरी सारखेपणा दिसत असला, तरी मूत्रपिंडाचे कार्य लवण ग्रंथीपेक्षा जास्त जटिल आहे. लवण ग्रंथीत प्रामुख्याने सोडियम क्कोराइड हे लवण निराळे काढून टाकण्याची क्षमता आहे. इतर लवणे विशेषेकरून आढळत नाहीत. मूत्रपिंडात इतर अनेक लवणे व त्यांचे आयन (विद्युत् भारित अणू , अणुगट वा रेणू) वेगळे करण्याची क्षमता आहे. सस्तन प्राण्यांचा मूत्रपिंड सर्वात जास्त कार्यक्षम आहे.

संदर्भ : Schmidt-Nelsen, Knut, Salt Glands, Scientific American, January 1959.

इनामदार, ना. भा. जमदाडे, ज. वि.