ब्रोमेलिएसी : (इं. पाइन-ॲपल फॅमिली म. अननस – आपनस कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक लहान कुल. जे. एन्. मित्र यांनी पुरस्कार केलेल्या, सोयीस्कर पद्धतीनुसार ह्या कुलाचा समावेश‘कॉमेलिनेलीझ’ या गणात (कंचट गणात) केला जातो. ⇨ कॉमेलिनेसी (कंचट कुल) हे कुल याच गणात असल्याने त्यावरून गणाचे नाव घेतले आहे. ह्या गणात ब्रोमेलिएसी, एरिओकॉलेसी (एरिओकॉलेनेसी), कॉमेलिनेसी व इतर पाच लहान कुले अशी एकूण आठ कुले घातली आहेत. वर्गीकरणाच्या भिन्न पद्धतीनुसार भिन्न तज्ञांनी ह्या गणाचे व त्यातील कुलांचे आप्तभाव विचारात घेऊन त्यांना काही इतर गणांत वा श्रेणींत स्थाने दिली आहेत त्यामुळे वर्गीकरण व तसेच कॉमेलिनेलीझ गणाचा उगम व विकास यांबाबत एकमत नाही. सामान्यपणे ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी मानलेल्या लोबी या गणापासून याचा उगम झाला असावा, असे मानतात.

ब्रोमेलिएसी कुलात सु. ६५ वंश व ८५० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते ६० वंश व १,४०० जाती) समाविष्ट आहेत. अमेरिकेतील उष्ण भागांतून यांचा प्रसार इतरत्र झाला असून बहुतेक वनस्पती आखूड खोडाच्या ⇨अपिवनस्पती आहेत व काही जमिनीवर वाढणाऱ्या ⇨ओषधी व क्षुपे (झुडपे) व लहान मोठे वृक्ष आहेत. पाने व फुले यांच्या सौंदर्यामुळे काही जाती उद्यानांत लावतात. बहुतेकींना लांब, अरुंद, मूलज (जमिनीतून आलेली) आवरक (वेढणाऱ्या) तळांची व काटेरी किनारीची साधी पाने गुच्छाप्रमाणे आलेली असतात. फुलोरे कणिश किंवा परिमंजरी प्रकारचे [⟶ पुष्पबंध] असून फुले बहुधा नियमित, द्विलिंगी, अरसमात्र, त्रिभागी आणि रंगीत छदांनी वेढलेली असतात. परिदलांची दोन मंडले स्पष्ट असून आतील मंडळ पाकळ्यांचे असते. केसरदलेही तिन्हीच्या दोन मंडलात असतात. अधःस्थ किंवा ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येक कप्प्यात अनेक बीजके असतात [⟶ फूल]. फळ मांसल किंवा शुष्क आणि बियांवर बहुधा पंख किंवा केसाळ तुरा असतो. कधी त्या फार हलक्या असतात. पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) पिठूळ असते. हवेतून पाणी शोषून घेण्याकरिता अनेक अनुयोजना (बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी रूपांत व संरचनात झालेले बदल) आढळतात (उदा., खवल्यांसारखे केस पानांचे कप्पे इ.). या कुलातील ⇨ अननसाची मधुर फळांकरिता व इतर काहींची (घोमेलिया सेरा व प्रो. मॅग्‌डॅलेंस) उपयुक्त धाग्याकरिता लागवड करतात. ब्रो पिग्विनची आंबट फळे खाद्य असतात. ब्रो. काराटसच्या फुलोऱ्यांची भाजी करतात. टिलँडसिया उस्निऑइडिस [⟶ अपिवनस्पति] ही शेवाळीसारखी ओषधी मूलहीन असून पुया रेमाँदी हा वृक्ष सु. १३ मी. उंच वाढतो. पु. चिलेंसिसचे पानांवरील तीक्ष्ण व लांब काटे मासे पकडण्यास गळाप्रमाणे उपयोगात आहेत.  अननसाच्या पानांपासून उपयुक्त धागा मिळतो. तसेच ब्राझीलमधील ‘कारोआ’ व म. अमेरिकेतील ‘पिटा प्लोझा’ यांपासून धागे मिळतात आणि त्यांचा उपयोग दोर-दोऱ्या, वस्त्रे इत्यादींकरिता करतात. घनदाट वर्षारण्यात वाढणाऱ्या काही वनस्पतींच्या पानांच्या कप्प्यात साठलेल्या पाण्यात अनेक सूक्ष्म व बेडकासारखे काही प्राणी वाढतात डास अंडी घालतात व मलेरियाचा उपद्रव होतो.

पहा : एरिओकॉलॉन मरुवनस्पति.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

           3. Rondle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. 1, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.