कॉमेलिनेसी : फुलझाडांचे (आवृतबीज, एकदलिकित) एक कुल. याचा अंतर्भाव कॉमेलिनेलीझ ह्या गणात केलेला असून याशिवाय आणखी सात कुले (ब्रोमेलिएसी, एरिओकॉलेसी, झायरिडेसी, मायाकेसी वगैरे) त्याच गणात समाविष्ट आहेत. कॉमेलिनेसी कुलात एकूण सु. ३४ वंश व ४०० जाती असून त्या बहुतेक उष्ण प्रदेशात, ओलसर ठिकाणी किंवा दलदलीत आढळतात. क्वचित आरोही (वर चढणाऱ्या) वा ðअपिवनस्पती  वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधी आहेत. पाने एकाआड एक असून आवरक देठांनी खोडास वेढतात, फुलोरा एकशाखी, पानाच्या बगलेत किंवा परिमंजरीय वल्लरी फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, अरसमात्र किंवा एकासमात्र, अवकिंज , छदाने किंवा पर्णावरकाने वेढलेली , क्वचित एकटी परिदले सहा (संवर्त व पुष्पमुकुट स्पष्ट) सहा केसरदलांपैकी काही वंध्य व इतर बहुधा तीन कार्यक्षम , किंजदले तीन व जुळलेली , किंजपुटात २–३ कप्पे , बीजक एक किंवा अधिक व सरळ [→फूल] फळात (बोंडात) सपुष्क (वाढणाऱ्या बियांच्या गर्भाला पोषण द्रव्ये पुरविणारा पेशीसमूह असलेल्या) बिया असून काही जातींत बंद फुले जमिनीत वाढतात. या कुलाला आर्थिक महत्त्व नाही. ⇨ ट्रॅडेस्कँशियाच्या जाती बागेत पानांच्या शोभेसाठी लावतात. कंचट (कॉमेलिना बेंधालेंसिस) व कोषपुष्पी (कॉन्युडिफ्लोरा ) या सामान्य ओषधींचा वापर काही शारीरिक तक्रारींवर करतात. कंचट कडू, शामक, वेदनाहारक, सारक असून कोडावर उपयुक्त असते. कोषपुष्पीची पाने चुरगळून भाजणे, गळवे, खाज इत्यादींवर लावतात व्रणावर पोटीस बांधतात. या दोन्ही जातींना ‘केना’ हे नाव सामान्यपणे वापरलेले आढळते.

कंचट :  (अ) मुग्धपुष्प

परांडेकर, शं. आ.