यूफोर्बिया स्पलेंडेन्स : फुलोऱ्यासह फांदी.यूफोर्बिया स्प्लेंडेन्स : (इं. क्राऊन ऑफ थॉर्न्‌स लॅ. यूफोर्बिया मिली, यू. बोजेरी कुल-यूफोर्बिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] बागेत शोभेकरिता लावण्यास लोकप्रिय असलेले लहान काटेरी झुडूप. हे मूळचे मॅलॅगॅसीमधले असून आता त्याचा प्रसार सर्वत्र झाला आहे. यूफोर्बिया ह्या त्याच्या प्रजातीत एकूण सु. २,००० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ६० आहेत. या झुडुपाचे खोड सु. ०·९ – १·२ मी. उंच, चिकाळ [⟶ चीक] व १·२ – २·५ सेंमी. जाड असते. ते काहीसे मांसल, आरोही (चढणारे) व वेडेवाकडे असून त्यावर पांढरट साल आणि सु. २·५ सेंमी. लांब व तीक्ष्ण काटे असतात तसेच त्यावर साधी, भडक हिरव्या रंगाची, पण थोडी आणि तीही कोवळ्या भागांवर सुईसारख्या टोकाची व्यस्त अंडाकृती ते आयत – चमसाकृती, पातळ व २·५ – ५ सेंमी. लांब पाने एकाआड एक येतात. फांद्यांच्या टोकांजवळ याला लाल रंगाचे फुलोरे येतात प्रत्येक लहान फुलासारखा दिसणारा भाग स्वतंत्र पेल्यासारखा फुलोरा असतो [⟶ पुष्पबंध]. त्यातील दोन लाल व रुंद छदे ठळकपणे दिसतात फुले साधारण वर्षभर येतात तथापि जानेवारी ते मार्चमध्ये बहर असतो फुले फार लहान, परिदले नसलेली, एकलिंगी व एकाच झाडावर एकाच फुलोऱ्यात असतात पुं – पुष्पात एकच केसरदल असते स्त्री – पुष्पात तीन किंजदले एकत्र जुळलेली असतात [⟶ फूल]. फळ शुष्क असते ते फुटून त्याचे तीन भाग होतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨यूफोर्बिएसीत अथवा एरंड कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. या वनस्पतीची अभिवृद्धी (लागवड) छाट कलमे लावून करतात.

पहा : गोवर्धन पानचेटी.

संदर्भ : Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. I, New York, 1961.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.